मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

- जप्ती आणि बाण -

                                                         -  जप्ती आणि बाण -



                             एकदा दिवाळीत पोयनाडच्या आमच्या घरी गेलो होतो. ओटीवर आजी आणि मी बसलो असताना एक फकीर आला. भिक्षा दो माई म्हणाला. आज्जीन मला ,वाढ रे त्याला सांगितलन. ओटीवरच्या एका कोनाड्यात एक डबाभर तांदूळ,काही नाणी आणि पितळ्याच निठव ठेवलेलं असे. मी उठून निठवभर तांदूळ आणि दोन नाणी त्याच्या झोळीत टाकली. तो गेल्यावर आजीला विचारलं हे का द्यायचं? आज्जी म्हणाली ,कुणाला विन्मुख पाठवू नये. आमच्या जुन्या चालीरीती आहेत त्या. मग मी विचारल याचा कधी फायदा झालाय का?तर म्हणे फायदा तोट्याचा प्रश्न नाही गृहस्थ धर्म आहे. आणि आता तू एव्हडा विचारतोयस म्हणून एक गोष्ट सांगू का?मग काय लगेच कान टवकारून बसलो .
                      आपल्या देव्हार्यात एक बाण आहे तो पहिलायस ना .
                     हुम्म तो डोळा असलेला न ?
                     हो . तो कसा आला आपल्याकडे माहितेय ?
                     कसा ?
                    त्याची कथा ऐकण्या सारखी आहे. तुला माहितेय न आपल्या अण्णांचा भाताचा व्यापार होता . तो भरभराटीला            
                   आला आणि त्या बरोबर काही लोकांच्या नजरेत खुपू लागला. कालांतराने अण्णांना गावतील काही जळणाऱ्या
                   लोकांनी बाहेरच्या व्यापार्यांच्या मदतीने अण्णांना एका व्यवहारात उगाच गुंतवले . सौदा झाला आणि पैसे काही
                   दिवसांनी मिळतील अस ठरल होत. तो व्यापारीही काबुल होता. पण अचानक माझे पैसे द्या म्हणून हटून बसला .
                   अण्णांनी त्याला समजावलं कि मजजवळ एव्हढी रक्कम आत्ता नाहीये माझे येणे आहे ते आले कि तुमची रक्कम
                   वेळे आधी देईन. पण तो ऐकायला तयार नाही. कटच ठरवून केलेला. मग तो एकदम उठला आणि म्हणाला ,आता
                   अलिबागेत कोर्टातच जातो आणि जप्ती आणतो बघा. आणि त्याने तसे केलेन. एक्या दिवशी कोर्टाची माणसे आली
                   आपल सामान अंगणात काढून ठेवल आणि घराला सील ठोकल. उद्या कोर्टात या म्हणून निघून गेले. सगळे उपाशी
                   हतबल होऊन अंगणात बसलो होतो. अण्णा अलिबागला वकिलाकडे गेले.  त्यांनी सगळ ऐकल. आपल्याशी त्यांचा
                   आपला चांगला घरोबा होता. ते म्हणाले ,अण्णा आता एक काम करा. असेच घरी जा. ते सील तोडा. सगळ सामान
                   होत तस जागच्या जागी लावा. तुमचे नित्याचे व्यवहार होते तसे चालू ठेवा. उद्या कोर्टात काय सांगायचं ते ऐका ,
                   घराला सील लावलच नाही अस ठाम सांगायचं. त्याचे पैसे कधी द्यायचे काबुल केलेत. अण्णा म्हणले अहो उद्या माझे
                   येणार आहेत ते त्याला देणारच आहे. हा उगाच मागे लागलाय. हो ना मग मी सांगितल तस करा. तुमच काही वाईट
                  होणार नाही . अहो पण  सील तोडायचं म्हणजे ?अहो तुमच घर मी पाहिलं नाहीये का?मला पक्क आठवतंय. मी  
                   सगळ बरोबर करतो तुम्ही फक्त सांगितल तस करा.
                   मग काय अण्णा घरी आले. सील तोडल. सामान लावल. थोडेच तांदूळ होते त्याचा मऊ भात केला.
                                दुसर्या दिवशी अण्णा ,तात्या अलीबागेस कोर्टात गेले. मी इथेच ओटीवर बसले होत्ये. तोच एक साधू ,
                   भिक्ष्या वाढ माई म्हणत अंगणात उभा राहिला. माझ्या डोळ्यात पाणी आल. साधू म्हणाला काय झाल रडतेस का?
                   काय सांगू बाबा आज तुला द्यायला काही नाही मजपाशी. अस नको म्हणू आत डब्यात आहेत ते दे तांदूळ मला .
                   मग डब्यात दोन मुठी तांदूळ होते ते त्याच्या झोळीत वाढले. त्याने झोळीतून काही काढलआणि म्हणाला ,माई
                   तुझ मन पाहिलं. हि वस्तू ठेव तुझ्या जवळ तुला काही कमी पडणार नाही. त्यान हातावर तो बाण ठेवला आणि
                  निघून गेला. त्या बाणाचे डोळे पाहिलेस ना किती सुंदर आहेत तर तो त्या साधून दिलाय. पण मग कोर्टात काय झाल
                   माझा प्रश्न. अरे तेच तर सांगतेय . तिकडे आमच्या वकिलाने जप्ती आलेलीच नाही असा पवित्रा घेतला. कोर्टाने
                  ज्याने सील लावल त्याला विचारल ,तो म्हणाला हो मी सील करून आलोय. आमचे वकील म्हणले साहेब येउन खात्री
                   करा सील लावलच नाही. मग त्या सरकारी माणसाला वकिलांनी परत विचारल ,तुम्ही स्वतः सील लावलात ?
                  तो हो म्हणाला. मग दाखवा पाहू कस लावलत. तो माणूस वैतागला. हात वर नेउन कडी लावायची नक्कल करून
                  म्हणाला अस कुलूप लावल आणि सील केल. मग वकील साहेब म्हणाले नक्की असच तर तो हो म्हणाला.
                 आता वकील कोर्टाला उद्देशून म्हणाले , या गृहस्थांच्या घराला कडी कोयंडा जुन्या पद्धतीचा नाही तर दरवाजाच्या
                  मध्ये आहे हव तर येउन पहा. या मुद्द्यावर ती केस अण्णा जिंकले. सरकारी माणसे येउन घराचा कडी कोयंडा पाहून
                 गेले तर तो जुन्या पद्धतीचा नव्हता. आणि घरावरच संकट टळल. आता याला त्या साधूचा आशीर्वाद म्हण कि
                 वकिली हुशारी पण त्या दिवशी दोन्ही कामी आली अस माझ मत आहे. आणि अस काही झाल नसत तरी
                 ओटीवरच्या कोनाड्यात तांदुळाचा आणि सुट्या पैश्यांचा डबा मात्र कायम राहणार. हे बाकी खर. हे असच चालू होत
                आणि कोण कुठले पांथस्थ येउन दोन चार दिवस पाहुणचार घेऊन जात असत. तो बाण अजूनही आहे. फक्त थोडा
                भंगाल्याने तांदुळात घालून ठेवलाय डब्यात.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा