शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

पोयनाडचे आमचे घर

                                                                      पोयनाड                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            कोकण आणि गोव्याकडे जाणारा रस्ता वडखळला डावीकडे वळतो.इथूनच एक रस्ता अलिबागकडे जातो.या रस्यावर पुढे धरमतरची खाडी लागते.मग दोन छोटी गावे पार झाली कि येत पोयनाड.एस. टी.नाक्यावर थांबते.
नाक्यावरून एक चिंचोळा रस्ता गावात जाऊ लागतो.दुतर्फा रस्त्याला खेटून दुकाने.मग पारावर या रस्त्याला दोन फाटे फुटतात.डावीकडे विठोबा मंदिराकडे,उजवीकडे सोमवार बाजाराकडे.माझ्या घराकडे मात्र सरळ पुढे जायचं.आता चढण सुरु होते.डावीकडे जुने जैन मंदिर.त्याच्या वरील मजल्यावर भले थोरले मध माश्यांचे पोवळे.मग दोन्ही बाजूने घरांची अंगणे.चढण माथ्यावर एक चौथरा आहे.इथे पूर्वी मराठी शाळा होती.शाळेच्या डावीकडे सरळ गेले कि या छोट्या टेकडीच्या माथ्यावर पोलिस स्टेशन आहे.मोठे मैदान उजवीकडे पोलिसांना रहायची छोटी इमारत.पोलिस लाईन.समोर आडव्या इमारतीत पोलिस ठाणे.यात दोन खोल्याचे जेल.आणि मग कचेरी.शाळेच्या उजवीकडे जाऊन उतरंड उतरायला सुरु केली कि डावीकडे आमचे आवाड सुरु होई.प्रथम एक मोठ्ठा खडक ठाण मांडून बसलेला दिसे.या पट्ट्यात काही आंब्याची झाडे असत.त्या खडकाचा उपयोग मारवाड्यांच्या बायका पहाटेपहाटे करीत.याच्या रस्त्याकडील बाजूस मोठ्ठी चिंच होती.पाचफुट खाली
आमचे बकुळीचे अंगण.हि बकुळी भली थोरली होती.गावातील पोरीबाळी हातात भुत्ये म्हणजे घासलेटचे
दिवे घेऊन अंगणभर पडलेला बकुळीचा सडा वेचायला येत.हे अंगण आमच्या स्वयंपाक घरासमोर होते.
याच्या खाली दोन फुट आले कि आमच्या घराची वेस्कट लागे. वेस्कटीतून मध्ये येउन अंगण ओलांडले कि मुख्यदार .बाहेरची ओटी.  ओटीच्या डावीकडे कोठार .त्या पुढे झोपाळा.   उजवीकडे अण्णांची म्हणजे माझ्या आजोबांची खोली.मध्यभागी तीन पायऱ्या चढून गेले कि नाना आजोबांची बैठक.मग देव घर आणि माजघर.इथे आमचा नक्षीकाम केलेला लाकडी देव्हारा होता.त्या पुढे बसायला केलेला छोटा ओटा. आणि वर सर्वत्र माळा होता.माजघरात लाल पिवळ्या रंगात बांधलेल्या पोथ्या.ज्यात हस्तलिखित बर्याच होत्या.त्या सगळ्या फळ्यांवर मांडून ठेवलेल्या असत.माजघरातच  एक बाळंत खोली.डावीकडे स्वयंपाक घर उजवीकडे खाली उतरले कि बेड्याची पडवी.सरळ समोर आले कि पायऱ्या  उतरून तुळशीचे अंगण.या अंगणातून पुढे आले कि पुढे मोठी खुली जागा.यात आंबा, चिकू अशी झाडे.मात्र या खाचराचा  सत्तर टक्के भाग  चार फुट खाली होता.यात भात लावीत असत.हि रचना निसर्गतः रंगमंच तयार केल्यासारखीच होती. आमचे नाटकाचे थेटर इथेच होते.तुळशीच्या अंगणातच अंघोळ करायला आडोसा होता मेंदीच्या झाडांचा .तीन बाजूने मेंदीची गच्च झाडी. एक बाजू तरटाच्या पडद्याने झाकलेली.वर बिट्टी आपली सरळसोट पाने हलवत सावली देऊ पाही.या बाथरूम मधे पाणी ठेवायला एक दगडी.म्हणजे दगडाचे मोठे भांडे म्हणानात.याला तळाशी एक भोक होते.ते छोट्या लाकडी बूचाने बंद करून पाणी ओतायचे.अंघोळ झाली कि बूच काढायचे पाणी जायला. हे अंगण ओलांडून खाली गेले कि विहिर आणि बेडे.बेड्यात जनावरे आणि बाहेर बैल गाडी उभी असे.बेडयाच्या बाजूने बाहेर पडायला एक वेस्कट.बेड्या सभोवताली चिंच, बेड्याचा आंबा अशी झाडे.असे ते घर एका टेकडी वजा जागेत कप्या कप्याने असलेल्या उतरंडीवर बसले होत्ये.आणि घराच्या खालीजाणाऱ्या वाटेने गेले कि सोमवारच्या बाजाराची जागा.हे गाव छोटे असले तरी पार महाडपासून लोक मसाल्याचे पदार्थ, मासळी ,भाजी खरेदी करायला येत. या घरातील माणसे कशी होती ते पुढी भागात पाहू . 
.

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

***माय***


                                        ***माय***

 जितेंद्र जोशी मुळे  हे गाणे माहित झाले ----------
              हंबरून वासराला चाटती जेव्हा गाय
              तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय ...
                    आया बाया सांगत व्हत्या होतो जवा तान्हा
                     दुष्काळात मायेचा माझ्या आटला व्हता पान्हा
                     पीठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय
                      तवा मले पीठा मंदी दिसती माझी माय.....
               कन्या काट्या येचायला माय जाई रानी
               पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
               काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय
               तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय....
                      बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमण
                      बास झाल शिक्शान आता घेऊ दे हाती काम
                      अग शिकूनशान कोन मोठा मास्तर होनार हाय
                       तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय.....
                दारू पिउन मायेला मारी जवा माझा बाप
                थर  थर  कापे अन लागे तिले  धाप
                 कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
                 तवा मले गायी मंदी दिसती माझी माय.....
                        बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी
                        सांग    म्हणे    राजा तुजी कवा दिसलं राणी
                        भरल्या डोळ्यान कवा पाहीन दुधावरची साय
                        तवा मले सायी मंदी दिसती माझी माय.....
                  ग म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी
                  पुन्हा एकदा  जनम घ्यावा माये तुझे  पोटी
                  तुझ्या  चरनी ठेऊन माया धरावे तुझे पाय
                  तवा मले पाया मंदी दिसती माझी माय.

                                     - जावे बायकांच्या वंश्या -

           मी पुरुष असून या शीर्षकावर लिहावेसे वाटले.कारण आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.किंवा त्या वंश्यात जन्म घेतल्यावर मगच तिथली सुख दुखः समजू शकतात.आई असताना किंवा ती धडधाकट असताना या गोष्टीची जाणीव मला कधीच झाली नव्हती.घरात तिच्या सुगरणपणा  मुळे आमच्या जीभा चटावलेल्या.परोपरीने खाऊ घाली.आलागेला पाहुणाही तृप्त होऊन जात असे.
          मग ती तब्येतीने हळूहळू खचू लागली.आमच्या घरावर नियती सूड उगवल्या सारखी वागू लागली.तरीही ती सगळे आनंदात करी.पण सारखी येणारी संकटे आणि त्यामुळे ढासळत जाणारी तब्येत या मुळे स्वयंपाक घर मला हातात घ्यावं लागले.ते आज तागायत.{माझा माझ्या मामाच्या रुपात ती मला आजही मदत करतेय असे वाटते.तो आणि मी मिळून कामे करतो }लहानपणापासून तिच्या हाता  बोटाशी वावरल्याने हळूहळू सगळे जमत गेले.पण नंतर ती तीन महिने जे. जे. हॉस्पिटल मध्ये टाचा  घासत रोज थोडे थोडे करत गेली.त्या दिवशी खरच सांगतो दुःखा बरोबर आनंद हि वाटला कि सुटली या व्यापातून.
          या नंतर सगळे घर सांभाळणे म्हणजे काय?ते कळले.हि परिस्थिती अंगावर आली नसती तर हे कधी जाणवलेच नसते.आजपर्यंत जे काही केले ते ती घरात बारा महिने चोवीस तास समर्थपणे उभी होती म्हणूनच.मग तबलजी व्हायला निघालेला मी बावर्ची होऊन राहिलो. 
          जर चव बिघडली तर नावे ठेवताना आधी काही वाटत नसे.आता कळते.एकीकडे कुकर शिटी मारतोय दुसरीकडे कपड्याचे मशीन शिटी मारताय आणि त्याच वेळी दारावरची बेलही वाजतेय.मग सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणे.कपडे वाळत घालणे;दळण आणणे;वाण्याकडे यादी टाकणे अशी तारांबळ न संपता सुरु असते.परत संध्याकाळची तयारी.ते झाले कि उद्याची तयारी मग बेडरूम ड्यूटी मग आली निट  झोप तर झोपा पण पहाटे कर्तव्याला हजार रहा.  
        घर सांभाळणाऱ्या बायका हे सगळे करत असताना  जर आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर आणि काही गोष्टीना तोंड देत असतात.थकलेल्या उधाऱ्या मागायला येणाऱ्या माणसाना त्यांनाच तोंड द्यावे लागते.बाकी थकलेली वही घेऊन वाण्याकडे त्यांनाच जावे लागते.घरची आजारी म्हातारीकोतारी यांचेही त्यांनाच करावे लागते.पाहुणे राहुणे हि असतातच.सणासुदीला जास्तीचे करून स्वतः प्रसन्न राहायचे.घरातल्या त्रासदायक माणसाला सतत सहन करायचे.या सगळ्यामुळे त्यांचे आयुष्य दहा वर्षाने तरी  घटत असले पाहिजे.
  या अश्या स्त्रियांना दंडवत आणि हल्ली नोकरी करणाऱ्या स्त्रिया हे सांभाळून नोकरीही करतात.म्हणजे तिथली आणखीची  टेन्शन आणि कामे.त्यांना तर साष्टांग नमस्कार.
       तेंव्हा जर पुरुषानीही फक्त ऑफिस एके ऑफिस न करता घरातल्या जबाबदार्यात हातभार आपणहून प्रेमाने लावला आणि मुलानाही तशीच शिकवण दिली तर या माऊल्या सुखावतील.त्यानाही आयुष्याचा आनंद घेता येईल.
     हल्ली परिस्थिती सुधारल्याचे दिसण्यात येत आहे.मी शिकवण्या करताना पहिल्यातले नवरे हे सर्व समजून वागताना पाहत आहे.ते घर असेच आनंदी राहून त्यांचा असा सर्वांगीण विकास होत राहो अश्या शुभेछ्या नेहमीच देत आलोय.त्यांच्या घरी गेल्यावर उभयता प्रेमाने खाऊपिऊ घालतात.अश्या वेळी आईच दिसते त्या त्यांच्या ठाई.
   तेंव्हा समस्त पुरुषानो तुम्हीही घरासाठीच झटत असता.पण आई गेल्यावर मला हे जाणवले.तेंव्हा तुमच्या आई बहिणी आणि बायकोच्या भूमिकेत प्रत्यक्ष  शिरून पहा मी म्हणतो ते पटेल.
       माझी आई आणि समस्त स्त्री वर्गास समर्पित,साष्टांग नमस्कार.
 

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

tabla

                      पुणे,अलिबाग येथे ग्रुप बुकिंगला प्राधान्य.

       नालासोपारा ,वसई .विरार येथे खाजगी शिकवण्याकरता 

       संपर्क करावा.


- तबला -

                                                  - तबला -

 आज मी माझ्या ब्लॉगवर प्रथमच लिहित आहे.काय लिहायचं हा प्रश्नच नाही.माझं पहिले प्रेम,माझा मित्र आणि सर्व काही असा तबला.माझे वडील स्वतः तबलजी होते त्यामुळे लहानपणा पासूनच तबला आवडला होता.बाबा; आई सांगत ''तू झालास तेव्हा नर्स म्हणाली याचे वडील तबलजी आहेत का?बोट हलवत जन्माला आलाय .मग थोडा मोठा झाल्यावर बाबा रियाजाला बसले कि मी त्यांच्या मांडीवर जाऊन मी वाजवणार म्हणून हट्ट करीत असे. मग बाबा सांगत कि सगळे तबले देऊन टाकले.कारण हे वेड  लागले तर शिक्षण होणार नाही.मग आठवीत असताना बाबांनी झाकीर भाईंची कॅसेट आणली.ती ऐकली आणि बाबांना  सांगितलं
हा तबला शिकायचा.बाबा म्हणाले ''आधी शिक्षण मग ते''.म्हटलं नाही तबलाच.मग दहावी झाल्यावर पाहू असे ठरले.नंतर दहावी झाली आणि म्हटले आता तबलाच करायचाय.मग बाबांनी त्यांचे अनुभव सांगितले.या क्षेत्रातील अनिश्चितता सांगितली.असे सर्व धोके मान्य असतील तर पुढे जा.पण हा विषय सोपा नाही.काहीतरी दुसरे शिकून ठेव.म्हणजे परत उभे राहायला आधार होईल.मी हो म्हटले .एक डिप्लोमा केला.पण तबला आणायचाच.मग तबला आला.बाबांनी शिक्षण सुरु केले.मलाही मस्त वाटत होते.तबला शिकताना मला अडचण कसलीच जाणवली नाही.आणि आता काहीतरी शिकायचे आहे असेही वाटले नाही.शाळे पेक्ष्या  हे आवडले.मग मला अल्लारखा साहेबांकडेच शिकायचे होते.पण ते कुठे राहतात कुठे शिकवतात काहीच माहित नव्हते.एक दिवस बाबांचे जुने तबलजी मित्र आले होते.मी वाजवत होतो.ते म्हणाले अरे चांगला हात आहे.शिकत राहा.बाबांनी त्यांना सांगितले याला अल्लारख्खा साहेबां कडे शिकायचं आहे.तर ते म्हणाले पाठव कि शिवाजी पार्क समोर स्विमिंग पूलच्या जागेत त्यांचा क्लास आहे.मग काय त्याच दिवशी बाबांच्या मागे लागून तिथे गेलो.अब्बाजी गादीवर बसलेले.समोर अर्थातच तबला.मागे दगडूशेठ गणपतीची मोठी तसबीर.तिला मोठा हार घातलेला .अब्बाजींच्या समोर सहा सात तबले आणि ते वाजवणारे विद्यार्थी.खूप आनंद;भीती अस एकदम वाटत होते.एकजण वाजवत होता त्याचे संपले वाजवून.मग अब्बाजीनी काय म्हणून विचारले.मग बाबांनी सगळे सांगितले.त्यानी विचारले कुछ सिखा  है ?बाबानी सांगितले''मैने थोडा सिखाया है .मग मला वाजवायला सांगितले.झाल्यावर पाया पडलो माझ्या देवाच्या.ते म्हणाले आजसे शुरू करो.इनसे मिलना म्हणून उजव्या बाजूला हात केला.पाहिले तर एक गोरापान तरुण हसतमुखाने बसला होता त्याच्या मागे काही मुले बसली होती.हे होते अब्बाजींचे मानसपुत्र व पट्टशिष्य अशोक  गोडबोले.प्रसन्न व्यक्तिमत्व.त्यांच्या पाया पडलो.मग त्यांनी एक कायदा सुरु केला,लिहून घेताना मी म्हटले सर हा बाबांनी शिकवलाय.तर ते म्हणाले हरकत नाही आमचे पलटे घे वेगळे आहेत.खरच वेगळे होते.ते म्हणाले आता तू पंजाब घराणा शिकणार आहेस.हा माणूस पाहता क्षणीच आवडला.आणि तेव्हा सुरु झालेले नाते आज अब्बाजी गेल्यानंतरही सुरु आहे.तर तबल्याने मला आनंद दिला. प्रेम करणारी माणसे दिली.काही अशी माणसे दाखवली कि आपण कसे असू नये याचे जिवंत उदाहरण.मग साथसंगत करताना ऐकण्याचा रियाज करताना गाण्याच्या शब्दांकडेही लक्ष गेले.मग काव्याचे दालन उघडले.कीर्तने वाजवताना ऐकताना संतांचे अभंग आणि त्याचे निरुपण कानी पडले.आणि संत देवाकडे अडचणी; निंदक लोक दे का म्हणतात ते; आयुष्य जगताना समजले.शिकवताना तर लहान मुले ते म्हातारे असे अनेक जन भेटले.हे लोकही मला समृद्ध करत गेले.एकूण असा प्रवास सुरु आहे.बाकी पुढे लिहूच.नमस्कार .-^-