- तबला -
आज मी माझ्या ब्लॉगवर प्रथमच लिहित आहे.काय लिहायचं हा प्रश्नच नाही.माझं पहिले प्रेम,माझा मित्र आणि सर्व काही असा तबला.माझे वडील स्वतः तबलजी होते त्यामुळे लहानपणा पासूनच तबला आवडला होता.बाबा; आई सांगत ''तू झालास तेव्हा नर्स म्हणाली याचे वडील तबलजी आहेत का?बोट हलवत जन्माला आलाय .मग थोडा मोठा झाल्यावर बाबा रियाजाला बसले कि मी त्यांच्या मांडीवर जाऊन मी वाजवणार म्हणून हट्ट करीत असे. मग बाबा सांगत कि सगळे तबले देऊन टाकले.कारण हे वेड लागले तर शिक्षण होणार नाही.मग आठवीत असताना बाबांनी झाकीर भाईंची कॅसेट आणली.ती ऐकली आणि बाबांना सांगितलं

हा तबला शिकायचा.बाबा म्हणाले ''आधी शिक्षण मग ते''.म्हटलं नाही तबलाच.मग दहावी झाल्यावर पाहू असे ठरले.नंतर दहावी झाली आणि म्हटले आता तबलाच करायचाय.मग बाबांनी त्यांचे अनुभव सांगितले.या क्षेत्रातील अनिश्चितता सांगितली.असे सर्व धोके मान्य असतील तर पुढे जा.पण हा विषय सोपा नाही.काहीतरी दुसरे शिकून ठेव.म्हणजे परत उभे राहायला आधार होईल.मी हो म्हटले .एक डिप्लोमा केला.पण तबला आणायचाच.मग तबला आला.बाबांनी शिक्षण सुरु केले.मलाही मस्त वाटत होते.तबला शिकताना मला अडचण कसलीच जाणवली नाही.आणि आता काहीतरी शिकायचे आहे असेही वाटले नाही.शाळे पेक्ष्या हे आवडले.मग मला अल्लारखा साहेबांकडेच शिकायचे होते.पण ते कुठे राहतात कुठे शिकवतात काहीच माहित नव्हते.एक दिवस बाबांचे जुने तबलजी मित्र आले होते.मी वाजवत होतो.ते म्हणाले अरे चांगला हात आहे.शिकत राहा.बाबांनी त्यांना सांगितले याला अल्लारख्खा साहेबां कडे शिकायचं आहे.तर ते म्हणाले पाठव कि शिवाजी पार्क समोर स्विमिंग पूलच्या जागेत त्यांचा क्लास आहे.मग काय त्याच दिवशी बाबांच्या मागे लागून तिथे गेलो.अब्बाजी गादीवर बसलेले.समोर अर्थातच तबला.मागे दगडूशेठ गणपतीची मोठी तसबीर.तिला मोठा हार घातलेला .अब्बाजींच्या समोर सहा सात तबले आणि ते वाजवणारे विद्यार्थी.खूप आनंद;भीती अस एकदम वाटत होते.एकजण वाजवत होता त्याचे संपले वाजवून.मग अब्बाजीनी काय म्हणून विचारले.मग बाबांनी सगळे सांगितले.त्यानी विचारले कुछ सिखा है ?बाबानी सांगितले''मैने थोडा सिखाया है .मग मला वाजवायला सांगितले.झाल्यावर पाया पडलो माझ्या देवाच्या.ते म्हणाले आजसे शुरू करो.इनसे मिलना म्हणून उजव्या बाजूला हात केला.पाहिले तर एक गोरापान तरुण हसतमुखाने बसला होता त्याच्या मागे काही मुले बसली होती.हे होते अब्बाजींचे मानसपुत्र व पट्टशिष्य अशोक गोडबोले.प्रसन्न व्यक्तिमत्व.त्यांच्या पाया पडलो.मग त्यांनी एक कायदा सुरु केला,लिहून घेताना मी म्हटले सर हा बाबांनी शिकवलाय.तर ते म्हणाले हरकत नाही आमचे पलटे घे वेगळे आहेत.खरच वेगळे होते.ते म्हणाले आता तू पंजाब घराणा शिकणार आहेस.हा माणूस पाहता क्षणीच आवडला.आणि तेव्हा सुरु झालेले नाते आज अब्बाजी गेल्यानंतरही सुरु आहे.तर तबल्याने मला आनंद दिला. प्रेम करणारी माणसे दिली.काही अशी माणसे दाखवली कि आपण कसे असू नये याचे जिवंत उदाहरण.मग साथसंगत करताना ऐकण्याचा रियाज करताना गाण्याच्या शब्दांकडेही लक्ष गेले.मग काव्याचे दालन उघडले.कीर्तने वाजवताना ऐकताना संतांचे अभंग आणि त्याचे निरुपण कानी पडले.आणि संत देवाकडे अडचणी; निंदक लोक दे का म्हणतात ते; आयुष्य जगताना समजले.शिकवताना तर लहान मुले ते म्हातारे असे अनेक जन भेटले.हे लोकही मला समृद्ध करत गेले.एकूण असा प्रवास सुरु आहे.बाकी पुढे लिहूच.नमस्कार .-^-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा