सोमवार, ९ एप्रिल, २०१८

गिर अभयारण्य

टायगर च्या निमित्ताने वाचन केल तर गिर च अभयारण्य वाचनात आलं. त्याच तसही कुतूहल होतंच. तिथं फॉरेस्ट गार्ड म्हणून महिलांची टीम कार्यरत आहे. त्या रात्री ही बाईकवर पेट्रोलिंग करतात.सोबत टॉर्च,असलं तर पिस्तूल आणि वॉकी टॉकी. एकूण हे सर्व गार्ड सिंहांच्या अंगवळणी पडलेत.सिंहाचा कळप विसावलेला असतो आणि त्याच्या समोर हे गार्ड शेकोटी पेटवून डबे खायला बसतात.त्यांची मोजणी करतात.
    तर फार पूर्वी वाघ सिंह खूप होते.त्यांची शिकार इतकी झाली कि अशी अभयारण्य उभारावी लागली.हळूहळू हा प्रयत्न यशस्वी झाला.आज मला वाटत 500 वाघ सिंह आहेत तिथं.गावकरी हि या सिंहाना सरावलेत.त्यांच्या झोपडी बाहेर गावकुसाबाहेर सिंह एखादी म्हैस मारून खात बसलाय आणि थोड्या अंतरावर त्या झोपडीचा मालक आणि अन्य गावकरी हे दृश्य बघतायत.आणि त्यांच्या वर सिंह हल्ला करत नाहीत.गावात जाताना छोटा ओहोळ बाईक वर बसून दोन गावकरी पार करतायत आणि त्यांच्या बाईकला अगदी जवळून सिंहिण आपल्या पिल्लांना घेऊन निघून जातेय.हे दोघे ही बाईक उभी करून तिला जाऊ देतायत.जस पाळीव कुत्रा बाजूनं जावा.
झालं काय कि, अभय मिळाल्याने हरीण,माकड आणि सिंह यांची संख्या वाढली.आता सिंहाना खायला पंचाईत पडणार नाही असं वाटत आपल्याला पण झालं उलट.
माकडं हरिणांच्या कळपा सोबत फिरतात.त्यांची दोस्तीच झाली म्हणाना. मग सिंहाची चाहूल लागली कि माकड आरडा ओरडा करून हरिणांना सावध करतात आणि हरण पळून जातात.सिंहाची शिकार निसटते.
    इकडं गावकऱ्यांची शेत आहेत त्यातील पीक तयार झालं कि हि हरण रात्री येऊन पिकावर तुटून पडतात.त्यांना मारता येत नाही.मग गावकऱ्यांनी अनुभवांती एक इंटरेस्टिंग युक्ती सुरू केलीय.रात्री शेतात जातात आणि हरणांचा आवाज काढतात.त्या हाकेला फसून हरण शेतात येतात.
तिकडं सिंहाचा कळप गावा बाहेर जमलेला असतो रात्र अजून व्हायची वाट बघत.कारण जो वर गावकरी झोपत नाहीत आणि शेवटचा दिवा जात नाही तोवर वाट बघावी लागते.त्यात कुत्रे वेशीवर असतात ते लगेच भुंकू लागतात.तर हा दबा धरून बसलेला कळप गावकऱ्यांनी काढलेल्या हरिणांच्या आवाजात ओळखतो.हळूच खाली येऊन पोझीशन घेतात.हरणांचा कळप टप्प्यात आला कि चारी कडून योजनाबद्ध हल्ला करून शिकार साधली जाते.त्यांच्या कुटुंबाचं पोट भरत आणि गावकऱ्यांच पीक वाचत.कधी मधी एखाद गावातील जनावर किंवा कुत्र सिंहानी मारलं तर लोक समजून घेतात.अशी परस्पर सामंजस्य साधत सिंह आणि माणूस एक ठिकाणी राहायला शिकलेत.
वर म्हणलो तसे फॉरेस्ट गार्ड आणि गावकरी यांचे सिंहाचा कळपा जवळचे व्हिडीओ तू नळीवर बघायला मिळतील.
नुकताच मागील आठवड्यात आजोबा सिनेमा बघितला त्यात ही हे जाणवत आपण त्यांच्या घरात घुसलोयत लोकसंख्या वाढी मूळ.अर्थात हे समजून गिर च्या लोकांसारखं जिओ और जीने दो केलं तर हि वन्य संपत्ती आणि दुर्मिळ होत जाणारे प्राणी पुढील पिढीला प्रत्यक्ष जिवन्त बघायला मिळतील अन्यथा फक्त पुस्तकात किंवा ज्या फ्लिम्स केल्या आहेत त्यात बघावे लागतील.

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

राहुल भाई

*राहुल*
आज दुपारी झोपायला जाणार इतक्यात फोन वाजला.व्हिडीओ कॉल होता.म्हटलं बालम क काय?पण राहुल चा फोन होता.उचलला तर म्हणला,
अरे साहब कहा हो आप ? कितने दिन हुए पता भी है यहा आये हुए?

हा यार बहोत दिन हुए, पर आजकाल मेरा आना उस तरफ होता हि नही इसलीये नही आ सका. बाकी आपकी याद तो रोज आती है भाई.
अच्छा तो आज आ हि जाइये आपसे मिलने को दिल कर रहा है.फिर अगले महिने तो मै गाव जा रहा हूं पेहली तारीख को.
  हा और जून के एन्ड मे आओगे.और मिलने पर आख मे पानी लाते हुए कहोगे के ,घर पर तो सब ठीक ठाक है पर याद आती है परिवार कि.
मी अस म्हणल्यावर हसत म्हणला,हा क्या करे याद तो आती हि है घर कि. पर आज आपकी आ रही है आजाइये .
हा भाई पक्का आता हूं.
म्हणत फोन ठेवला.
हा राहुल माझा पाणी पुरी वाला.गेली कैक वर्ष रात्री त्याच्याकडं खाऊन येतोय घरी.त्याच्याशी इतकं नात जमलंय कि घरचा वाटतो.आत्ता येताना त्याच्या कडे गेलो.मला बघितल्यावर मिठी मारलीन.खूप दिवसांनी हवासा वाटणारा जवळचा नातेवाईक,त्याहून दुसर म्हणायच तर मित्र भेटल्यावर वाटत तस वाटलं.लगेच एकाला थंड पाण्याची बाटली माझ्या करता आणायला पाठवलन.
साहब आप पिछले बरस आये थे 7 महिने हो गये तबसे आज आये हो. वो भी बुलाने पर.लेकिन आये तो अच्छा लगा मुझे.एकूण त्याच सर्व ठीक चाललं होतं.आम्ही दोघांनी एकमेकांची सुख दुःख एकमेकांना सांगितलीयत. म्हटलं राहुल घरी सगळं ठीक.तर सर्व ठीक आहे म्हणला.मुलाला या खेपी इकडेच शिकायला आणतोय माझ्या बरोबर. घर बांधून झालं.तिथं एक बाईक हि घेऊन ठेवलीय.आता गेल्या सात महिन्यात दीड लाख फायदा कमावला. त्यातले 50 हजार पोरांच्या आजारपण वग्रे करता घरात देणारेय.50 इथं ठेवलेत.आणि 50 पोरींच्या लग्ना करता पुंजी जमवतोय त्यात टाकणार.3 मुली 1 मुलगा आहेत त्याला. आणि सासुरवाडीला एक बोअर मारायचीय त्याला पस्तीस हजार खरच येईल. वसईत आला तेंव्हा पासून मी त्याच्याकडे जातोय.अतिशय अदबीने,प्रेमानं आणि आपुलकीनं खाऊ घालतो.जे दुर्मिळ होत चाललंय हल्ली.पण रस्त्यावर भेटलेली अशी काही माणसं मात्र खूप जवळची झालीत माझ्या.आणि ही दोघे तिघे आहेत.याची पाणी पुरीची गाडी नाहीये.बांबू चा ठेला घेऊन असतो.सर्वांशी हसून खेळून बोलतो.गिर्हाईक नेहमीच बांधलेलं आहे.खूप बायका यांच्याच कडे विश्वासानं येत असतात.काही कुटुंब ही.आज भरपूर गप्पा मारल्या.तोवर मला बसायला स्टूल दिल होतन.मी नेहमी एक पाणीपुरी आणि एक रगडा पुरी खायचो त्याच्या कडे ते लक्षात असतच त्याच्या. ते खाऊन मी निघतो म्हणलो तर अजून थांबा म्हणला म्हणून परत बसलो.मग काही गिर्हाईक गेल्यावर परत एक भेळीची पुडी समोर धरलन.नको नको म्हणलो तरी नाही खा च म्हणला.निघताना शंभर रु काढून दिले तर डोळे ओले करत म्हणला,पैसे के लिये थोडे ही बुलाया आपको. पैसे दे के तो खाते हि आ रहे हो आप, आज ये प्यारसे खिलाया है उसके पैसे दे के दिल मत तोडो.
काय बोलणार यावर ? मग माग पार्क केलेल्या बाईक च्या माग लोकांनी त्यांच्या गाड्या लावलेल्या.माझ्या कडून चावी घेऊन त्यानं गाडी त्या गर्दीतून काढून दिलीन आणि परत मिठी मारून म्हणला,साहब हो सके तो मेरे गाव जाने से पेहले एक बार फिर आना.बच्चा भी याद करता है आपको घर पर.वो अंकल आते है या नही .म्हटलं नक्की भेटून जाईन.
अशी जीव लावणारी माणसं रस्त्यावर मिळलीत.

बुधवार, १४ मार्च, २०१८

लिमये काका

माझे मेहुणे होते ,अवलिया माणूस. ssc पास .पण कार्गो शिपवर कप्तान होते.दुनियाभर फिरून आलेला स्मार्टनेस आणि इंग्रजीवर प्रभुत्व.सहा फूट उंच न भारदस्त शरीर.
मी कॉमिक्स, चांदोबा,किशोर वग्रे वाचत असे.एकदा त्यांच्याकडे रहायला गेलो होतो.त्यांना दोन मुली.ज्या माझ्या भाच्या लागतात पण आमच्यात दोस्ती खूप होती.मोठीला माझ्या सारख वाचायला आवडायचं.ती हँडर्सन च्या परीकथा वाचायची.मेहुण्यांनी हे हेरलं होत.अचानक संध्याकाळी आम्हा दोघांना बोलावली त्यांनी.आम्ही येऊन त्यांच्या पुढं उभं राहिल्यावर खिशातून नोटांचा छोटं बंडल काढून माझ्या हाती दिल.म्हणले,सलील तू न उज्वल पुस्तक वाचता अस बघतोय मी.आज आता जाऊन गिरगावतल्या पुस्तकाच्या दुकानातून तुम्हाला हवी ती न हवी तेव्हढी पुस्तक आणा आणि वाचा सुट्टीत. आम्हाला आनंद झाला.निघताना परत त्यांनी हाक मारून सांगितलं,जर पैसे हरवले तर चौपाटीवर जाऊन रडत बसू नका.मला फोन करा किंवा घरी या मी परत पैसे देईन.पण हे न होईल असं बघा.
आम्ही उड्या मारत दुकानात गेलो.आवडतील ती पुस्तक घेतली.उज्वलन मात्र मला सांगितलं,आपण थोडे पैसे ठेवूनच खरेदी करू.सर्व पैसे सम्पवून आले अस नको.( आता कळत तिला व्यवहार त्या वेळीच समजला होता😊)
मग घरी आलो न पुस्तकाचा ढीग बघत बसलो.बहीण आली न म्हणली,अहो पुस्तक आणायला पैसे दिलेत ते ठीक पण त्या दोघांनाच काय पाठवलेत? मी गेले असते न सोबत.काही वेडंवाकडं झालं असत म्हणजे ?
मेहुणे म्हणले,त्यांना आता बऱ्यापैकी समज आली आहे.सलील एकटा दादरहून गिरगावात येतो न? त्यांना सवय आता पासूनच करायला हवी स्वावलंबी व्हायची.आणि मी त्यांना तस काही झालं तर घरी फोन करा मी इथं बसून आहे म्हणलो होतो.
तुमच बाई एकेक भलतंच असत. बहीण म्हणली.
मग मेहुणे उठले आणि आमची खरेदी नीट बघितली.आणि दोघांकडे बघत म्हणाले,
तुमच्या खरेदीत परीकथा आणि तत्सम स्वप्नरंजन करणाऱ्या गोष्टींची पुस्तकं दिसतायत.विज्ञान विषयावर ची पुस्तक नाहीत.सलील तू शेरलॉक होम्स च आणलं स पण या पुस्तकात श्रीमान योगी सारखी किंवा ज्ञानेश्वरी,दासबोध का नाही आणावे वाटलं पुस्तक ? बहीण म्हणली,अहो त्यांच वय काय आणि तुम्ही दासबोध काय वाच म्हणताय?
तुला ही समजलं नाही.इतर त्यांच्या वयानुसार पुस्तक आणली ती ठीकच आहे.पण त्या पुढच वाचन हि त्यांनी करायला हवं ते ही याच वयात.त्यांनी जर आज ज्ञानेश्वरी ,दासबोध वाचला आणि त्यातील अगदी थोडं जरी त्यांना समजलं तरी त्यांचा आयुष्य आता कुठं सुरू होईल ,तेंव्हा पुढील आयुष्यात ते वाचलेलं प्रत्यक्ष्यात वापरता येईल त्यांना.जेंव्हा म्हातारे होतील तेंव्हा दासबोध कळून उपयोग नसणारेय कारण जे कर्तृत्व दाखवायचं किंवा लढायचं वय असत ते निघून गेलेलं असत.तेंव्हा दासबोध समजून काय फायदा होणार?म्हणून वाचन आता पासून च चौफेर हवं.
हे बहिणीला पटलं नाही म्हणा पण ती गप्प बसली.
मला ही त्या वेळी काही नीटस समजलं नाही.उज्वला ला म्हटलं,काका अस म्हणले ते आपण जास्त खरेदी केली म्हणून का ?
अरे नाही तस वाटत.आणि तसही मी म्हटलं होतं न तुला कि थोडे तरी पैसे परत देऊ त्यांना.ते दिले न आपण.
मग मला काही कळेना अस का म्हणले ते!
पण आता इतक्या वर्ष्यानी समजतंय त्यांना काय म्हणायच होत.
आणि मग रात्री ते हे हि म्हणले जेवताना, हि पोर टिपिकल मध्यम वर्गीय विचार करू लागलीयत आतापासून.
का म्हणता अस ?या बहिणीच्या प्रश्नावर ते हसून म्हणले होते,चैला याना भरपूर पैसे दिले होते मनमुराद खरेदी करायला त्यातले हि वाचवून मला आणून दिली.
😃

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

नवी ओळख गावाची

घर विकून दशक उलटून गेली.तेंव्हा मुंबई हवीशी वाटली.परिस्थिती अशी नव्हती कि ती प्रॉपर्टी तशीच ठेऊन दुसरीकडे जागा घेऊन रहाता येईल.नाईलाजाने विकावे लागले.पण नंतर ते घर मनातली जागा मात्र सोडत नाही.एक एकर च्या आसपास जागेत घर होत.त्या विस्तीर्ण आवारा मूळ ओढ लागतेय का ? हा प्रश्न मनात आला.पण तेच एक कारण नाही असं जाणवलं.तिथं असताना जी माणसं आजूबाजूस होती त्यांनी जे प्रेम दिल घेतलं ते अजूनही खेच दाखवत असत.आजही गेलो तर माझ्या जागेत मी पाऊल हि ठेवत नाही.तिथं आता लोकांचे बंगले झालेत.पण काही मित्रांच्या घरी जातो.काहींची घर नवीन रूप घेऊन उभी राहिलीयत काहींची मात्र होती तशीच आहेत.काल तर इथं येऊन गेलो होतो इतकी तशीच.पण दोन्ही बाजूची माणस मात्र बरीचशी तशीच आहेत.आजही गेलो कि तिच जुनी सलगी मिळते.नात काही नाही शेजारी होते,पण नातलगांकड जात नाही तिथं मात्र जातो.फक्त गावातली पिढी बदलली त्या मुळे बाकी कुणी ओळखत नाही.
या खेपी मात्र खूप बदललेली परिस्थिती जाणवली.जमलं तर परत तिथं जागा घेऊ ,हे मत राह्यलं नाही.
पूर्वी गावात इतकी सुबत्ता नव्हती.शेती किंवा मुंबई पुण्यात नोकरी करणारे लोक होते.कातकरी संध्याकाळी मजुरी करून जाताना अड्ड्यावर घसा ओला करून घरी जाताना पिऊन धिंगाणा करत असत कधी तरी.गावात हि पिणारे होते पण ते कळत नसे बाहेर.सोमवार च्या बाजारात काही दिवस चक्री फिरत असे तितकंच.ते ही पोलीस बंद पाडत असत.आपसात काही भांडण ही होत .मग पोलीस स्टेशन गाजत असे.पण ते ही क्वचित च.बाकी गावं तस शांत होत.
काल मात्र वेगळं चित्र बघितलं.लोकांनी जमिनी विकून पैसे केलेत.त्या मूळ पैसा असेल तिथं येणाऱ्या अन्य विलासी किंवा तो पैसा काढून घेणाऱ्या गोष्टी आल्यात.जुगाराचे अड्डे,दारूची दुकान झालीत.एक ओळखीचा भेटला. त्याच गणितं माझ्याहून कच्च होत.पुढं शिक्षण डोकं चालत नाही सबब होणं नव्हतं हे तेंव्हाच नक्की झालं होतं.आजही घरच्या सपोर्ट वर आयुष्य सुरू आहे.तर त्याला मी विचारलं,या पोरांकड पैसे कुठून येतात आकडा लावायला?दारू प्यायला? तो शांतपण म्हणला, आकड्यातूनच. म्हटलं किती मिळतील?दारू न चखना चा खर्च निघतो?घरात देणं राहू दे.तो म्हणला, मग.
पण ते खेळतात कसं?किती इन्व्हेस्ट केले कि किती रिटर्न मिळतात?
तो मंद हसत म्हणला,ये सांगतो.मग एक पट्टी खिशातून काढलीन छापील.त्यावर वरची ओळ 1 ते 0 असे दहा आकडे होते. खाली तीन तीन आकड्याचे समूह.त्यांच्या एकाखाली एक रांगा होत्या.
आता हा सिक्वेन्स धरल्यास ही फिगर अपेक्षित आहे.मग त्याचा हिशेब असा होतो.असा आला तर ब्रॅकेट होत.अस आलं ,त्याला संगम म्हणायच.अस त्यानं 15 मिनिट माझं बौद्धिक घेतलं पण शेवटी ते ही गणित माझ्या डोक्यावरून गेलं.म्हटलं हे काही समजत नाहीये.तो हसून म्हणला,लावायला लागलं कि समजेल हळूहळू.मग किती लावू शकतो?
5रु पासून कितीही.
समज 10 किंवा 20 रु लावले तर किती मिळतात?
500रु ही.अरे त्या रूपक न परवा लावले बरेच तर त्याला 3लाख मिळाले.
मी उडालो.म्हटलं मग ते मिळतात कधी आणि रोख देतात का?
म!सकाळी लावले कि संध्याकाळी घेऊन जायचे मिळाले तर.त्याला आम्ही म्हटलं,आता मिळालेत तर कर्ज फेडून घे न मोकळा हो.पण ते कुठलं ऐकायला.परत सगळे घालवले.
हा कारभार सुरू झालाय गावात.तरणी पोर दारू च्या गुत्त्या वर,पानाच्या टपरीवर आकडे लावत किंवा टोळक्याने टिंगल टवाळी करत उभी असतात.शेती विकून किंवा बापाच्या जीवावर घेतलीय ती बाईक,केसांचा नवा भांग, तोंडात सिगरेट.अस नव्हतं पूर्वी.
हे गावातल्या लोकांचं असताना परदेशी लोक म्हणजे भय्ये,बंगाली वग्रे येऊन गावाभोवती असणाऱ्या कंपन्यात नोकरी करून गावात घर घेऊन राहिलेत.किंवा त्या कंपन्यांनी आवारात त्यांच्या करता घर बांधलीत.पाणीपुरी,चायनीज,फळ अस गाड्यावर विकतात आणि पैसे कमवतात.गावातली पोर मात्र  निरुद्योगी होऊन राह्यलेत.किंवा गुंडगिरी बरीच वाढलीय.गॅंग ही तयार झाल्यात.हल्ली काहीजण आत गेल्याने जरा शांत आहे म्हणे.हे कमी म्हणून का काय आता गांजा,ड्रग च्या गोळ्या ही आल्यात गावात.
एकूण निराशाजनक स्थिती बघून वाईट वाटलं.परत तिथं जाऊन राहू हे मत आता बदललं आहे.
आता फक्त जुनी पिढी आहे तो वर कधी तरी त्यांना भेटायला जायचे मग मात्र मनातल्या जुन्या आठवणी ची उजळणी स्वतः शी करण्यात च सुख आहे हे खरं.
काळ बदलला .
तरी साली पावलं तिकडं जाऊ पाहतील च पण पहिली ओढ नक्की नाही रहायची.

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

*पर्वचा*

*पर्वचा*
तिन्ही सांजे च्या सुमारास बाहेरून खेळून दमून आलो कि हातपाय धुवून आधी पर्वचा म्हणायला बसायचाय. ज्याची पाठ नसेल त्याला पापड वाढणार नाही.अशी काकू ची तंबी कानावर यायची.मग निमूट हातपाय धुवून झोपाळ्यावर कडी च्या बाजूची जागा पकडायची धावत जाऊन.मग जे जे सुट्टीत आलेले असत ते सगळे ही बसायचे येऊन.एक रांग पुढं एक माग. ताई कधी आमच्या सोबत झोपाळ्यावर किंवा गर्दी जास्त असेल तर बाजूला सतरंजी वर बसायची.मग एकेक स्तोत्र सुरू व्हायची ज्यात भीमरूपी, रामरक्षा,अथर्वशीर्ष ते सदा सर्वदा अशी यादी असे.स्वयंपाक घरातून खमंग सुवास अस्वस्थ करत असतानाच आतून दम दिला जाई,सलील चा आवाज ऐकू येत नाही.मघा घसा फोडत होता आता बसला का काय? ज्योत्स्ना बारीक लक्ष ठेऊन अस.जो कुणी म्हणत नसेल त्याच नाव मला सांग,आणि कुणाला मदत केलीस तर तुझी ही खैर नाही.तू ही त्याच्या सोबत उपाशी झोप.
ही धमकी त्या वेळी खरी वाटत असे.
मुंबईत हे रोज नसे पण खाली व्यायाम शाळेत शनिवारी कुस्ती न मल्ल खांब खेळत असू.शनिवारी आखाडा उकरून त्यात दही,तूप. लोणी वग्रे घालून सर्व माती फावड्याने एकजीव करायला उतरत असू आम्ही.वस्ताद आणि बाकी पैलवान वर बसून काम करून घेत.मग बाळ मास्तर(आपल्या निशा चे वडील)येत हातात तबक घेऊन.त्यात निरांजन, नारळ आणि प्रसाद म्हणून खडी साखर वग्रे असे.मग तो नारळ फोडून त्याचे तुकडे करायचे.मग आरती ला उभं रहायच.सत्राणे उड्डाणे ते सदा सर्वदा होई.मग तो प्रसाद खायला खूप आवडायचं.
पुढं मोठं झाल्यावर म्हणजे वयाने,हे सर्व माग पडलं.ती ती ठिकाण ही सुटली.मग राम रक्षे चा डावीकडचा अर्थ वाचून अस वाटू लागलं कि, हे रामा माझ्या डोक्या पासून पाया पर्यंत सर्वांच तू रक्षण कर याला काय अर्थ आहे? मग मी काय करायचं? अहंकार नव्हे पण सर्व भार त्याच्यावर का टाकावा आपण ? असे प्रश्न पडू लागले.
आता मात्र वय वाढल्याने किंवा त्या सोबत परिस्थिती चे फटके अनुभवल्याने वेगळं वाटू लागलाय.
कधी तरी अस जाणवत कि, आपलं काम,प्रयत्न सुरूच ठेवायचे पण त्याला मिळणार फळ या वर मात्र हक्क ठेवायचा नाही.जे कृष्ण ही म्हणतो कि, ते माझ्यावर सोड.काहीतरी शक्ती वेगळी आहे जीच आपल्याला आकलन होत नाहीये.आणि त्याच्या वर सर्व भार टाकणे अस नसून माझ्या हातून काही घडलंच चांगलं तर मी फक्त माध्यम आहे कर्ता करविता तोच आहे.त्याची इच्छा म्हणून मला शक्य झालं.हे वाटायच कारण, साधी लचक भरली तर कूस बदलणंच नव्हे तर पाय ही उचलवत नाही.मी मी म्हणणारा माणूस अर्धांग वाताचा झटका आला तर बोट ही हलवू शकत नाही.
आता जाणवत जे म्हणतो त्याचा अर्थ समजला नव्हता तरी तेंव्हा ही आणि आता खूप समजत अस नव्हे पण वय वाढल्यावर ही काहीतरी शांत शांत वाटत.रामरक्षे ची बदलत जाणारी चाल,त्वं अग्नीत्वं वायूसत्वं या ओळी म्हणताना काही तरी वेगळी मजा येते.
ते माजघर,ती माणसं, ते वातावरण याचा पुनः प्रत्यय आतून खूप सुखावून शांत करतो.फक्त आता पर्वचा म्हणायला झोपाळा नसतो,सोबत कुणी नसत,हा sss कोण रे तो तोंडातल्या तोंडात बोलतोय कळू दे मला अशी स्वयंपाक घरातून येणारी हाक नाही.
आमचे तात्या रात्री अंगणात शतपावली करताना तासभर काही तरी म्हणत असत.पुटपुटल्या सारख.हे काय आणि का म्हणत असतात याच कुतूहल होत.एकदा धाडस करून त्यांना विचारलं,तात्या काय हो म्हणता इतकं ?
त्यांनी दीर्घ श्वास घेतला.सौम्य आणि त्यांच्या कडून दुर्लभ स्मित हास्य करत माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणले,अरे आजवर काय काय शिकलोय.ते ते आठवत असतो.घर्षण हवं न,नाहीतर विस्मरण होईल.
तरी त्यांच ते पुटपुटण डोक्यात राह्यलं च होत.पुढं ग्रेस ची ओळ कानी पडली आणि तात्या आठवले.
स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुःख कुणाचे
मग माझा मी अर्थ लावला.कदाचित मोठं झालं कि जबाबदारी मूळ माणूस कुठं कुणापाशी मोकळा होत नाही.कारण तितकं समर्थ कुणी असावं लागतं. मग ग्रेस म्हणला ते खरं असावं.
एवंच परत एकदा पर्वचा म्हणली तर खूप शांत शांत मात्र नक्की वाटत.

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

उस्ताद मेहदी हसन खां

*उस्ताद मेहदी हसन साहब*

गझल ऐकू लागलो ते tv वर मॉडेला वूल स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम मूळ.तलत अझीझ,पंकज उधास ते अनुप जलोटा सारखे आर्टिस्ट त्यात गायचे.भाषेची नजाकत आवडली.मग वहीत शेकड्यानी गझल जमवल्या होत्या ,पण नंतर ती गहाळ झाली.कालांतराने परिस्थिचे थपडे पडल्याने वास्तव समजू लागलं. त्या मूळ असेल कदाचित पण गझल मध्ये लाचारी जाणवू लागली.सारख तो ,तिला विनवतोय.मला वाटत चाचा गालिब च म्हणून गेलेत कि, आग दोनो तरफ हो तो ईश्क मजा देता है.मग भाऊ साहेब पाटणकर वपुंच्या पुस्तकातून परिचयाचे झाले.उर्दूवर प्रचंड प्रभुत्व असलेला माणूस.मुशायऱ्या त जाऊन आपला ठसा उमटवला होता त्यांनी.त्यांना ही ,हि लाचारी पसंत नव्हती.त्यांना ऐकल म्हणजे कळेल मला काय म्हणायचंय.
अस असलं तरी सुरेश भटांची मलमली तारुण्य माझे ते तरुण आहे रात्र अजुनी अश्या गझला मनावर राज्य करत होत्या.मग तबल्यामुळं गुलाम अली यांची चुपके चुपके कैकदा ऐकली .त्यांची लय प्रधान गायकी आणि उस्ताद तारी खान यांच्या तबल्या करता.काय माहोल तयार होतो ,जवाब नही.
त्यातच काही जाणकार मेहदी हसन नाही ऐकला तर गझल काय ऐकली म्हणले.तारी खान त्यांचे तबला वादक असले तरी गाण्यात त्यांचे शिष्य होते अस ऐकल.अलीकडं तू नळी मूळ तारी खा साहेबाना रंजीश ही सही गझल पूर्ण तयारीनिशी आणि स्वतः तबला वाजवत गाताना ऐकल आणि अक्षरशः हात जोडले. कारण नुसता ठेका नाही तर उठाण लग्गी तिहाई ,मध्ये भरणा अस सर्व व्यवस्थित वाजत होत आणि गात ही होते.मग मेहदी हसन साहेबांची रेकॉर्डिंग ऐकली.खर्जा चा घोगरा तरी नजाकत भरा आवाज ऐकून लोक म्हणतात ते पटलं.ती गझल गावी तर त्यांनीच किंवा ऐकावी ती त्यांचीच.सोबत तारी खां असले तर सोने पे सुहागा.
तर मेहदी हसन खां मूळचे भारतातले.राजस्थान राजवाड्याचे दरबारी गायक त्यांचे वडील होते.
आता खान आणि खां साहेब यातला फरक त्यांनीच सांगितलाय एके ठिकाणी.
पठाण लोकांना खान म्हणतात.
पण ज्याच्या किमान तीन पिढ्यात उत्तम आणि लोकमान्य गवई किंवा वादक होऊन गेलेत त्यांच्या पुढील पिढीत जर कुणी कलाकार असेल तर त्याला खां हा बहुमान मिळत असे.यांचं घराणे तर कैक पिढ्या राज गायकांच्या होत्या अस होत.वडील जयपूर दरबारी होते.कसली तदात नव्हती.मेहदी हसन 12 का 13 व्या वर्षी बडोद्याच्या महाराजां समोर हजेरी लावते झाले.40 मिनिट गाणं झालं.महाराजांनी त्यांना सोन्याचं कड आणि पोषाख देऊन गौरवलंच पण आज पासून हा आमचा दरबारी गायक झाला म्हणून घोषित केले.
तोवर वातावरण बदलू लागलं होतं.वडील मग काही काळ नेपाळ वग्रे ठिकाणी ही दरबारी गायक म्हणून गेले.पण फाळणी झाली नी हे कुटुंब पाकिस्तानात गेले.सर्व शांत झाला कि येऊ परत म्हणून.पण वडील इकडं आल्यावर कळलं कि सर्व लुटल गेलंय. मग हाती लागल ते घेऊन परत गेले.
तिथं ही जे होत ते विकत राहून यांची गुजराण सुरू होती.तालीम तर जोरदार होतीच पण,गाणं करायचं तर तब्येत उत्तम हवी.छातीत दम हवा.या करता त्यांना वडील व्यायाम करायला लावत.बर तो ही साधा नव्हे.
पहाटे 3 वाजता उठायचं.आधी 500 मग 1200 वर गेलेल्या जोर आणि बैठका.3 मैल धावणे.गावात एक मैदान होत त्याला चक्कर धावत मारायची.पहिल्या ठिकाणी आल्यावर बैठका मारायच्या मग पुढं दुसरी फेरी.अश्या तीन फेऱ्या झाल्या कि शेवटची फेरी हळूहळू धावत मारायची.
हे करायला खुराक ही तसाच होता. सहा शेर दूध एक दमात प्यायचं.पाऊण शेर देशी तूप,1छटाक गोश्त आणि बदाम ,पिस्ते ,काजू असा आहार.संध्याकाळी 4,5 मल्लाना प्रत्येकी थकवायच यांनी तेही दहा मिनिटात.मग यांचे काका उतरत त्यांना थकवायच.
बाकी रियाज होताच.
करता करता एक दिवस वडील म्हटले,आता आपल्या जवळ विकायला काही नाही.तेंव्हा उदर निर्वाह करायला म्हणून मी धंदा करणारेय.त्या करता एकाला 10 हजार उरले होते ते दिलेत. तो उद्या लाकडं आणील.
म्हणजे तुम्ही काय धंदा करणार आहात?
लाकडाची वखार टाकतोय आपण.
पण मग तुम्हाला सगळे वखार वाले म्हणतील!
हो पण इलाज नाही.तुझी तालीम ,खुराक,कुटुंबाचा खर्च ही आहेच.
नाही हे नाही पटत मला.तुम्ही मला पैसे द्या मी काही धंदा करीन आणि कमवेन.
वडील हसले आणि दहा रु काढून दिले.
मग त्यांनी एक मातीच बांधलेलं दुकान त्यांना देण्यात आलं होतं ते चालवायचं ठरवलं.राजदरबारात बालपण गेल्याने राजाच्या मोटारी,पंप वग्रे रिपेअर करायला माणस होती.यांना त्या टेक्निकल गोष्टीं ची आवड असल्याने तिथं उभं राहून सर्व टिपलं होत. मग त्या दहा रुपयात दीड रुपयांचा पंप,जुने टायर,स्क्रू ड्रायव्हर अशी जुजबी खरेदी केली.5 दिवस रिकामे गेले.मग मात्र बाईक,सायकल,मोटारी रिपेअरिंग करता येऊ लागल्या.13 रु च्या आसपास रोज मिळकत होऊ लागली. वडिलांना रोज 5 रु दिले जात होते.ते ठीक आहे न म्हणून विचारलं तर वडील म्हणले,अरे यात सर्व होतय.
पण या धंद्यावर अवलंबून रहाणं ठीक नाही म्हणून भावाला तिथ बसवून हे लाहोर ला गेले.तिथं ट्रॅकटर कम्पनीत जाऊन आपली कहाणी सांगितली.त्या लोकांनी ही ठेऊन घेतलं.यांनी फिट केलेले 300 पंप होते त्या परिसरात.काम बघून फर्ग्युसन कम्पनी ने त्यांना उत्तम कारागीर म्हणून सर्टिफिकेट दिल.
मग एक माणूस म्हणला, हे काय करत राह्यलास माझ्याकडे ये.मला एक जमीन लीज वर मिळालीय.ती पडीक आहे. तिला उपजाऊ करायच आहे.हे ही गेले त्याच्या बरोबर.त्या गृहस्थाला इतर कंपनी नी सांगितलं होतं कि, या जमिनीस वसवायला तीन वर्षे हवीत आणि यंत्र सामुग्री हवी.
त्या माणसाकडे आता पैसे शिल्लक नव्हते.मेहदी हसन म्हणले मला फक्त एक ट्रॅक्टर आणून द्या.त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी ती जमीन एक वर्षात नांदती केली.पीक नीट एक ओळीत लावलेली. ती बघायला लोक लांबून येत.
तेंव्हाच त्यांना एक पत्र आलं.त्यांचं गाणं नुसतच साथीला काही नसताना एक लग्नात ऐकल होत एकाने.तो इतका खूष झाला कि म्हणला,मी जेव्हा सिनेमा काढीन त्यात तूच गाशील.हे हजार रुपये हवं तर टोकन म्हणून ठेव किंवा बिदागी म्हणून.
तर त्यानं सिनेमा काढायचं ठरवलं तर याना करारपत्र न पैसे पाठवले आणि ये म्हटलं.मग ज्याची जमीन होती त्याला हे सांगून तिथून निघाले.गायलेली गाणी गाजली.रेडिओत बोलावलं. त्यांची ऑडिशन 5 तास झाली.धृपद ते सिने संगीत यांनी ऐकवलं.बुखारी साहेब म्हणले याल ठेऊन घ्या.पगार किती तर 35 रु म्हणले.बस इतकंच?तर समजलं इतरांना 12रु च मिळत.मग आणि काय देणार तर A ग्रेड रेडिओ ची मिळाली.मग हळूहळू नाव झालं आणि पसिद्ध झाले.लहानपणी लग्न झाल्यानं लग्नात बायको 13 वर्ष्याची होती.तिचे आई वडील गेल्याने तिला तू आता घेऊन जा म्हणाले.मग तिला स्वयंपाक वग्रे ही यांनीच शिकवलं.मग आणखी ही एक लग्न झालं होतं.,
मध्ये हिंदुस्थान मध्ये राजस्थान ला बोलावलं.ते आले गायले. पण त्यांच्या जन्म गावी भेट द्यायची म्हटल्यावर व्यवस्था केली गेली.तिथं जाऊन आल्यावर अधिकाऱ्याने विचारलं,कसं वाटलं जाऊन?सुधारणा आहे का नाही?तर तिथं आता खूप सुधारणा आहे पण अजून रस्ता ,वीज,पाणी नाहीये.मग इतर व्यवस्था केली गेली पण रस्ते झाले नाहीत.तेंव्हा मेहदी साहेब म्हणले, मला काही करायचंय गावकऱता करू का ?मग त्यांच्या कार्यक्रम ठेवला गेला गावात.दीड दोन लाख लोक होते आलेले आजूबाजुहून.ते उत्पन्न त्यांनी रस्त्याकरता दिले आणि रस्ता झाला., झून झून नाव मला वाटत गावाचं.
इकडं लता दीदी पासून सर्व त्यांचे चाहते होते. आले घरी कि दीदी स्वतः त्यांना करून वाढत.
त्यांचे शेवटचं दर्शन जे पाकिस्तान tv वर झालं ते मात्र बघवले नाही.सुन्न व्हायला झालं.पहाडा सारखा माणूस ओळखू येईना असा गलितगात्र झालेला.त्यांच्या मुलाने सांगितलं,हमारी दोनो अम्मा जबसे गयी तबसे इन्हो ने हाय ले ली है.
कलाकार म्हणून मोठे होतेच पण वेळ आली तेंव्हा कला बाजूस ठेऊन कुटुंबा करता अर्थार्जन इतर मार्गाने इमानदारीत आणि समर्थ पण केलं हे विशेष.,
ते म्हणले,जे ठरवलं ते करायचंच.होतच.अल्ला से मांगो दिल से तो वो दे देता है बस मांगनेका तरिका आना चाहीये.या दुसरे मायनो मे विल पॉवर स्ट्रॉंग होनी चाहीये.
हे सर्व त्यांच्या मुलाखतीतून समजलं.आणि कलाकारा मागचा माणूस ही समजला आणि 🙏🏻

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

भटकंती,वडोदरा

भटकंती करताना काही ठिकाण खूप प्रेमात पाडतात. जी थोडीशी भटकंती केली ती गडांवर आणि काही शहरात .
गड भटकताना गडावर त्या ठिकाणीच पावित्र्य न जपणारे बेजबाबदार लोक सोडले तर बहुतांश ठिकाणी गड पायथ्याशी असणारे गावकरी सज्जन,प्रेमळ च भेटले. काही लोक गडावर येणाऱ्या लोकांच्या खाण्याची रहाण्याची सोय उदरनिर्वाहा करता करतात.पण व्यवहार जपून ही अधिकच अगत्य इतकं दाखवतात कि ऐतिहासिक वास्तू इतकच त्या लोकांकरिता  त्या ठिकाणी परत जावंसं वाटत रहात.
कोल्हापूर आणि बडोदा हि मला आवडलेली ठिकाण .तिथल्या इतर प्रसिद्ध गोष्टीं पेक्ष्या लोकांच्या वागणुकीमुळे. पैकी बडोद्यात तर जाऊन स्थायिक व्हावं अस मनात आहे.
का ? तर,
तिथले लोक वागताना अतिशय सौजन्याने वागले असा अनुभव.रोजच्या व्यवहारात कुठं राग ,चिडचिड नाही.आवो भाई म्हणून स्वागत करतील.कंडक्टर प्रवासी लोकांशी सौजन्य सप्ताह नसताना सौजन्याने वागतो. जुन्या फाटक्या नोटा प्लास्टिक च्या छोट्या पिशवीत घालून एका आजीने दिल्यानंतर त्या स्वीकारताना पाह्यला जुनागड गिरनार ला जाताना.शेजारी प्रेमानं वागताना पाह्यलं.परवाच बसने गेलो.उतरायचं ठिकाण मला माहित नव्हतं.भावाचा फोन आला ,कुठं उतरवतोय विचार ?त्याला फोन जोडून दिला ड्राईव्हर सोबत.ड्रायव्हर न सांगितलं चकली सर्कल.भाऊ म्हणला,जमत असेल तर गोत्री जवळ उतरवून दे मला आणायला जवळ पडेल.यावर ड्रायव्हर आपुलकीनं म्हणला,जो भाई मारी 3 सीट खाली छे. ए जो ना भराय न त्यारे भाई ने गोत्री उतारी देऊ छु.
जो न जमतु होय तो सारू .फोन करीन जणावसो मारे तो हूं त्या आवि जाऊ अने लेवा.
फिकर नही करता भाई आऊ छु चालो तमारा भाईन लैने गोत्री.एक लेफ्ट मारवी पडशे खरी मारे पण आऊ छु हं.
अस आऊट ऑफ द वे जाऊन मला घराजवळ उतरवलंन.परत उतरताना,जय श्रीकृष्ण हं भाई,अवजो हा फरी थी. म्हणून मला निरोप ही दिलन प्रेमानं.
आत्ता येताना ही गाडी बुकिंग वेळी ठरल्या वेळे आधी 2 तास आली. फोन आला,कुठं आहात साहेब गाडी येऊन राह्यलीय.म्हटलं बुकिंग केलं तर 12 च टाईम होत तुम्ही 2 तास आधी कस येता ?भावानं फोन घेतला न तेच पुन्हा शांतपणे सांगितलं.तो म्हणला, ऑफिस वाल्यांचा काहीतरी गोंधळ झाला बहुतेक पण गाडी तुमच्या करता थांबलीय. भाऊ म्हणला,जाऊ नका मी येतोय घेऊन भावाला.तर तो ही म्हणला ,या सर घाई करू नका थांबतो तुमच्या करता.
मी मुंबईकर, टाईम दिल न आधी गाडी कशी येते ? म्हणून डोकं फिरलं.पण भाऊ बडोदेकर.शांतपणे म्हणला,अरे होत असं कधी कधी.ऑफिसमध्ये घोळ असेल काहीतरी झालेला. किंवा काल आपण बुक केली सीट तेंव्हा फक्त तुझंच बुकिंग होत बाकी गाडी खाली होती.अमदाबाद वरून बुकिंग नसेल तर त्यांनी दुसऱ्या गाडीत सोय केली असेल.चल जाऊ आपण.त्यानं हायवे ला आणलं.गाडी आली.मी त्या माणसाला म्हणलो,तुम्ही टाईम 12 च दिल न 2 तास आधी आलात आमची धावपळ झाली.
तो शांत पण म्हणला, भाई कुछ गडबड हुई खरी.ऑफिसमध्ये लोकांनी चुकून दिली असेल वेळ
सॉरी हं.
मग शांतपणे विचार केला,ज्या करता बडोदा आवडलं त्याच उदाहरण भावानं शांतपणे वागून दिल कि! मग मी ही त्या अटेंडन्ट ला म्हणलो,जाने दो चलो.सोपारा फाटा उतारदो. तो ही मंद हसत म्हणला,हा भाई.
तर असा अनुभव.कुठं घाई गडबड, राग,चिडचिड नाही.
अर्थात तिकडं अस काही शंभर टक्के असेलच असे नाही,पण मला आलेले अनुभव चांगलेच होते.मामा कुणा कुणाकडे नेत होता. हा माझा भाचा आहे.तबला शिकवतो.त्याला इकडं आणायचा विचार आहे माझा.यावर ते लोक म्हणत,जरूर या.इकडं असे लोक हवेच आहेत आम्हाला.आमच्याकडुन होईल ते नक्की करू.काही ना काही होईलच जरूर या.
बाकी रस्ते उत्तम नी प्रशस्त.खाण्यापिण्याच्या मुबलक जागा.फूड कोर्ट कल्पना उत्तम राबवली जातेय.
एकूण बडोदा अनुभवायला हवं असं शहर.
कोल्हापूर विषयी पुन्हा लिहिन.
तो वर भटकत रहा.मजा येते.नवी ठिकाण आणि त्या ही पेक्षा माणसं अनुभवायला.