व्यायाम शाळेच्या पथकात प्रार्थना आटोपली आणि सर्व जण जायला निघणार इतक्यात सरांनी शिट्टी वाजवली.
लक्ष द्या रे.आपल्या दोन्ही शाखांची सहल रविवारी आयोजित केली आहे.त्याविषयी माहितीचा कागद सर्वांनी घेऊन जा.आणि जे येणार असतील त्यांनी त्यांची वर्गणी आपापल्या शाखेत जमा करायची आहे.हे माहिती पत्रक प्रत्येकाने घेऊन जा.
एकच कल्ला झाला.सगळे आनंदाने चर्चा करू लागले.काय न्यायचं,कुणी कुठं भेटायचं,सोबत आणायच्या वस्तूंच्या यादितल काय आपल्या कडे नाही या विषयी.
सम्या खुश ना?तू विशेष आनंदात असणार.त्या शाखेतून ती पण येणार.
हा मग.पण नाही आली तर?
अस कस होईल .
चंद्या ते हाय फाय शाळेत जातात.अभ्यास बुडेल म्हणून नाही आली तर?
छ्ट,ती टीम येणारच.बातमी लागली मला आधी.प्राजक्ता कालच म्हणाली मला.
ती कुठं भेटली तुला.
अरे ऑफिस मधे आली होती.त्यांच्या सरांनी काही कागदपत्र नेऊन दे म्हणून सांगितल होत.ते द्यायला आली होती अण्णांच्या कडे आमच्या.
मग.
मग काय.तीच म्हणाली,येणार न ट्रीप ला?आमचा अख्खा ग्रुप येणारे.आता पटली खात्री.
येस्स..
रविवारी आईने बॅग भरून देताना काय काय दिलेले आहे सोबत ते दोनदा सांगितल.लिंबू,मीठ,साखर मागे खणात आहे.लहान चाकू पण तिथच ठेवलाय.नीट बघून घे नाहीतर असून मिळायचा नाही .आणि सर्व गोष्टी नीट परत आणायच्या.
समीर च लक्ष नव्हत त्या बोलण्या कडे तरी हो हो करत होता.चला पळा आता नाहीतर उशीर होईल अस आईने म्हणताच पळत सुटलो.धापा टाकत मैदान गाठल.
बस आलेलीच होती.माझा ग्रुप उभाच होता माझी वाट बघत. चंद्या पुढं आला .चल जागा पकडू आपण. आत शिरताच कुठं बसायचं प्रश्न पडला कारण त्या शाखेचा तो ग्रुप कुठं बसेल याची कल्पना नव्हती.चंदू सरळ मागे जाऊन बसला आणि ये इकडे म्हणाला.जाऊन बसलो.
इथ का?किती मागे आहे.ते लोक बहुतेक पुढं बसतील अस वाटतंय मला.
तू डोक नको लावू.तुझ्याच फायद्या करता इथ येऊन बसलोय.
म्हणजे?
अबे माहिती काढलीय मी.आपल्या शाखेच्या मुलांना पुढं त्या शाखेची मुल मागे बसतील.सीट मोजून बसलोय.आपल्या मागच्या सीट त्या शाखेच्या असतील.
ग्रेट आहेस तू.मी खिडकीत बसतो.
नाही .तू साईडलाच बस.
का?
मी सांगतो म्हणून.
तुला खिडकी हवीय सांग न सरळ.
तू न भोट च राहणार.तुझ्याच भल्या करता सांगतोय.
कस भल होईल माझं ते पण सांग.
अरे,,,आता तू आत बसलास आणि तिचा ग्रुप मागे बसला तर तुला ती दिसेल का चम्या?ये बस खिडकीत मी तिकड बसतो.
आयला,भारी डोक तुझं. थँक्यू मित्रा.
म,समजत नाही तुला.
इतक्यात तिच्या मैत्रिणी मागे येऊन बसल्या पण ती नाही आली.
चंद्या बघ ती येणार नाही बहुतेक.
गप रे.नीट वळून बघ. मागची अखंड आडवी सीट अर्धीच भरलीय तिच्या ग्रुप नी.आपल्या पलीकडील रांगेत जी खिडकी आहे मागे तिथं ती येऊन बसेल.ती बघ ती येत्येय.
मी पटकन बाजूच्या रांगेतील खिडकीतून बघितल तर ती दोन मैत्रिणी सोबत येत होती.
वेगळीच दिसत होती आज. ट्रॅक सूट घातला होता.त्या आल्या आणि चंदू म्हणाला त्या प्रमाणे सरळ मागे गेल्या आणि ती खिडकीत च बसली.
मी डोळे विस्फारून चंदू कडे बघितल .साल्या इतका खरा अंदाज कसा बांधला तू?
आपल असच आहे बॉ.तुला कळत नाही माझी हुशारी.
त्याला टाळी देत म्हटल,आज मानला तुला गड्या.
एकदा हजेरी घेऊन बस सुटली.
लक्ष सारखं मागेच जात होत.त्यांचं आपसात हसण खिदळण सुरू झालं होत.मधेच नजर मिळत होती.पण..
तोच मागून त्यांच्या ग्रुप मधून कुणीतरी ओरडून म्हणाली,अरे काय यार ट्रीप ला आलेत तरी सगळे वर्गात असल्या सारखे गप्पच का?ट्रीप साँग म्हणा.मुख्य शाखेतली टीम अगदीच थंड आहे बुआ. ए चल आपणच सुरु करुया .
ती इतकं म्हणली आणि त्या ग्रुप ने इंग्रजीत सुरू केलं मोठ्यानं,इन मॉर्निंग बाय द सी,,,,
चायला हे गाणं प्रथमच ऐकतोय रे.
हा ना,या मोठ्या शाळेतल्या ना मग इंग्रजी च गाणी म्हणणार .
त्यांची दोन झाल्यावर मात्र पुढं पक्याची सटकली.
अरे आपण काय गप्पच रहायचं का?
आपला पण हिसका दाखवू न.
होऊन जाऊ दे..
मग पक्याने मराठी गाणी सुरू केली
दिपवू साऱ्या चाळीतल्या बायका
थांब होऊ दे सकाळ...
मागून आवाज आला, ए हे काय ट्रीप साँग आहे का?
आमचं असच असत.
मी गप्प होतो .पक्या ओरडलाच,सम्या तू का गप्प?अस नाय चालायचं तू आपल्या शाखेचा असून गप्प का?
नाही रे जरा घसा बसला होता काल म्हणून.
पक्या मागे वाकून बोलला,मला कारण माहितीये तुझ्या गप्प बसण्याच,,त्याला पुढं बोलू न देता त्याच तोंड बंद केलं आणि,
माहितीये न? म चूप बस.
अरे पण त्या आपल्याला चिडवतात.
ते तू बघ.
सम्या हे बरोबर नाय.पण जाऊदे दोस्ती खात्यात तुला सोडलं.पण मी आपली गाणी बोलणार.मग आमच्या ग्रुपच्या आवाजात त्यांचा आवाज बंद झाला.
मुक्कामी पोचल्यावर दोन्ही शाखेचे चार तंबू लागले होते.त्यात दोन मुलांचे दोन मुलींचे.त्यात सगळे स्थानापन्न झालो .आता पाणी आणणे,स्वयंपाक करणे आम्हालाच करायचं होत.
सरांनी पाणी कुठून आणायचं ते दाखवून दिलं.मुलींनी स्वयंपाक करायचा पोळी भाजी सकट .
मुलांनी पाणी भरायच लागेल तितकं.भाज्या करायला ऐच्छिक होत .
अजून तिच्याशी बोलण झालच नव्हत.
तू काय घरी पोचलो ट्रीप झाल्यावर तेंव्हा बोलणार का तिच्याशी?
चंदू चांस च मिळत नाही.सतत ती
ढापणी तरी असते तिच्या सोबत किंवा प्राजक्ता तरी.
संधी मिळवायची मग मिळत नसेल तर.आज नाही तर कधी?बघ तूच.
तशी हळूच बघते रे.
वा वा,मग त्यातच खुश असशील तर जा पाणी भरायला.
इतक्यात तीच समोर बालदी घेऊन आली रिकामी.
ए जा पाणी आणून द्या.नुसते उभे काय राहिलात.आम्हीच काम करायची का?
आणतो की,पण काय करणार जेवायला?
ते गिळायला बसलात की कळेलच.
तुला काय करता येत?
म्हटल न बसलास की कळेल.आणि मला काय येत तुला काय करायचय.
अस कस,मलाच खायचेय ना.
म होईल तस मुकाट्याने खायचं.
पाणी आणा आधी.
जातो न,म्हणून मी निघालो तिच्या हातून बालदी घेऊन.चंदू पण आला मागून.
शाब्बास काहीतरी बोललास.
चायला पण ती धड बोलतच नाही.
चलता है रे.असू दे.
दुपारी पंगत बसली.सगळ मुलींनीच केलं होत.आमटी,बटाट्याची भाजी,चटणी,भात आणि पुरी.सरांनी श्रीखंड आणल होत ते देखील होत.एकेक जणी वाढायला येत होत्या.पुढं जात होत्या.स्वयंपाक बरा झाला होता पण पुऱ्या कडक आणि न फुगलेल्या होत्या.सरांच लक्ष होत म्हणून मान खाली घालून पुरी तोडायचा प्रयत्न करत होतो तर आणखी पुऱ्या धरलेला हात पानात दिसला एकदम.पटकन म्हणून गेलो,नको पुरी मला जाम कडक झाल्यात.पाणी पुरी ची पुरी पण कडक असली तरी खुसखुशीत असते.
आम्हाला काय सवय आहे रोज पुऱ्या करायची .किती मेहनत लागते माहिती आहे का?नुसत बोलायला काय जातंय.
चमकून वर बघितल तर ती!
फणकाऱ्यात पुरी ची टोपली घेऊन पुढं झाली सुधा होती.
ए मला वाढ अजून पुरी.इती चंदू.
कशी रे झालीय?
अरे मस्त मला आवडते तशी.
बघ तुला आवडली ना!काहीजण उगाच नाव ठेवण्यात पटाईत.
असा राग आला चंदू चा.
तुला आयत कारण मिळालं ना इम्प्रेशन मारायला.
तू नाही ना मारलस मग मी मारल त्यात काय?
तू ये बाहेर मग सांगतो.
तो हसत पुरी दोन हातानी तोडत
श्रीखंडात टोचत खाऊ लागला.
जेवून झालं आणि बाहेर हात धुतले.
प्राजक्ता वाटच बघत असल्या सारखी पळत आली जवळ.
ए बावळट काय बोललास ?ती रडत बसलेय.
बोमला.अरे मी काय बोललो?
पुऱ्या कडक झाल्या त्या कुणाच्या घश्या खाली उतरल्या नाहीत मग?
माझ्याच.पण सवय नाही न ग.आईची प्रत्येक पुरी फुगते.
तीन कपाळावर हात मारला.
अरे ती आई आहे.आम्ही कधी केलं नाही इतकं काम.आणि तिने कणीक मळण्या पासून सगळ केलं बराच वेळ. तळायला पण हट्टाने बसली.का?तर मला हेच जमेल म्हणून.बाकी मुलींना येत होत भाजी वगैरे करण थोडंसं.
तीच तुला माहितीये न,किती बक्षीस मिळलियत आणि त्या करता किती मेहनत घेते ते.पटकन बोलून मोकळा झालास.
अरे पण तीन इतकं मनाला का लावून घेतल.अपमान करायचा हेतू होता का माझा?
नाही न,पण चटणी छान झालीय म्हणून बोललास की नाही.
हो बोललो.खाल्ल की चव सांगायची सवय आहे आमच्या घरी.नाही बोललो तर आई म्हणते,आज मनास आलेलं दिसत नाही काही. म त्यात काय झालं?
चटणी अनु ने केली होती.
बर मग.
शी बाबा.जा तू.तुलां काही कळतच नाही.
म्हणून प्राजक्ता निघून गेली.
कळेच ना काय झालं.
दुपारी थोड्या विश्रांती नंतर खेळ सुरू होते कुणाचे कुणी गप्पा मारत होते.
ती तंबूत च होती.दिसलीच नाही.
संध्याकाळी जवळच्या धरणावर फिरायला नेलं आम्हाला.तिथंही ती तिच्या ग्रुप मधेच होती.बघायला तयार नाही.
रात्री कॅम्प फायर ला पण गप्प.चायला मुडच लागेना.त्यात एक त्या शाखेतला कुणी दिवटा स्केच करत होता. सरांचं झालं आणि कुणा कुणाचं झालं मग ती तंबू जवळ उभी होती तीच पण काढल.चंदू म्हणाला ,अरे चांगल काढतो रे.
बर बर .
तू का नाही बघितल?
तिन काढू का दिलं?
तिलाच विचार ना,मी कस सांगू.
एक दगड उचलला चंदू ला मारायला तर तो पळून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काही गलबला ऐकला म्हणून गेलो तर त्यांचा ग्रुप मीसिंग होता.सर आणि काही मुल शोधायला धावली होती.मी पण जायला निघालो तर शिट्टी वाजली म्हणून थांबलो.छोटू सर ओरडले,तुम्ही आणि कुठं निघताय ?नाहीतर तुम्हाला शोधायला जावं लागेल.मागे ये.
तंबूत चंदू ला म्हटल काय झालं रे?
अरे सकाळी त्या मॉर्निंग वॉक ला म्हणून धरणावर गेल्या आणि वाट चुकल्या .
थोड्या वेळाने सर आणि तिचा ग्रुप आला.वाट चुकल्या मग सरांनी खूप शोध घेतला तेंव्हा मिळाल्या.
धावत पुढं गेलो त्यांच्या तंबू जवळ.ती रडतच जात होती. ए थांब ना,काय झालं?
जग जाहीर झाल आणि तुला माहित नाही.
चिडू नको ना.काळजी वाटते म्हणून बोलतोय न.त्या तुझ्या सरांचा राग आलाय.अश्या वेळी ओरडत काय बसतात तुम्हाला.
तिच्या डोळ्यात अजून पाण्याची धार आली आणि ती तंबूत दिसेनाशी झाली.
सगळे चूप होते.शिट्टी वाजली म्हणून सगळे गोळा झाले.सर म्हणाले,आज खरतर आपण अजून काही वेळाने निघणार होतो पण नुकतच जे झालं त्यामुळे आपण लगेच निघत आहोत.उशीर झाला तर तुमच्या पालकांचे फोन येऊ लागतील तिकडे ऑफिस मध्ये.तर चला निघुया.
मग सगळी आवरा आवर करुन बस कडे निघालो.ती दिसली.तिच्या जवळ जाऊन म्हटल,अरे यार खरच सिरीयसली घेऊ नकोस सरांचं आणि माझंही.नकळत पुरी कडक झाली म्हणलो.पण पुरी अशीही छान लागते हे प्रथमच कळलं.
ऐकून तीन मान वर करून सरळ नजर भिडवून फक्त पहात राह्यली आणि झटकन पुढं गेली.
आम्हीही सीट पकडल्या.
ती त्याच खिडकीत बसली होती.अजूनही चेहेरा रडवेला होता.
तीन माझ्याकडे बघताच खूण करून रडू नको म्हटल.तिची मान परत खाली.
बस सुरू झाली . चंदूने बाही खेचली.
राहू दे मूड नाही तिचा.
मग मी पुढं बघत सीट वर डोक टेकल.
बस जाताना एकदम शांत होती.
अचानक मागून डोक्यावरून खाकी पुडी चेहेर्यावर आली.वळून बघितलं तर प्राजक्ता.
घे.
लिमलेट ची ऑरेंज गोळी होती मोठी.
पुडी भरलेली होती .
नको मला thanks.
घे.तिने तुला द्यायला सांगितली म्हणून देतेय.
चमकून मागे बघितल.प्राजक्ता म्हणली,अजून रडवणार तिला?
नाही.दोन दे.चंदू पण आहे बाजूला.
तीन दे त्याला.
मागून तिचा आवाज आला.
बघितल तर फक्त मंद हसली.खिडकीतून वारा आला आणि तिचे केस भुरभुर उडू लागले.बघतच राहिलो .ती परत खिडकीतून बाहेर बघू लागली .
चंदू घे.
एकच दे.दोन तुलाच द्यायला सांगितल्यायत.
दोन लीमलेट एकदम तोंडात टाकल्या.
इतकी वर्ष झाली .ती भेटली नाही मग.
पण लिमलेटची चव अजून रेंगाळून आहे जिभेवर.