- जावे बायकांच्या वंश्या -
मी पुरुष असून या शीर्षकावर लिहावेसे वाटले.कारण आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.किंवा त्या वंश्यात जन्म घेतल्यावर मगच तिथली सुख दुखः समजू शकतात.आई असताना किंवा ती धडधाकट असताना या गोष्टीची जाणीव मला कधीच झाली नव्हती.घरात तिच्या सुगरणपणा मुळे आमच्या जीभा चटावलेल्या.परोपरीने खाऊ घाली.आलागेला पाहुणाही तृप्त होऊन जात असे.
मग ती तब्येतीने हळूहळू खचू लागली.आमच्या घरावर नियती सूड उगवल्या सारखी वागू लागली.तरीही ती सगळे आनंदात करी.पण सारखी येणारी संकटे आणि त्यामुळे ढासळत जाणारी तब्येत या मुळे स्वयंपाक घर मला हातात घ्यावं लागले.ते आज तागायत.{माझा माझ्या मामाच्या रुपात ती मला आजही मदत करतेय असे वाटते.तो आणि मी मिळून कामे करतो }लहानपणापासून तिच्या हाता बोटाशी वावरल्याने हळूहळू सगळे जमत गेले.पण नंतर ती तीन महिने जे. जे. हॉस्पिटल मध्ये टाचा घासत रोज थोडे थोडे करत गेली.त्या दिवशी खरच सांगतो दुःखा बरोबर आनंद हि वाटला कि सुटली या व्यापातून.
या नंतर सगळे घर सांभाळणे म्हणजे काय?ते कळले.हि परिस्थिती अंगावर आली नसती तर हे कधी जाणवलेच नसते.आजपर्यंत जे काही केले ते ती घरात बारा महिने चोवीस तास समर्थपणे उभी होती म्हणूनच.मग तबलजी व्हायला निघालेला मी बावर्ची होऊन राहिलो.
जर चव बिघडली तर नावे ठेवताना आधी काही वाटत नसे.आता कळते.एकीकडे कुकर शिटी मारतोय दुसरीकडे कपड्याचे मशीन शिटी मारताय आणि त्याच वेळी दारावरची बेलही वाजतेय.मग सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणे.कपडे वाळत घालणे;दळण आणणे;वाण्याकडे यादी टाकणे अशी तारांबळ न संपता सुरु असते.परत संध्याकाळची तयारी.ते झाले कि उद्याची तयारी मग बेडरूम ड्यूटी मग आली निट झोप तर झोपा पण पहाटे कर्तव्याला हजार रहा.
घर सांभाळणाऱ्या बायका हे सगळे करत असताना जर आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर आणि काही गोष्टीना तोंड देत असतात.थकलेल्या उधाऱ्या मागायला येणाऱ्या माणसाना त्यांनाच तोंड द्यावे लागते.बाकी थकलेली वही घेऊन वाण्याकडे त्यांनाच जावे लागते.घरची आजारी म्हातारीकोतारी यांचेही त्यांनाच करावे लागते.पाहुणे राहुणे हि असतातच.सणासुदीला जास्तीचे करून स्वतः प्रसन्न राहायचे.घरातल्या त्रासदायक माणसाला सतत सहन करायचे.या सगळ्यामुळे त्यांचे आयुष्य दहा वर्षाने तरी घटत असले पाहिजे.
या अश्या स्त्रियांना दंडवत आणि हल्ली नोकरी करणाऱ्या स्त्रिया हे सांभाळून नोकरीही करतात.म्हणजे तिथली आणखीची टेन्शन आणि कामे.त्यांना तर साष्टांग नमस्कार.
तेंव्हा जर पुरुषानीही फक्त ऑफिस एके ऑफिस न करता घरातल्या जबाबदार्यात हातभार आपणहून प्रेमाने लावला आणि मुलानाही तशीच शिकवण दिली तर या माऊल्या सुखावतील.त्यानाही आयुष्याचा आनंद घेता येईल.
हल्ली परिस्थिती सुधारल्याचे दिसण्यात येत आहे.मी शिकवण्या करताना पहिल्यातले नवरे हे सर्व समजून वागताना पाहत आहे.ते घर असेच आनंदी राहून त्यांचा असा सर्वांगीण विकास होत राहो अश्या शुभेछ्या नेहमीच देत आलोय.त्यांच्या घरी गेल्यावर उभयता प्रेमाने खाऊपिऊ घालतात.अश्या वेळी आईच दिसते त्या त्यांच्या ठाई.
तेंव्हा समस्त पुरुषानो तुम्हीही घरासाठीच झटत असता.पण आई गेल्यावर मला हे जाणवले.तेंव्हा तुमच्या आई बहिणी आणि बायकोच्या भूमिकेत प्रत्यक्ष शिरून पहा मी म्हणतो ते पटेल.
माझी आई आणि समस्त स्त्री वर्गास समर्पित,साष्टांग नमस्कार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा