रविवार, २९ डिसेंबर, २०१९

*अभ्रक!*
याला मायका म्हणतात.इस्त्री बिघडली कि कुणी बघितलं असेल कॉईल बदलताना तर मायका दिसला असेल.दोन मायका च्या लेअर मधून कॉईल गेलेली असते.ती कॉईल हिट होते ज्याने इस्त्री गरम होते.इथं मायका इन्सुलेटर म्हणून काम करतो.
या गोष्टीची माझी ओळख झाली ती बाबांच्या गणपती च्या कारखान्यात. तिथं मूर्तीस चकाकी देण्या करता याचा उपयोग करतात.हा मायका खनिज पदार्थ आहे.याचे तुकडे भूगर्भात मिळतात.पारदर्शक असतात.ते आम्ही धुवून भिजत ठेवत असू.मग मऊ झाले कि भाताच्या तुसात एका फडक्यात घालून पाणी लावत घासत बसलं कि पाण्यात या मायकाची वस्त्र गाळ पावडर उतरते.हे द्रावण मग थोडं गम घालून तयार मूर्तीवर स्प्रे केलं कि मूर्तीला नैसर्गिक चमक येते.पण अति कौशल्याने आणि योग्य प्रमाणात झालं पाह्यजे. गणपती जरा घाम आल्या सारखाही वाटतो मग.आणि चमक अतिशय सुंदर दिसते.तयार पूड मध्ये हे साधत नाही.
आज मुद्दाम हा विषय लिहायच कारण एक माहितीपट.जो एका विदेशी महिलेने तयार केला होता.तिला मायका सौंदर्य प्रसाधनात सर्रास वापरला जातो हे कळलं.ज्या मूळ चकाकी येते जिथं लावला जातो त्या भागावर.सोबत हे हि कळलं कि याची आयत मुख्यत्वेकरून भारतातून होते.आणि या कामात लहान मुलांना कामगार म्हणून वापरलं जातं.मग ती इकडं आली. बिहार झारखंडमध्ये याच्या खाणी आहेत हे कळलं.मग थेट तिथं गेली.चित्रफीत बघितली मी.
तिथं गरीबी खूप आहे.त्या मूळ या खाणीत काम करतात त्या 4/5 ते 14/15वर्ष्याच्या मुली आणि काही मुलं हि. गावाबाहेर किंवा कुणाच्या घर वा गोठ्या खाली खूप घुशी ची बीळ होतात तेंव्हा आदिवासी लोक बोलावून त्यांना त्या घुशीना हुसकवण्याचं काम दिलं जात.ते धूर करून घुशी बाहेर काढून मारतात आणि खायला नेतात.तर ती बीळ असतात तश्या त्या खाणी वाटल्या.त्या चिमुकल्या मुली जमीन खणत खड्डा करत जातात भूगर्भात.आत मायका मिळेल तस खणत भुयार तयार होत. आतली माती घमेल्यात भरून बाहेर आणतात.तिथं ती चाळणी वर टाकून मायका वेगळा केला जातो.आत कुठंही आधार केला जात नाही माती ढसू नये म्हणून.अपघात होत असतात.मुली मातीत गाडल्या जातात.खाणी पासून जवळ विट भट्टी आहे तिथं त्यांचे आई बाप काम करत असतात.तेच येऊन मग अश्या वेळी त्यांना आतून काढतात.एकिला विचारलं हे नको वाटत का?यावर ती छोटी म्हणली,मग खाऊ कसं?
आता तिथं त्यांच्यातली एक छोटी मुलगी त्यांना अक्षर शिकवते.एक स्वयंसेवी संस्था काम करतेय तिथं.पण त्या पोरींचे बालपण अश्या धोकादायक मजुरीतच सुरू होतय. आणि हा असा मिळवलेला मायका मग मोठं मोठ्या सौंदर्य पसाधन तयार करणाऱ्या कंपन्या विकत घेतात.आता विदेशात या बाबत जागरूकता तयार होत्येय.काही कंपनीच्या धोरणात बदल होऊन त्या कंपनी आता या नैसर्गिक मायका ऐवजी सिंथेटिक मायका वापरू लागल्यात या बाल मजुरी मूळ.
सहज कळलं पण बघून मन उदास झालं.मागे ब्लड डायमंड बघून असच वाटलं.कुणी महागडा हिरा फुकट दिला तरी नको वाटलं तिथं हिऱ्या च्या खाणीतले अत्याचार बघून.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

पितरास एक पत्र.

माननीय पितर गण,
विनंती न लिहिण्यास कारण कि,

पत्रिकेत पितृदोष आहे.शांती करून घ्या.
अस वारंवार ऐकतो.आपले म्हणे मृत पूर्वज आपल्याला त्रास देत असतात.अकाली निधन,अविवाहित असता निधन,कुणी कर्ज न फेडता गेला, कुणी चोरी केली,कुणी कुणास मारहाण केली,फसवणूक केली असेल,कुणी कसली इच्छा पूर्ण न होता गेला,कुणाचा आपल्यावर राग असतो पण बोलून दाखवली नसत आपल्या पूर्वजांनी तर तो दोष म्हणे आपल्यास लागतो.
एक तर आमचे तुम्ही पारंपरिक घरातले लोक. मग आपल्याच खानदानात जन्माला आलेल्या जातकास कसला त्रास देता?तुम्हाला काही आपुलकीची वग्रे भावना दाटून येत कशी नाही.तुमच्या जीवनात काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत किंवा तुम्हास करता आल्या नाहीत यात आम्हा नवजात लोक्स चा काय दोष? मी तर म्हणतो हे अस अपेक्षा भंग तुम्ही अनुभवलेत मग उलटपक्षी आम्हाला आमच्या अपेक्षा पूर्ण करायला मदत करा न.हे कसं बॉ चिवित्र वागणं तुमच.आमचं भल नाही न झालं म खानदानात कुणाच भल होऊ देणार नाही हि आपल्याच लोकांशी कसली दुष्मनी करता राव? त्या पेक्ष्या आपल्या खानदानाचे कुणी दुष्मन असतील त्यांना जाऊन छळा न!किंवा तुम्हाला ज्याने त्रास दिला त्यालाच पकडून धडा शिकवा.बरं आम्ही आमच्या परीने तुम्ही गेल्यावर श्राद्ध कर्म केलं न परवडत नसलं तरी?म आमची चूक कसली आली?आम्हाला का उगा छळतायत.त्या पेक्ष्या कुणी निर्धन असेल त्याला संपत्ती मिळवून द्या.निपुत्रिक असेल त्याला पुत्र किंवा कन्या रत्न प्रदान करा.कुणी अविवाहित असेल त्याच्या करता ग्यारेंटेड योग्य स्थळ जमवून द्या.मग बघा तुमची पुढली पिढी कशी सुखात नांदते आणि तुम्हास पूजितें का नाही ते.बाबांनो इहलोकी सर्व भोग बघूनही तुम्हास या लोकीची ओढ का अजून? बक अप भिडू.पुढच्या प्रवासास लागा. त्या करता आम्ही काही करावं याची वाट का बघता?मग तुम्हास या जन्मी जिवंत असताना काही करणं जमलं नाही तेच त्या जन्मात किंवा अवस्थेत टिकून आहे.म तुमचा नाकर्तेपणा कि आमचा?आमच्या जीवनात काही भली भर घालू शकत नसाल तर चैला अडचणी तरी निर्माण करू नका.या तुमच्या वागण्यान मला आता एक प्रश्न उगा कारण नसताना पडून राह्यलाय.तो असा,
तुमची भडास काढायला आम्ही तुम्हाला आयते सापडलो.पण तुम्ही आमची गोची करून ठेवलीय याची कल्पना आहे का तुम्हाला?
कशी? आता ते हि ईस्कटून सांगतो. मी पण मनात म्हटलं कि, आम्हास जरा पितृ दोष लागलाय तसा मी पण कुणाला लावून देईन.पण चैला आहे कोण ? कोणाला देऊ हा तुमचा वसा?उतत नाही मातत नाही पण तुम्ही दिला वसा घ्यायला कुणी उरलाच नाही!!!!
तेंव्हा एक रिक्वेस्ट तुम्हास.मी काय म्हटलं ते विचारात घ्या आणि शहाण्या सारखे वागा बघू.
मग पितृपक्षात तुम्हाला सजवलेली थाळी प्रेमान ठेवता बघा.
समस्त पितृ देवो भ्यो नमः🙏🏻🌹

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

आठवणीतली गाणी.

या शांत वेळेस सांजवत असताना अचानक काही आठवणीतली गाणी मनात वाजू लागतात.त्यातलं अमर प्रेम मधलं रैना बीती जाये, आठवलं.
मलमली तारुण्य आठवलं.
लगेच सलामे इश्क मेरी जां आठवलं.
साला म्हटलं अस का झालं?तर प्रसंग आणि तो जिथं घडतोय ती जागा आणि पात्रांची मनोवस्था एकच आहे.त्याचा परिणाम देखील एकच आहे.हे लक्षात आलं कधी तुमच्या ?
प्रत्येक गाण्यात स्वतः ची खासियत आणि ओळख आहे.
रैना बीती जाये मध्ये राजेश खन्ना बायको असून नसल्या सारखा आहे.मलमली तारुण्य मध्ये अरुण सरनाईक तश्याच अवस्थेत.आणि सिकंदर देखील त्याच पठडीत मोडतोय.
हे नायक एकटेपणा बोचत असलेले आहेत.अश्या वेळी त्यांना कुणी टांगेवाला,ओम प्रकाश आणि प्यारेलाल गम गलत करने कोठीवर गाणं ऐकायला घेऊन आलाय.नायकच दुःख विसरून जावं म्हणून.
त्यात राजेश खन्ना नुसते सूर ऐकून वर खेचून आणल्या सारखा आलाय.आप रुक क्यो गयी गाइये न म्हणत गाणं रसिकतेने ऐकतो.नशेत असला तरी जाताना गायिकेच नाव विचारतोय.तिनं पुष्पा नाव आहे म्हटल्यावर त्याच्या तोंडून पटकन जात,मीरा होना चाहीये.इथं त्याचा वैचारिक दर्जा समजतो.अय्याशी करायला आलेला सामान्य ग्राहक नसून हि काही और चीज आहे हे त्या नायिकेला जाणवत.प्यारेलाल आणि सिकंदर जायला निघतात न जोहरा प्यारेलाल ला थांबवून विचारते,कोन है ये साहब?
हमारे दोस्त है नाम सिकंदर है.यावर जोहराची अफलातून कमेन्ट,यहा लोग चोट खा कर आते है.ये पेहले शख्स है जो चोट दे कर जा रहे है.अब इस कोठे के दरवाजे खुलेंगे तो सिर्फ इनके लिये.प्यारेलाल चाट पडतो.सिकंदर ला म्हणतो,अमा हम तो तुम्हे समुंदर मे डुबाने लाये थे तुम तो समुंदर पी कर निकले.
सिकंदर म्हणतो,वो ऐसा है.हम अपने गम मे इतने डूबे है के हम पर हमदर्दी कि नजर डालनेवाला खुद हमारे गम मे डूब जाता है.
आणि एक गाणं ज्यात संगीत विषय आहे.
प्रेम नगर च गाणं. हेमा मालिनी श्रीमंती महालात आहे.तिथं सर्वत्र श्रीमंती तर झळकते आहेच पण संगीत शोभेच्या वस्तू म्हणून मांडून ठेवलेल्या आहेत अस तिला जाणवतंय.मग,
ये कैसा सूर मंदिर है
जीसमे संगीत नही
गीत लिखे दिवारो पे
गाने कि रीत नही
अशी तिखट टीका श्रीमंती हुच्चभ्रु महालात करतेय.आम्ही उच्च अभिरुची राखून आहोत याच फक्त प्रदर्शन पण समज कसलीच नाही राहणार्यांना.
हाच धागा त्या वरच्या गाण्यात आहे.तिथं हि गाणं बजावणेच चालत पण रसिक मात्र भाग्यानेच एखादा येतो आणि जिंकून जातो गाणाऱ्याचे मन.
थोर लोक होती ज्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि आपल्या पर्यंत पोहोचवलं.
कितीही वर्ष ऐकल तरी मन तृप्त होत नाही आणि तरीही ती गाणी ऐकली कि तृप्ती जाणवते.