पोयनाड कोकण आणि गोव्याकडे जाणारा रस्ता वडखळला डावीकडे वळतो.इथूनच एक रस्ता अलिबागकडे जातो.या रस्यावर पुढे धरमतरची खाडी लागते.मग दोन छोटी गावे पार झाली कि येत पोयनाड.एस. टी.नाक्यावर थांबते.
नाक्यावरून एक चिंचोळा रस्ता गावात जाऊ लागतो.दुतर्फा रस्त्याला खेटून दुकाने.मग पारावर या रस्त्याला दोन फाटे फुटतात.डावीकडे विठोबा मंदिराकडे,उजवीकडे सोमवार बाजाराकडे.माझ्या घराकडे मात्र सरळ पुढे जायचं.आता चढण सुरु होते.डावीकडे जुने जैन मंदिर.त्याच्या वरील मजल्यावर भले थोरले मध माश्यांचे पोवळे.मग दोन्ही बाजूने घरांची अंगणे.चढण माथ्यावर एक चौथरा आहे.इथे पूर्वी मराठी शाळा होती.शाळेच्या डावीकडे सरळ गेले कि या छोट्या टेकडीच्या माथ्यावर पोलिस स्टेशन आहे.मोठे मैदान उजवीकडे पोलिसांना रहायची छोटी इमारत.पोलिस लाईन.समोर आडव्या इमारतीत पोलिस ठाणे.यात दोन खोल्याचे जेल.आणि मग कचेरी.शाळेच्या उजवीकडे जाऊन उतरंड उतरायला सुरु केली कि डावीकडे आमचे आवाड सुरु होई.प्रथम एक मोठ्ठा खडक ठाण मांडून बसलेला दिसे.या पट्ट्यात काही आंब्याची झाडे असत.त्या खडकाचा उपयोग मारवाड्यांच्या बायका पहाटेपहाटे करीत.याच्या रस्त्याकडील बाजूस मोठ्ठी चिंच होती.पाचफुट खालीआमचे बकुळीचे अंगण.हि बकुळी भली थोरली होती.गावातील पोरीबाळी हातात भुत्ये म्हणजे घासलेटचे
दिवे घेऊन अंगणभर पडलेला बकुळीचा सडा वेचायला येत.हे अंगण आमच्या स्वयंपाक घरासमोर होते.
याच्या खाली दोन फुट आले कि आमच्या घराची वेस्कट लागे. वेस्कटीतून मध्ये येउन अंगण ओलांडले कि मुख्यदार .बाहेरची ओटी. ओटीच्या डावीकडे कोठार .त्या पुढे झोपाळा. उजवीकडे अण्णांची म्हणजे माझ्या आजोबांची खोली.मध्यभागी तीन पायऱ्या चढून गेले कि नाना आजोबांची बैठक.मग देव घर आणि माजघर.इथे आमचा नक्षीकाम केलेला लाकडी देव्हारा होता.त्या पुढे बसायला केलेला छोटा ओटा. आणि वर सर्वत्र माळा होता.माजघरात लाल पिवळ्या रंगात बांधलेल्या पोथ्या.ज्यात हस्तलिखित बर्याच होत्या.त्या सगळ्या फळ्यांवर मांडून ठेवलेल्या असत.माजघरातच एक बाळंत खोली.डावीकडे स्वयंपाक घर उजवीकडे खाली उतरले कि बेड्याची पडवी.सरळ समोर आले कि पायऱ्या उतरून तुळशीचे अंगण.या अंगणातून पुढे आले कि पुढे मोठी खुली जागा.यात आंबा, चिकू अशी झाडे.मात्र या खाचराचा सत्तर टक्के भाग चार फुट खाली होता.यात भात लावीत असत.हि रचना निसर्गतः रंगमंच तयार केल्यासारखीच होती. आमचे नाटकाचे थेटर इथेच होते.तुळशीच्या अंगणातच अंघोळ करायला आडोसा होता मेंदीच्या झाडांचा .तीन बाजूने मेंदीची गच्च झाडी. एक बाजू तरटाच्या पडद्याने झाकलेली.वर बिट्टी आपली सरळसोट पाने हलवत सावली देऊ पाही.या बाथरूम मधे पाणी ठेवायला एक दगडी.म्हणजे दगडाचे मोठे भांडे म्हणानात.याला तळाशी एक भोक होते.ते छोट्या लाकडी बूचाने बंद करून पाणी ओतायचे.अंघोळ झाली कि बूच काढायचे पाणी जायला. हे अंगण ओलांडून खाली गेले कि विहिर आणि बेडे.बेड्यात जनावरे आणि बाहेर बैल गाडी उभी असे.बेडयाच्या बाजूने बाहेर पडायला एक वेस्कट.बेड्या सभोवताली चिंच, बेड्याचा आंबा अशी झाडे.असे ते घर एका टेकडी वजा जागेत कप्या कप्याने असलेल्या उतरंडीवर बसले होत्ये.आणि घराच्या खालीजाणाऱ्या वाटेने गेले कि सोमवारच्या बाजाराची जागा.हे गाव छोटे असले तरी पार महाडपासून लोक मसाल्याचे पदार्थ, मासळी ,भाजी खरेदी करायला येत. या घरातील माणसे कशी होती ते पुढी भागात पाहू .
.
.jpg)
