गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

काळ देहा सी आला खाऊ.

 काळ देहा सी आला खाऊ

आम्ही आनंदे नाचू गाऊ,,,


काळ खायला येण !या अभंगातलं वेगळं.पण तो तसा खायला येतो मलाही कधी,,नव्हे बरेचदा.


बाबांनी एक नाटक बसवलं होत.त्यातले डायलॉग मला पाठ झाले होते.पैकी एक,

व्यंक्या किती वाजले?

काय कि.पण एक ठोका ऐकला.

मग एक वाजला असेल.

जी.

कदाचित दीड.

हा.

कदाचित साडे बारा हि.

असेल जी.

काळाचे ठोके साडे बारा वर असोत एक वर वा दीड वर.तुझ्या साठी ठोका एकच!

व्यंक्या तुला कधी काळ खायला आल्याच नाही वाटत?


नाय जी.

मग लेका या भिंताडा सारखं तुझं जिण.कुणा एकाच्या वासनेची एक विट कुणा एकीच्या वासने ची दुसरी विट. त्यावर मारला मुलामा मुठ भर तांदुळाचा आणि त्यातून उभ राहील हे भिंताड जे उभ ते उभ.पून्हा एकदा कोसळण्याची वाट पहात.


त्यातला व्यंक्या हा नोकर आहे.त्याचा आता मला हेवा वाटू लागलाय.काळ त्याला खायला येत नाही हा त्याचा गुण विशेष.

त्याच नाटकात मुख्य पात्र आंग्रे सरकार.तो एका तरुणीला ,ती डोक दुखतंय म्हणते तेंव्हा म्हणतो,

दुखण्या इतपत का होईना तुम्हांला डोक आहे तर!

या डोक्यात देवान अजब ऑर्गन निर्माण करून ठेवलाय.मेंदू.

बर तो देखील एक मे दो कटिंग सारखा.एक मोठा एक लहान मेंदू.

तो मोठा दिवस भर तर्हा तऱ्हा चे विचार करतो,निर्णय घेतो.मग थकतो.त्याला रात्री विश्रांती.

पण देव तिथंच थांबला नाही.त्यानं स्टेपनी सारखी व्यवस्था करत लहान मेंदू जोडून दिलाय.साला तो एरवी सुप्तवस्थेत असतो पण रात्री स्टिअरिंग तो हाती घेतो ऑटो पायलट सारखं.

मग मोठ्या न दिवसभर,मागच्या आयुष्यात जे चिंतन केल,बघितलं,भोगलं ते याच्याशी मेमरीत बाय डिफॉल्ट पडिक असत.मग हे धाकटे भाऊ रात्री झोप लागू देत नाहीत आम्हास.साल सिनेमा सारखी स्वप्न दाखवतात.इतकी कि कधी खरी वाटून भिऊन उठायला होत किंवा स्वप्न स्वप्नात खर झाल्या सारखं वाटून जाग येते चक्क.मग मोठा जागा होऊन सूत्र हाती घेतो.त्याच विश्लेषण सुरु होत.परिणाम आमच्या झोपेच खोबर ते हि खवट.अश्या वेळी मग काळ खायला येतो.आपण चक्क टकटकीत जागे आणि दुनिया गाढ झोपलेली.

किंवा दिवसा देखील आपण या काळाच्या मिठीत करकचून बांधलेले आणि भोवताली सगळे त्यांच्या कामात गर्क.आपला वेळ शून्य झालेला.

याला काळ खायला येण म्हटलं जात असावं.

अभंगात आहे तसा काळ खायला प्रत्येकास येतोच .तेंव्हा त्याचा ग्रास होण आहेच.पण तो होताना काहींना त्रास होऊ शकतो.मला मात्र होणार नाही नक्की.कारण काळ तर आम्हास आयुष्य भर आलाय खाऊ.

सो आय माई सेल्फ इज खाऊ ऑफ काळ.हौ ब्लेस्ड न.मजा है.

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

उन्हाळ्याची सुट्टी.

 आता सुट्टी शाळेला.म्हणजे रिझल्ट पचवून गावी जायची तयारी.जाताना उन्हाळी करता म्हणून खास ते सुटी हाफ शर्ट पांढरे खरेदी व्हायचे.बाबा बॅग मधे आठवणीन पाटणकर काढ्या च्या दोन बाटल्या घ्यायचेच ज्या प्याव्या लागत.मुंबईची चहा पावडर घ्यायची.st च आरक्षण बघायचं.

 स्टॅण्ड वर उतरताच लक्ष जायच्या आधी बैलगाडी लावून उभा असलेला आमचा गणपत दिसे. आम्ही उतरल्याच बघून तोंडातली विडी टाकून तो कासरे गाडीला बांधून पुढ येई सामान घ्यायला.आलावं म्हणत पुढ होऊन थांबे.गाडीत पेंढ्यावर स्वच्छ पोती टाकलेली असत बसायला.मग आम्ही चढलो कि बॅग्स ठेऊन तो बैलाच्या पाठीवर थाप मारून त्याला बाजूला करून कासरे हातात घेई.मी त्याच्या बाजूला सरकून बसे.त्याच्या विडी चा वास मजेशीर वाटे.   घरी  पोचताना दिवे लागण होई .लांबूनच घराच्या कौलातून मीणमीणता प्रकाश पाझरलेला दिसला कि आज्जी स्वयंपाक घरात आहे समजायच.जरा पुढ आलं कि ओटी वरची झोपाळ्या ची कुरकुर तात्या तिथ बसलेत सांगत असे.

गाडी खालच्या अंगणात गोठ्या समोर उभी राहिली कि आधी घरात पळत जायच.मग तात्या किंवा आजी,आधी मागील दारी जाऊन पाय धुवून ये म्हणत.आजी न चुलीवर चहाच आधण तयारच ठेवलेलं असे.मग हळूहळू ख्याली खुशाली विचारून सांगून बॅग उघडली जायची.

मगचे दिवस मोकाट असत.आढीचे आंबे,पडी चे आंबे,रानात जाऊन करवंद् खायची.जांभळ,जांभ अस कायकाय.पेंढा जनावरांना घालण.त्या उडवी वर बसणं.मग खाज येण. आणलेला पाटणकर काढा नको म्हणत पिण. एखाद दिवस डोळ्या ची साथ येते या दिवसात, म्हणत डोळ्यात कांद्या चा रस रडत रडत घालून घेणं.

ठेच लागली तर खोटेवर बिब्बा घालून वर राखुंडी लावणं.सकाळी पाण्याच्या चुलीवर पाणी तापवण.ते उरकलं कि त्या चुलीच्या उरलेल्या निखाऱ्यात बटाटे,रताळी,काजू बी टाकून दुपारी उकरून खाण. संध्याकाळी गुर घेऊन तळ्यावर् जाण.तिथ त्यांना चोळण हाती घेऊन चोळून अंघोळ घालण.

पहाटे उठून आई आज्जी फेण्या करत.त्या उतरल्या उतरल्या खाऊन फस्त करण.मग दुपारी फेण्या,चिकवड्या,पापड वाळत घातलेल असे त्याची राखण करत बसणं.एक आरसा तिथ ठेऊन आजी म्हणे,तुमची नको राखण.पाखर राहतील दूर आणि वाळवण होईल लंपास. अंगण्यात पाणी मारलं कि येणारा सुगंध म्हणजे,,,

पडवी ला बाबांनी पूर्ण पडदे लावलेले त्यावर पाणी शिंपडणं स्प्रे बॉटल न.मग जरा गारवा येई.अंगणातून गरम हाळ मारे.पंख्या ची हवा देखील गरम येई.घर आमच्या सरस्वतीने गोलाकार नक्षी काढत सारवलं आणि भिंती देखील सारवल्या म्हणजे जरा थंड वाटे.सारवलेल्या माजघरात दुपारी उघड्या अंगाने पालथ पडलं कि सुख वाटे.

रात्री अंगणात झोपायला गाद्या घालायच्या. उशाशी पाण्याचे तांबे,बॅटर्या, काठी ठेवायच.वर मांडव असे.आजीला गोष्ट सांग म्हणून पिडायचं.अजून एक करत बसल कि मग ती कापूस कोंड्या ची गोष्ट काढून बदला घेई.रात्री कसले पान पडल्याचे,काडी पडल्या चे आवाज आले कि भीती वाटे.पण तात्या रामरक्षा म्हणत शत पावली करत ते ऐकून धीर येऊन झोप लागे.

दिवस भर मित्र जमवून विटी दांडू,काठी उडवी,गोट्या,बॅडमिंटन मग क्रिकेट दम लागे तोवर खेळून समाधान  होत नसे.कधी आमच्या कधी मित्राच्या शेतावर बैल गाडीतून जायचं.तिथली मजा वेगळी.शेजारच्या मित्रांना दुपारी रात्री दगड उंच उडवून  रस्त्यावर टाकत आंबा पडला वाटायला लावून फसवायचं.पहाटे आमच्या विशाल बकुळीची अंगण भर चादरी सारखी पसरलेली फुल गोळा करायला हाती पेटत टमरेल घेऊन कोण कोण यायच्या आणि ओचा भर फुल घेऊन जायच्या. मग ती आणि आवाडातली गोकरणं,बिट्टी,चाफ्याची फुल वेचून परडी भरून तात्यांना पूजेस ठेवायची नेऊन.

मग एक दिवस परतायचा उजडे.पाय जड होत.आज गणपत कामावर येऊच नये वाटे.पण तो अचूक वेळी पहाटेच् येई आणि गाडी तयार करून ठेवायचा.इतक्या मोठ्या आवारात मनसोक्त हुंदडल्यावर परत मुंबईत टिचभर जागेत जाऊ नये वाटे.पण निघावं लागे.आजी जवळ घेऊन प्रेमान मेतकूट,भाजणी,लोणच,पापड अस काय काय देई.

ते सगळं देखील गेल आता.पुन्हा परत न येण्या करता.

सुख यातच मानतो,निदान हे सगळं काही काळ का होऊन अनुभवण्या इतक नशीब जोरावर होत.