मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

माई आजी

                     - माई आजी -
          माई आजीशी भेट व्हायच्या आधी एक अभिनेत्री होत्या मराठी सिनेमात त्यांची आठवण होते.मला वाटत इंदिरा चिटणीस.कजाग,खाष्ट सासू चे रोल त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केलेत.माई आजी अगदी तशी होती.पण दिसण्यात खूप उजवी.भारदस्त व्यक्तिमत्व.उंची बेताचीच.रंग गोरा.गोल चेहेरा.आणि तोंडाचा पट्टा सतत सुरु.तिच्याशी कुणी सुसंवाद साधून दाखवावा.शक्यच नव्हतं.नेहेमी वाकड्यातच बोले.तिला कुणी पूर्ण दिवस खूष ठेवील तो भारत भूषण सन्मानास पात्र ठरावा. अपवाद फक्त तिची मुलगी,जावई अन नातू. बाकी सर्व लोक म्हणजे, हं.
हि माझी तशी आजी नव्हे.आजोबांची बहीण, आत्याची आई.
राहायची ती ही शहाण्यां च्या चाळीत पेण ला.
कौतुक फक्त तिच्या आपल्या माणसाचं.दिवसभर कुणा न कुणाला सुनवत असे.
कुणी माई रिझल्ट लागलाय,फर्स्ट क्लास मिळाला.म्हणत पेढे घेऊन आला तर,हो का!आमचा विन्या पण आहे हो बिकाम एलकॉम.पण थांब वडी खाऊन जा श्रीखंडाची.
मोळी विकायला कुणी कातकरीण दारावरून चालली कि तिला हटकून बोलावी.भाव विचारिल,कुठून आलीस ,कोण अस्त घरी अशी चवकशी करून घ्यायची काही नाही. पण थांब उन्हाची आलीस तर गुळ पाणी घेऊन जा म्हणे.हळूहळू त्या बायका आपणच ओटीवर पायरीशी बसून गुळ पाणी घेऊन जात.माझ्या आईला काही बोलली म्हणून मी तिच्याशी जाम भांडलो.तिला असं ऐकायची सवय नव्हती.चकित होऊन गप्प बसली. अगदी बापा सारखा आहेस म्हणली.मी म्हणालो,मग आहेच त्यांचा मुलगा न तुझा लांबचा का होईना नातू.मग हळूच गालात हसली.म्हटलं जातो आता तू काही सरळ बोलाची नाहीस न मी उगा ऐकून घ्यायचो नाही.तर म्हणली,शहाणा आहेस फारी, इकडं ये.मग कडोसरी चे पैसे कडून माझ्या हातावर ठेवलेन.माग जत्रा आहे भरलेली.तिथं दंगल आहे कुस्त्यांची ती बघ अन खादामीच हि असेल काही ते खा जा.आणि आता आत्या कड जाऊ नको,तिला काम असतात.
तू नको काळजी करू ,तिच्याकडे जाणारच.ती माझी आत्या आहे,नाही गेलो तर वाईट वाटेल तिला.
तू काय ऐकण्यातला नाहीस,मर कर हवं ते.ऐक तिला म्हण येऊन जा एकदा इकडं मी जिवंत आहे कि नाही बघायला.
तिला मी सांगतो न आहे हो माई अजून शाबूत.
हाड मेल्या कर काळ इथून.
अशी होती. फटकळ होती, फक्त आपल्या लोकांच कौतूक असणारी वाटायचं. ते काही अंशी खरं असलं तरी आतून प्रेमळ होती.पेण ला जाऊन तिला भेटलो नाही कि पुढील भेटीत उद्धार झालाच म्हणून समजा.शहाण्याच्या चाळीत अराम खुर्चीत बसून आलं गेलं न्याहाळत बसणारी.उगा त्यांना बोलवून चवकशी करणारी माई गेली नी शहाणे ची चाळ हि.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

ताबा



डॉक्टर सुशांत शेवटचा रुग्ण तपासून जायच्या तयारीत असतानाच इंटर कॉम वाजला.कॉल गायन्याक डॉक्टर
सुनंदा चा होता.
बोल ग झाली का डिलिव्हरी करून तुझी?
नाही रे वेळ लागेल अजून.पण तू फ्री झालायस का ?
हो निघतच होतो इतक्या रिंग वाजली.
मग मी येऊ का,जरा बोलायचंय महत्वाचं.
मग त्यात विचारतेस काय ,ये लगेच.
दार उघडून सुनंदा आता आली.
बोल काय म्हणतेस.
अरे जरा निवांत वेळ आहे न तुला?
तू बोल ग.काही नाजूक समस्या आहे का.
हो ,म्हणालास तर आहे हि किंवा नसेल हि.माझ्या मनाचे खेळ हि असतील.म्हणून म्हटलं तुझा सल्ला घ्यावा.सायक्लोजीकली तुझं मत हवंय मला.
बोल मोकळेपणी.
अरे कसं सांगू कळत नाही.
जमेल तिथून सुरुवात कर.
हल्ली न पंकज ची काळजी वाटतेय.
काय झालं. त्याला काय धाड भरलीय,काल तर आम्ही ट्रेक वरून आलो.थोडा थकवा असेल.तू डॉक्टर असून घाबरतेस.
तस नाही रे.बाकी एकदम ठणठणीत आहे तो.पण गेले काही दिवस जरा विचित्र वाटतंय मला त्याच वागणं.
नक्की काय म्हणजे.
म्हणजे एरवी काहीच नाही.नॉर्मल असतो.पण पहाटे पहाटे तो माझा नसतो असं वाटून रहात सारखं.
कशावरून म्हणतेस असं.
तो खूप गाढ झोपेत असतो. चेहेऱ्यावर तृपीचे भाव आणि ओठावर मंद हसू असत.त्या वेळी बघत राहावंसं वाटत त्याच्याकडे.
मग प्रॉब्लेम कुठाय? छान आहे कि मग.
इतकंच नाही.तो त्या वेळी हिप्नोटाइझ झाल्या सारखा असतो.आपण उठवलं तरी उठत नाही.शुद्धच नसते.पण तरी तृप्त असतो.हे मला विचित्र वाटत.परवा सोनू ट्रिप हून आली. तिच्यावर त्याचा किती जीव आहे माहितीय तुला.तिला आणायला आम्ही दोघे जाणार होतो.मला झोपच लागलीं नाही.जा मात्र त्या अवस्थेत गेलेला.उठलंच नाही ठिम्म किती हलवला तरी.शेवट मी एकटीच गेले तिला रिसिव्ह करायला.सोनूला हि धक्काच बसला बाबा आला नाही म्हणून.तिला वाटलं तो आजारी आहे न मी सांगत नाहीये खरं.गाडीतून उतरली ती तशीच बेडरूम मध्ये गेली.खूप हाक मारल्यानं पण तो उठलाच नाही.पोर रडवेली झाली.का ग असं करतोय हा म्हणली.शेवट मी म्हटलं सुशांत काका बरोबर ट्रेक ला जाऊन आलाय न दमला असेल. तू झोप मग बोल त्याच्याशी.
हे जरा वेगळं आहे तू म्हणतेस तस.तुझ्या दृष्टीनं काही फिजिकल प्रॉब्लेम तर दिसत नाही न.
अजिबात नाही.लक्ष असत माझं.bp ची सुद्धा गोळी नाही अजून.म्हणून तर तुझ्याकड आले.काही मानसिक वग्रे असण्याची शक्यता आहे का बघ न तू.पण त्याच्या नकळत.
हो ती काळजी घेईन मी.मला एक सांग तुमच्यात काही तणाव किंवा त्याला काही टेन्शन वग्रे आहे का कसलं सध्या ?
नाही रे काहीही नाही.
मग जरा स्पष्ट बोलू तुमचं रिलेशन त्या बाबतीतील कसं आहे?
ते हि सुरुवाती पासून आहे तसेच ,तितकंच उत्कट आणि समाधानी आहे.खोड काढायला जागाच नाही.
मी असं करतो त्याला निवांत भेटतो ,बघतो काही क्लू मिळतो का तू काळजी नको करू.ओके.
हं.बघ बाबा काय ते.मी निघते.
चार दिवसांनी सुशांत नी सुनंदाला परत भेटायला बोलावलं.शेवटचा पेशन्ट बाहेर पडला आणि त्यानं फोन केला.
सुनंदा माझं आटोपलंय काम तू तयार आहेस का?
हो तुझ्या कॉल ची च वाट पाहत होते.
गुड चल मग निघूया.
मग दोघे हॉस्पिटलच्या बाहेर लॉन वर असलेल्या कॅन्टीन मध्ये बसले.रात्र झाल्यानं कुणी नव्हतं .दोन सँडविच आणि कॉफी ऑर्डर केली. सँडविच आलं .
आधी खाऊ मग बोलू .
ओके.
मग कॉफी आली.
बोल सुशांत .काय वाटत तुला ?
खरं तर वरवर पहाता सगळं ठीक आहे.तू म्हणलीस म्हणून मी हि त्या दृष्टीने विचार करतोय.त्या एका गोष्टी व्यतिरिक्त आणि काही बदल त्याच्या वागण्यात.
काहीच नाही अगदी आहे तसा आहे.
हे रोज होत का.
नाही पण हल्ली फ्रिक्वेन्टली वाटतंय.
उठल्यावर त्याचा मूड कसा असतो. चिडचिड करतो ,हरवलेला असतो असे काही.
नाही रे उलट खूप फ्रेश असतो.
स्ट्रेंज आहे.
मग रे ? काय आहे हे?
तसं अवघडच असत हे सर्व.बाकी कुठलं लक्षण नाही त्या मूळ ट्रीटमेंट चा प्रश्नच नाही.बरं तू हे कुणाला बोलली आहेस माझ्या शिवाय.
हो माझी मैत्रीण म्हैतीय न ती स्वाती तिला.तीन आणखी दिवे लावून टेन्शन दिल.म्हणे करणी वशीकरण सुद्धा असत हो.तुम्ही डॉक्टर लोक विश्वास नाही ठेवणार म्हणा.
हा हा .तसं नसतंच.
मग उपाय काय ?
एक आहे मी त्याला हिप्नोटाइझ करतो आणि मनातलं काढायचा प्रयत्न करू.
अरे मग त्याला सांगावं लागेल.
हो ,पण वेगळ्या प्रकारे सांगू.मी वीकेंडला येतो.मस्त जेवू. तो माझी टर उडवत असतो मला करून दाखव हिप्नोटाइझ म्हणत.ते त्याच आव्हान स्वीकारतो सांगून करतो.
पण मग पुढं त्यांन विचारलं कि काय झालं ? मी काय बोललो ? तर काय सांगायच ?
मला जमलंच नाही म्हणून सांगीन.
असं करता येईल ?
हो प्रयत्न करीन कारण तो खम्बीर मनाचा आहे.पण माझ्यावर प्रेम असल्यानं विश्वास हि आहे त्याचा .दुसरं माझा हि अनुभव आहे म्हटलं.फक्त तू तिथं थांबायचं नाही यो कदाचित कॉन्शस होईल.
पण मला जे होईल ते तू खरं खरं सांगायचं, प्रॉमिस कर.
प्रॉमिस.येतो मग रविवारी.
रविवारी ठरल्या प्रमाण सर्व सुरळीत पार पडलं.सोमवारी सुनंदा सुशांतच्या केबिन मध्ये अधीर होऊन बसलेली.
बोल सुशांत काही सापडलं?
हं.जरा विचित्रच आहे तू म्हणलीस तस.
काही सिरीयस आहे का रे जास्त.
असय कि हे मलाही कोड्यात टाकणार आहे.अशी केस इतक्या वर्ष्याच्या प्रॅक्टिस मध्ये पाहिली नव्हती.
माझी छाती धडधडतेय.
शांत हो आधी.काळजी करण्या सारखं काही नाही.किंवा पंकज मनोरुग्ण हि नाहीये मी खात्री देतो तुला.
थॅंक गॉड, मग हे काय आहे.
ऐक, मी त्याला हिप्नोटाइझ केलं.त्याच कुणावर प्रेम होत का ? काही तुझ्या पासून लपवली आहे आधी गोष्ट आहे का ? असा विचारलं,तर उत्तर नाही असेच आलं.तो तुझ्यावर पूर्वी सारखंच प्रेम करतोय.
मग .
मग त्याला म्हटलं तू पहाटे काय करतोस.तर झोपलेला असतो म्हणला.मग कधी कधी तू खूप खुश होऊन हसत असतोस ,जागा होत नाही तेंव्हा काय होत असत झोपेत.या प्रश्नाचं उत्तर ऐकून मी गार झालो.
काय म्हणला ?
तो म्हणला त्याच्या स्वप्नात ती येते.मग आम्ही खूप गप्पा मारतो,हिंडतो फिरतो,मजा करतो. तिच्या बरोबर वेळ कसा मजेत जातो.मग मी विचारलं,त्या वेळी कुणी हाक मारली तर तुला कळत?तर म्हणला अजिबात प्रश्नच येत नाही.ती मला गुड बाय म्हणून गेली कि च मी जागा होतो.तो वर मी तिचाच असतो.
मग ती कोण आहे,तुझ्या ओळखीची कि कल्पनेतली?
नाही मी ओळखतो तिला.आमची भेट माझं पोस्टिंग हिमाचल ला झालं तेंव्हा झाली होती.
म्हणजे तुम्ही प्रेमात पडला होतात?
नाही फक्त कलीग आणि म्हणून छान मित्र हि झालो होतो.
तुझ्या मनात ती भरली होती का ?
उत्तर आलं, मी तसा विचारच केला नाही कधी त्या वेळी तिच्या बाबतीत.कारण माझं लग्न सुनंदाशी झालेलं होत आणि आम्ही सुखात होतो.पण ती माझी विशेष काळजी घेत असे.खूप मानायची मला.
तर हे असं आहे.
अरे सुशांत मला काही समजत नाहीये,हे काय आहे?
सुनंदा मी माझ्या परीने निष्कर्ष काढलाय.
ती जी कुणी होती तिच पंकजवर मनापासून प्रेम होत.पण हा संसारी आणि सभ्य असल्यानं तिला ते व्यक्त करता आलं नाही.तिच्या मनांत हा अजून आहे.माझा अंदाज असा आहे कि, ती पहाटेच्या वेळी यांच्या बाबतीत स्वप्न रंजन करते.तिची याच्या विषयी ओढ इतकी तीव्र आहे कि ती याच्याधी मानसिक कनेक्ट होते.याच्या मनात तिच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर असल्यानं हा हि तिच्या प्रभावाखाली येतो.दोघाचं मानसिक मिलन सुरु होत.पण जाग आली कि याला काही आठवत नाही.असं म्हणूया कि ती उत्तर रात्री यांचा ताबा घेते.
तेंव्हा तो तिचाच असतो.
हे असं आहे? असं होत,होऊ शकत ?
हे माझं लॉजिक आहे.तुला माहितीय न ती थिअरी,तुम्हाला जे हवंय त्याचा सतत विचार करा.त्या दृष्टीने पावलं उचला ती गोष्ट तुमच्या मनाच्या ताकतीने,इच्छा शक्तीने तुम्हाला मिळते.हे हि तसेच आहे.तो तुझाच आहे फक्त त्या वेळी तिचा असतो.
हे भयंकर आहे.हे थांबवता येणार नाही का ?सुनंदाच्या डोळ्यांत पाणी तरारल.
त्याच्या मेंदूतून तिच्या स्मृती पुसणे कठीण आहे.जो वर या गोष्टीचा जास्त त्रास होत नाही तो वर आपल्या कडे वेळ आहे.मी माझ्या ओळखितले विदेशी मनोविकार तज्ञ आहेत त्यांच्याशी डिस्कस करीन.मार्ग निघेल.
सुशांत नको तस करू.
का ग?
अगदीच हाताबाहेर गेलं तर पाहू.तो एरवी नॉर्मल असतो.असा स्वप्नातून जागा होतो न तेंव्हा इतका फ्रेश दिसतो कि दृष्ट काढावी. आणि एक सांगू.ती जर इतकं प्रेम करू शकतेय इतक्या दुरून तर तिला हे सुख लाभू दे रे.तिच्या साठी मी पंकजला शेअर करीन. उत्तर रात्री चे काही प्रहर काही दिवस तो तिचा असू दे.तो माझ्याशी प्रतारणा करत नाहीये,त्याला हे होतंय यांची जागेपणी जाणीवच नसते मग हरकत नाही.पण हे तुला तो बोललाय हे त्याच्या लक्ष्यात असेल न?
नाही.तशी कमांड दिली होती त्याला,जागा होशील तेंव्हा आताच आपलं बोलणं तुला आठवणार नाही.पण सुनंदा तू ग्रेट आहेस.पंकज खरच नशीबवान आहे.दोन्ही कडून ताबा असलेला.



रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

मेहबूब कि मेहेंदी

आपल्या वेळचे सिनेमे अन आताचे सिनेमे ,मजा नाही यार हल्ली.टेक्निक पुढं गेलंय पण ती बात अवचित च दिसून येते.काही उदाहरण देतो मग पटलं तर बघा.
गाणं ऐकत होतो ये जो चिलमन है दुष्मन है हमारी.सिनेमा मेहबूब कि मेहंदी.हिरो हिरविण प्रशस्त दिवाण खान्यात, मस्त जाळीदार पडदे लावलेली पार्श्वभूमी.हिरो रफी साहेबांच्या आवाजाला साजेसा मुद्राभिनय करत गातोय,
ये जो चिलमन है दुष्मन है हमारी.
मग ये जो आंचल है शिकवा है हमारा,
ये जो गेसू है बादल है कसमसे,असं म्हणत एकेक कडवं येत मग शेवटच्या कडव्यात
रुख से पर्दा जरा जो सरकने लगा
उफ ये कम्बखत दिल क्यो धडकेने लगा ,म्हणतो तेंव्हा ती हळूच त्याच्या अगदी जवळ नकळत जाऊन छातीवर डोळे मिटून डोकं ठेवते तेंव्हा पुढचे शब्द येतात,
ये जो धडकन है दुष्मन है हमारी
त्या क्षणी ती लाजून झटकन बाजूला होते.
आता हे असं का होत ? हे समजायला जी नजर हवी ती आपल्या वेळी होती.आता असा नाजूक कल्पनाविष्कार मिळत नाही बघायला.या सिनेमात गाणी उत्तम होतीच पण सर्व कलाकार,लेखक,दिगदर्शक यांनी मिळून जे वातावरण, जी तेहजीब उभी केलीय त्या करता संग्रहात ठेवावा अश्या सिनेमात हा सिनेमा येतो.हिरो हिरविण एकांतात भेटलीयत पण कुठं वासनेची वख वख दिसत नाही.दिसतो तो फक्त संयत असा प्रणय, अदबशीर रित्या.

*आठवण*

*आठवण*
काहीच दिवस असे असतात जे कायम आठवणीत रहातात. जसा बावि च्या g2g चा दिवस.आज अजून एक दिवस आठवला. रवी ला मुलगी झाली हे समजलं पण जाता आलं नाही.मध्ये काही वर्षे उलटली.अचानक त्याच पत्र आलं नवा ब्लॉक घेतलाय, तुला आवडेल अश्या एकांत ठिकाणी आहे बहिणीच लग्न हि आहे तू त्या दिवशी येतोयस.मन्या हि वाट बघतेय तुझी.
मन्या वाट बघतीय म्हणला न मध्ये किती वर्षे गेली हे जाणवलं.तिला पाहिलीच नव्हती कधी.तरी ती वाट बघतेय म्हणला गम्मत वाटली.न जाण शक्यच नव्हतं.नवा पत्ता शोधत गेलो.त्यांन दिलेल्या खुणा शोधत तिठ्या वर हातातल्या पत्रा कड पाहत बरोबर आलो न पहात होतो.खुणा बरोबर टिपत आलो होतो.समोर आडवे ठाण मांडून बसलेली इमारत दिसली.त्यानं लिहिल्या प्रमाण डावीकडे असलेल्या ब्लॉक ला नवं लावलेलं ग्रील दिसलं.म्हटलं चला आलो बरोबर,कुसुम निवास बिल्डिंग चा बोर्ड हि दिसला. इतक्यात सलील काका sss अशी बेंबी च्या देठा पासून मारलेली हाक ऐकू आली.आश्चर्य वाटून नीट पाह्यलं तर एक गुडघ्या एव्हडी पोर त्या ग्रील वर माकडा सारखी चढून मला हाक मारत होती.गोरी गोरी इवलीशी. पाठीवरची सॅक सम्भाळत पुढं गेलो.ती धप्पकन ग्रील वरून खाली उडी मारून दिसेनाशी झाली.मग खाडकन दरवाज्याची कडी उघडल्याचा आवाज आला.तिथं पोचायच्या आत ती धावत आली आणि पायांना मिठी मारत म्हणली किती वाट बघितली म्हैतीय.चल आता लवकर.म्हणत बोट धरून निघाली.रव्याची बायको पुढं आली, ये बाबा आज सकाळी उठल्या पासून अख्ख्या बिल्डिंग ला सांगून झालंय माझा सलील काका येणारेय आणि ग्रील वर चढून वाट बघतेय.मग आत गेल्यावर तिची अखंड बडबड सुरु झाली.बाबा न काय आणलंय, मी बघ चित्र काढलीत,शाळेत इतके मार्क मिळाले असं बरंच काही.मी विचारलं शेवट मन्या तुला मी इतका कसा माहित?
मग बाबा सांगतो न सगळं,तुझे फोटो हि पाहिलेत....
ती हे बोलली आणि डोळ्यात पाणी आलं.रवीच्या घरातील माझं स्थान इतकं होत कि न भेटता त्याची लेक मला ओळखत होती.तो दिवस कधी हि विसरू शकत नाही.नंतर हि बरेच वर्ष भेट झाली नाही त्या मुळ मन्याला टप्प्या टप्प्यां मोठी होताना पाहता आलं नाही.गेल्या वर्षी गेलो तर मन्या नव्हती,रवी म्हणला अरे ती आता अमेरिकेत असते शिकायला .....
मन्याच बाळपण आणि तो दिवस दोन्ही आता परत येणार नाही,आता फक्त गोड आठवणी ...
अरे आठवलं,अजून एकदा मन्या भेटली होती.रव्या बाईक वर त्या मायलेकिना घेऊन मला भेटायला सोपाऱ्यात आला होता.मन्या शांत बसली होती त्यांच्या बरोबर.हाय हल्लो झालं पण बया शांत होती.मग आईनं लिस्ट दिली वाण्या कडून घेऊन ये हे म्हणून.मी निघालो.मन्या ला म्हटलं येते का माझ्या बरोबर दमली नसशील तर.लगेच उठली न हो म्हणली.पपी न बजावलं काकाला त्रास देऊ नको,हट्ट करायचा नाही.हं म्हणून माझा हात धरलान.
मने बाबा सारखी बाईक नाही हा सायकल आहे माझी चालेल न का चालत जाऊया.
मला जाम आवडते रे सायकल
ओके मग बस म्हणून पुढं बसवली नी वाण्याकड पोचलो.तो हि खुश ,कोण हि बाहुली?
मित्राची लेक आहे.यादी दिली त्याला.मग मन्याला विचारलं,
काय बाई हे काय चाललंय तुझं आज.
काय रे?
नाही एकदम गप्प आहेस.
असच.
बर मग आता काय हवंय?आईस्क्रीम,कॅडबरी,कि अजून काही?
एकदम गालात हसली पण बोलली नाही काही.
मने खरं बोल.
अरे आईनं सांगितलंय मस्ती करायची नाही हट्ट करायचा नाही,काही मागायचं नाही.
हसू फुटलं.तिला म्हणलो
आपण आईला सांगायच च नाही.तुला हवं ते घे.इथंच सम्पव मग आईला कसं समजेल.
तू बोलणार नाहीस?
अज्जिबात नाही.
मग मात्र कळी खुलली.एक आईस्क्रीम,लॉलीपॉप खाऊन झालं.
आई लॉलीपॉप खाऊन देत नाही रे.
आज खा गुपचूप.
परत लाजवाब हसली.वाणी पण सगळं बघून हसत होता.पण घरी गेल्यावर पपी म्हणलीच,
मने काका कडून खाऊ घेतलास न ?
मन्या माझ्याकडं बघू लागली.
नाही ग तीन काही मागितलं नाही.
तू तुम्ही दोघे कितीही लपवलत तरी ओठावर लाल लाल रंग दिसतोय लॉलीपॉप घेतलन न ?
मग मन्या न माझी मान खालती.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

ट्रिंग ट्रिंग


जुना साथीदार.आज अचानक खूप आठवण झाली याची.तेंव्हा हि अचल वस्तू होती.थाट हि होता .याच्या करता स्पेशल टेबल किंवा फोन केस करून घेतली जायची लाकडी.त्यात डिरेक्टरी ठेवायला खण असे.वर एक पेन स्टॅन्ड अन छोटी डायरी.हा घरात असणं हे भाग्य सर्वांच नव्हतं.गरज हि नव्हती आणि बिल कुणी भरायचं बाबा त्या पेक्ष्या नाणी टाकली कि झालं
वाण्या कड.शाळेच्या बाजूला एक्सचेंज होत.तिथं पाच सहा बूथची रांग होती.त्यातला कुठला नाण  न टाकता चालतो,कुठला कधी कधी नाणं परत करतो हे माहित झालं होतं.कुणी नाण्याला दोरा बांधून कॉल झाला कि अचूक नाणं परत वर काढण्यात सफाई मिळवलेली असे.कोपर्या वरचा वाणी सुटी नाणी द्यायला कटकट करत नसे ओळखीचा होता म्हणून.आधी फक्त काळ्या रंगाचा होता.मग लाल आणि हिरवा रंग आला तो डायल प्लॅस्टिकची आणि आवाज खूप कमी करणारी घेऊन.या प्रकारचा फोन आमच्या नितीन गाडगीळ कड एकदा गेलो होतो तेंव्हा पाह्यल्याच आठवतंय.आणि लाल रंग आत्याच्या फोन चा होता.हे मुंबईचे फोन झाले.पण आमच्या पेण अलिबागला घरी फोन आले ते तोंड शिवलेले वाटत.कारण त्याला डायल हा प्रकारच नव्हता.तिथ तुमचा नंबर लिहायचा.फोन करायचा असेल तेंव्हा रिसिव्हर उचलायचा.मग ऑपरेटर बाईला सवड मिळेस्तोवर रिंग ऐकत राहायची.ती बया आली कि बोलायची बोला कुठला नंबर हवाय,मग आपण सांगू तो नंबर जोडून द्यायची.पण हे लोकल असलं तर.मुंबईत कॉल करायचा तर ,वेळ लागेल .लाईन मिळाली कि जोडून देईन तो वर सारखं फोन करून विचारत रहायच नाही समजलं का ? मग आपण हो म्हटलं कि, हं बुक केलाय मग रिंग देतो.असा सकाळी बुक केलेला कॉल रात्री पर्यंत हि व्हाया पनवेल वग्रे जाऊन कनेकट् झाला कि ऑपरेटर परत उपकार केल्याच्या थाटात,हं बोला आता म्हणायचा मग मोठ्याने बोमलून बोलून घ्यायचं.तेंव्हा हि मी पेण च्या आमच्या तात्यांना विचारलं होत,का हो हे ऑपरेटर गावातलेच असतील न मग ते तुम्हाला ओळखत असतील.ते हो मग त्यात काय ? आयला म्हणजे तुम्ही कोणाला कॉल केला हे त्यांना समजत.
हो,मग त्यात काय झालं.
अहो म्हणजे प्रायव्हसी काय राह्यली?
तुमच मुंबई करांचं हे भलतंच असत बॉ.पण तू म्हणतोस ते हि खरय पण आमच्या इथं तुमच्या सारख्या स्वतः फिरवायच्या डायल नाहीच देत न.
तर तो एक प्रकार तसा होता.माझ्या घरी लँड लाईन आली तेंव्हा तुमचा डबा नको म्हणून कॉर्ड लेस आणला होता मी.त्याची रेंज दार बंद करून गच्चीवर गेलो तरी मिळत होती तेंव्हा काय जादू वाटली होती.परत मी गच्चीतून घरात असलेल्या डब्यावर कॉल करून फुकट बोलूं शकतो हा बोनस फिचर त्यात होता.
मग मोबाईल आले आणि हि देशी प्रौढा काल बाह्य होऊन शेलाट्या बांध्याची नाजूक नार जिच्यात जास्तीच्या सुविधा होत्या अशी अवतरली आणि हे जुने डबे मोडीत निघाले.फोन बूथ वाले उत्पन्न गमावून बसले आणि त्यांची अरेरावी हि गेली.प्रत्येकाच्या हाती खऱ्या अर्थी दूरसंचार स्वातंत्र्य आलं जे कुठंही कधीही वापरता येत.
तरी ते आत्या कडचे,वाण्याकडचे, एक्सचेंज चे,नितीन कडचे जुने संच मनात घर करून राह्यलेतच.

मंगळवार, १२ जुलै, २०१६

खुणेचं पत्र

                             *** खुणेचं पत्र ***
कोळीणींच्या कलकलाटान आईनं हाक न मारता जाग आली.
हा आवज मंजे आज सोमवार.धाडकन उठलो.आन्हिक पटकन आवरली.
आई बाजारातून काही आणायचाय का ? नको मी न भाभी जाणारोत.
मग लगेच निघालो.वाटेत अवि च्या अंगणात अजून गँग जमली नव्हती.
एक चक्कर बाजारात मारली.अजून ती आली नाहीये.मग डॅनीयलच्या
कनातीत जाऊन बसलो.त्यांन न सांगता आईस्क्रीम सोड्याच्या बाटलीची
गोटी एक फटक्यात फोडली अन ग्लासात सोडा ओतून टेबलावर ठेवला.
तुमच्या अंगणात आज दोनच बाजा मिळाल्या तिसरी कुठाय रे,त्यांन मला विचारलं.
म्हटलं बाबू वडेवाला घेऊन गेलाय,ती काय समोर लावलीयन .
मला देत जा रे कमी पडते गिर्हाईक वाढलं कि.मी हं केलं.
इतक्यात ती दिसली.गोऱ्यापान चेहेऱ्यावर गालाशी लगट करणारी बट काना मागे टाकायचा प्रयत्न करत दुसऱ्या हातात आरसे लावलेली पिशवी सावरत इकडं तिकडं नजर
टाकत संथ गतीने येत होती.आईस्क्रीम सोडा हातात तसाच ठेऊन पहातच राह्यलो.
अन तिची भिरभिरणारी नजर माझ्यावर स्थिरावली.दुसऱ्याच क्षणी मोगऱ्याच्या फुललेल्या
टपोरी फुला सारखं एक स्माईल मला आलं.खल्लास.सोमवारचा बाजार सार्थकी लागला.
ती पुढं येऊ लागली तशी ग्लास खाली ठेऊन डॅनियल ला पैसे देऊन बाहेर पडू लागलो.
बाजेच लक्ष्यात ठेव रे पुढल्या बाजारला माग डॅनीयल ओरडला.हा म्हणून सटकलो.
आता आम्ही समोरा समोर एकमेंकांच्या जवळ येऊ लागलो. स्माईल दोन्ही कड होत.
मी काही बोलणार इतक्यात पालेकर काका मागून येऊन पुढं उभे.किती हाकाटी कराची तुला लक्ष कुठाय ?
बाबा आला का मुंबई हुन ? हि पिशवी घरी ने त्यात घरच कलिंगड आहे बाबाला म्हणावं मी संध्याकाळचा
येतोय जाऊ नको कुठं.मी कोऱ्या चेहेर्यान थिजून उभा.अरे काही कानी पडलं का?
लक्ष दे जरा काय म्हटलं मी ? हो काका सांगतो बाबांना.मग ते निघून गेले.मी ती गेलेल्या दिशेनं पाह्यलं
ताडगोळे पिशवीत घेताना हळूच बघत हसत होती आता मात्र खट्याळ पण.मी हि हसलो.थोडी मान तिरकी करून निरोप घेतला.तिचं हि तसेच उत्तर आलं.अवीच्या वेसकटी जवळ आलो तर विक्या उभा मला पाहत.काय रे आज माझ्या शिवाय सोमवारचा बाजार ? नाही रे सोडा लेमन पिऊन आलो.येतो कि परत तुझ्या बरोबर.
तो कपाळाला आठी पाडून बघत राह्यला.मी त्याच्या अंगणातल्या बाकावर जाऊन बसलो.
आता येतील सर्व.विक्याच अंगण मंजे ग्रुप चा अड्डा.इतक्यात आईनं हाक मारलं मग उठून गेलो.
तशी तिची भेट दुकानात होई किराणा सामान आणायला गेलो कि. तिच्या वडिलांचं होत दुकान.म्हणजे बंगलावजा घरच पण आगे दुकान पिछे मकान असं.तिचा बाप मोहन शेट. थोडा बुटका ,गोरा आणि बोलका.आमच्या कडे घरोबा होता. माझ्याशी पटायच त्याच.आधी ती बापाला चहा द्यायला आली होती तेंव्हा आम्ही एकमेकांना पाह्यलं न ओळख असल्या सारखं हसलो.मग मोहनशेट नसेल तेंव्हा ती त्याच्या खुर्चीत बसे.माझ्याझी खूप बोलायची.तिला उपन्यास आवडत वाचायला .माझ्याकडं मागीतलन.ते कुठले असायला मग मुंबईला गेलो तर तिच्या करता आणायचो.तिच्या हातात दिल पुस्तक कि इतकी खुश होऊन चेहेरा उजळवायची कि मन तृप्त व्हायचं. आमची हि जवळीक मोहनशेट च्या ध्यानी आली. एक दिवस ती घरात होती.बाहेर मी मोहनशेट शी बोलू लागलो तर आवाज ऐकून धावत आली. कुठं होतास इतके दिवस ?म्हटलं मुंबईला गेलो होतो.हे पाहून मोहनशेट च्या चेहेऱ्यावर ना पसंती दिसली.तू इथं काय करते घरात जाऊन आईला मदत कर म्हणून तिला पिटाळली.मग हळू हळू माझ्याशी कमी बोलू लागला.एक दिवस पेढे हातात ठेवलेन सामान आणायला गेलो तेंव्हा.लग्न ठरलं आमच्याकडं .सुन्न झालो.मग दिवस उदासवाणे जाण होतच.मग तिचं दर्शन ना सोमवार बाजारात ना दुकानात.लग्नाच्या रात्री वरात आमच्या इथल्या मंदिरात आली. अविकडच बसलो होतो सर्वां बरोबर.वरात पाहू म्हणत सर्व उठले.मी घरी जातो म्हटलं तर दिप्यान हा माहितीय चल आमच्या बरोबर म्हणत मला खेचत नेलं.गल्ली च्या तोंडाशी आम्ही उभे राहिलो.मला पुढं ठेऊन दिप्या माग उभा बाकी बाजूला लायनीत.वरात पुढं सरकत होती .नवरा घोड्यावर गेला.नवरी सजलेल्या घोडा बग्गीत जाऊ लागली.माझी छाती धडधडू लागली होती.गाडी जवळून गेली.ती माग तोंड करून बसली होती.लाल साडी,चेहेरा घुंगट होत म्हणून दिसत नव्हता.पण अचानक नाजूक सोन्याच्या बांगडया घातलेला हात वर झाला,घुंगट माग टाकत तिचा चेहेरा चमकला न त्याच क्षणी तीन माझ्याकडं पाहात हात हलवला आणि फिकट हसली.दिप्याचे हात माझ्या खांद्यात रुतले.बाजूची दोस्त मंडळी सर्रकन माझ्याकडं पाहू लागली.लगेच मला दिप्यान खेचत अवीच्या अंगणात नेलं.,आता सर्व माझ्या भोवती उभे आश्चर्यानं पहात. दिप्या न विचारलं हे कधीपासून चालू होत ? साल्या बोलला का नाहीस आम्हाला? अरे तस काही नव्हतं घडलेलं.
ते कळलं आम्हाला.बोलतास तर काही मार्ग निघाला असता .
मग ग्रुप मध्ये शांतता.
मग आम्ही मुंबईला कायमचे आलो.अविला म्हटलं ती आलीच गावात तर निदान पंधरा दिवस राहील तेंव्हा मला पत्र पाठव.त्यात नेहेमी सारखी खुशाली कळव. फक्त वरच्या बाजूला एक डॉट टाक मंजे मला कळेल ती आलीय.मी लगेच येईन.तू आता येऊन काय करणार ?अविचा रोखठोंक प्रश्न.फक्त एकदा बघेन मग जाईन पण फक्त एकदा तिला बघावस वाटतय. त्यानं कबूल केलन कळवतो.मग वर्षभरान आई म्हणाली अरे तुझं पत्र आलंय अविच दिसतंय.परत धडधड.पोस्ट कार्ड होत .खाली खुशालीचाच मजकूर पण  वर सांगितल्या प्रमाण एक डॉट होता अन मूर्खाने बाजूनं टिप लिहिती होती बाण दाखवून हि खूण आहे.बघताच मी हसून बेजार झालो.अव्या पण असा भोळा निघाला कि उदासपण निघून गेल.अन मग वाटलं जाणारी गेली पण असे प्रांजळ मित्र तर आहेत जवळचे जे शेवट पर्यंत बरोबर असतील.

गुरुवार, ३० जून, २०१६

आठवणीतला पाऊस

कौल चाळून घेतली तरी पुढल्या ओटी चा घोणा दरवर्षी प्रमाणे गळतोय. पाणी वाश्यावर जातंय.सर्वत्र गुले झालेत सारखे अंगावर पडतात.मागच्या अंगणातून घातलेला बांध फुटला सगळं पाणी विहिरीत उतरलं.गाळ काढून घेतला होता मे मध्ये आता परत माती गेली विहिरीत.गोठ्याची जमीन एक पावसात उखळली.बकुळीची फांदी स्वयपाक घरावर पडायला झालीय.मोरीच भोक बाहेरून रात्री बूच घालून बंद करावं लागत आठवणीनं नाहीतर जनावर यायची भीती.मागच्या पावसाळ्यात हे थोरल जनावर आढ्याला लपेटून होत.मोरीत भरपूर काळ्या मुंग्या अंडी घेऊन धावतायत मंजे पाऊस जोरात आहे त्यांना कुंकू वाहील पाह्यजे.शेतात आवण कमी पडलं म्हणे .सलील चल पावसात फिरून येऊ ,........
आता अस काही नाही.त्या पावसाबरोबर ते दिवस वाहून गेले.