गुरुवार, २४ मे, २०१८

*पाऊलाची ओळख*

*पाऊलाची ओळख*
आमच्याकडे कायम असणारे आबा आणि गणपत-सरस्वती ची जोडी म्हातारपणा मूळ घरी बसली.घरच सर्व करणं एकट्या आईच काम नव्हतं.चार पैकी तीन अंगणी झाडली तरी दीड तास सकाळचा जायचा. कुणीतरी कामवाली बघायला सांगितलं गेलं ओळखीच्यात.एक दिवस बदक आजी दारात उभी राह्यली.विधवा होती. बुटकी,पाय वाकडे होते तिचे त्या मूळ चालताना वर खाली होत असे.म्हणून गावातली कार्टी तिला बदक आजी चिडवत हे माहीत होतं. आमच्या घरापासून वरच्या अंगाला तिची खोली होती त्या मूळ जाता येताना पाह्यलं होत.मुलांनी चिडवलं कि हातात धोंडा घेऊन माग जायची,पण कधी मारलन नाही कुणाला फक्त तोंडाने बोलायची.आई बाहेर आली.का हो आलात ?म्हणून विचारलन तर म्हणली,कामाला हवं होतं न तुमच्याकडे म्हणून आलो.आई म्हणली,आजी हवंय खरं पण तुम्ही नको.तुमच्याकडून काम करून घ्यायला कसं तरी वाटेल मला.आजी म्हणली,मी करती न काम दुसऱ्यांची हि, तुमच हि करेन.
अहो आजी भांडी धुणी आणि आता मे महिन्यात विहीर खाली गेलीय तेंव्हा प्यायला 4 खेपा शंकराच्या विहिरीवरून पाणी हि आणायचं आहे तुम्हाला कसं जमेल.
यावर जरा विचार करून म्हणली,थांबा जरा आलोच मी काय.म्हणून गेली आणि पाच मिनिटात आपल्या मुलीला घेऊन आली.मी नाय हि करील मंग तर तर झालं.लीला उभी होती.रंग काळा.दात जरा विरळ.पण काटक अंगलट.ती पटकन पण हळूच म्हणली,ताई तुम्ही नका काळजी करू मी करेन सर्व.
बदक आजी म्हणली,बघा ताई आजवर कुठं कामाला जायच म्हणल तर नाय म्हणायची आज तुमचं काम मिळतंय म्हणलो तर आली लगेच.मग आई न तिला जवळ बोलवलन आणि काम समजवलन.तुम्ही बिनघोर रहा ताई मी हाय.
मग लीला कामाला येऊ लागली.सगळं काम चोख.धुणे भांडी कुणी केलेलं आईला पसंत पडणं कठीण असे पण लीला च काम आईला पसंत पडलं.पहाटे लवकर उठून लीला पाण्याला जायची.दूरवरून आणावे लागे म्हणून आई मला म्हणली, सलील आपला रस्ता खडकाळ आहे तू निदान बिवलकराच्या घरापासून तिच्या कडून हंडे घेऊन ये बघू ती पोर किती करील.मग मी गेलो.ती पाणी दोन हंडे एकावर एक आणि त्या वर एक अजून कळशी.एक हंडा डाव्या बगलेत आणि उजव्या हाती पोऱ्या अस घेऊन घामाघूम होत येत होती.मी पुढं झालो म्हटलं दे मी नेतो.त्या अवस्थेत जॅम हसली अन म्हणली,सलीन दादा हे तुला जमणारे का ? मी काय बोलणार.नुसता तिच्या सोबत आलो.आईने सर्व ऐकलन न म्हणली,ठिकय मग तू विहिरीवर रहा पाणी ओढून भांडी भरून दे.म्हटलं ,चालेल जातो.परत लीला म्हणली,दादाला कुठं पाठवलाय ताई?तिथं सर्व बायका असतात तो बिचारा कुठं जाईल मधच. एकूण तिनं काही ऐकल नाही.अशी कामसू होती.परत कधी काही मागत नसे.सणासुदीला आई नेहमीच गडी माणसं घरी जेवायला बोलावीत असे तस लीला ला म्हटलन तर लीला लाजत असे.नको ताई तुम्ही बांधून द्या मी घरी जाऊन खातो बेबी सोबत.
अग तुझ्या घरी ही डबा देत्येय न मी तू इथं च जेव.पण ती थांबत नसे.तिच्या घरी तिची धाकटी बहीण ही होती. या दोनच पोरी म्हातारीला.धाकटी बेबी.जन्मजात आंधळी आणि पायाने लुळी. ती खोली बाहेर बसून असे.या दोघी नसल्या तरी एकटी शांत बसायची.लीला ला निरोप द्यायला गेलो तर हसून म्हणत असे,हा सांगतो रे दादा तिला. तू कसा हायस. अशी माझी चवकशी करी.आईने पाठवलेला अमुक जिन्नस खूप छान झाला होता मी भरपूर खाल्ला हं एकटीनं म्हणायची.पोयनाड सोडे पर्यंत लीला येत होती घरी.
मग बरेच वर्षांनी पोयनाडला गेलो.मित्रा सोबत भटकायला बाहेर पडलो.लीला राहायची ती खोली बंद होती.तीच लग्न झालं आणि बेबी न आजी दुसरी कडे रहातात अस तो म्हणला.परत येताना एक ठिकाणी विक्या म्हणला,तुला बदक आजी न बेबी ची आठवण झाली होती न त्या हल्ली या घरात रहातात बघ.जातो का हाक मारायला?म्हटलं नक्की चल जाऊयाच. विक्याने हाक दिली,ए बाय बघ कोण पाहुणा आलाय तुझ्याकडे.लांबून दिसलं बेबी जरा मोठी झालेली दिसली तरी तशीच बसली होती दाराकडे नजर लावून दिसत नसलं तरी.मी पायऱ्या चढून दारासमोर उभा राह्यलो.मी  म्हटलं,काय गो ओळखलं का मला?
क्षणभर पावलं वाजल्यापासून ती डोळ्यांची पापणी बारीक करून विचार करत होती ती अचानक म्हणली,त ! न ओळखायला काय झालं ?सलीन दादा न तू ?कसा आहेस रे आणि ताई ,बाबा ,शैलू सर्व कसे आहेत.
मी चाट पडलो.मनात आलं हिला दिसू लागलं की काय?
बेबे कसं गो अचूक ओळखलस तू इतक्या वर्ष्यानी?दिसत का तुला आता?
तोंडाने चक अस मोठा आवाज करत हसली न म्हणली,नाय रे.
म ओळखू कसा आलो मी तुला?
तुझी पावलं वाजली न ,म मी ओळखलं.मी अवाक!मग माझ्या सोबत कोण आहे सांग बघू?
तो विक्या दादा आहे कि.
या पोरीने माझ्या पावलांच्या आवाजावरून ओळखलं हे पटतच नव्हतं पण ते खरं होत.मग तिच्या शी जरा गप्पा मारून निघालो सुन्न होऊन.
देव तरी असा कसा?एकटी विधवा बदक आजी.पदरी दोन पोरीतली एक आंधळी न पांगळी. दुसरी धडधाकट पण लग्न होऊन गेलेली.आता या राह्यलेल्या मायलेकी कसं आयुष्य काढतील?
इतका वनवास देऊ नये देवानं कुणालाही.काही वर्षे खडतर काढली ठिकय पण नंतर तरी किमान सुख द्यावं सर्वांना.विशेषतः कष्टकरी लोकांना तरी अस बेभरवशाचे जीणे नको रे देऊ.त्या माय लेकरांना सुखी ठेव रे अस शंकराच्या देवळा समोरून जाताना त्याला म्हटलं.अशी माणसं विसरता येत नाहीत आणि आपल्याला त्यांच्या करता काही करता आलं नाही याची खंत वाटते नेहमी.

रविवार, ६ मे, २०१८

बाईक हणताना रस्त्या ची वेगवेगळी रूप दिसतात.काही लाल मातीची,कधी खडकाळ,पावसात तर त्यात पाण्याची धार बिलगलेली.महामार्ग नागराजा सारखा पहुडलेला असतो.कधी अगदी नाकासमोर जाणारा तर कधी नागमोडी वळण घेत.कधी आजूबाजूस प्रचंड मानव वसाहत तर कधी निसर्ग कुशीत घेऊन.शहर जवळ येईल तसा गोंगाट वाढत जाणारा आणि कधी निरव शांतता.दिवसा तर समोर तापलेली हवा मृगजळ ही दाखवते नमुना म्हणून.रात्री हाच रस्ता सुस्तवलेल्या अजगरा सारखा शांत पडून असतो.शरीरभर गार लहर जवळीक करू पहाते. हे कुणाला गूढ वाटेल कुणाला रोमँटिक मला एकांतवास जो शांती देणारा असतो तसा वाटतो.बाईकही या वरून चालताना एक मस्त पण हलका सूर लावून चालत असते आश्वासक पण.आश्वासक अश्या करता कि,हा आवाज इंजिन उत्तम काम करतय काळजी नसावी असा विश्वास देणारा म्हणून.मग आपण आपल्या विश्वात रमतो.गाडीवर कंट्रोल एक मेंदू अगदी व्यवस्थित करत असतो.दुसरा मात्र स्वतःच्या मुशाफिरीत मग्न होतो.अशी दुहेरी मुशाफिरी सुरू असते.कधी गंतव्य स्थानाची ओढ असते पण मला असा रस्ता संपू च नये असं वाटत.बरेचदा कुणी त्या रस्त्यावरील सह प्रवासी दोन पाच मिनिटं इतकं मोकळं बोलतात,वागतात कि अजून दुनियेत माणुसकी शिल्लक आहे याचं आश्चर्य मिश्रित समाधान मिळत.
हेल्मेट वर समोर च्या गाड्यांचा प्रकाश आभासी प्रकाशाचा खेळ करून दाखवत असतो.त्याला न फसता मार्ग नीट काढायचा असतो.मग त्याला साथ द्यायला हँडल वरचा आरसा मागच्या वाहनांचा प्रकाश खेळ सुरू करतो.हळू हळू याची सवय होते आणि हे ही थ्रिल आपण मास्टर करतो.
अस सुरू असताना एखादी पाय वाट अचानक खाली उतरून तिच्या सोबत यायला भूल घालते.वेळ असेल तर पडावं बळी त्या भुली ला.कारण बाईक म्हणचे स्वातंत्र्य आहे.अशी अनोळखी वाट चाका खाली घ्यावी आणि मन सांगेल तिथं जावं.
हे अनुभवत असताना परत गुलजार साहेब आठवतात.त्यांनी हा रस्ता प्रपंच  इतका मस्त विशद करून सांगितलाय. त्याला तोड च नाही.ते ऐकल असलं तर त्याच प्रत्यंतर मिळत असत आपल्याला. शेवट कविता पुस्तकातून बाहेर पडून अशी अनुभवली कि जास्त कळते.
इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते
कुछ तेज कदम राहे
पत्थर कि हवेली को
शिशे के घरोदे मे
तिनको के नशेमन तक
इस मोड से जाते है
खरच तसे असतात रस्ते.घाईत असणारे हायवे.सुशेगात जाणाऱ्या पाय वाटा
मग राजे हो रविवारी चिंता सोडून बाहेर पडा. गूळ पोहे भरून घ्या एक पाण्याची बाटली सोबत असू दे.रोजची टेन्शन राहू देत बाजूला आणि मारा किक बाईक ला.आणि मस्त वाचत जा बोर्ड,
अमुक तमुक ग्राम पंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे मग येताना त्याच बोर्ड ची मागची बाजू सांगेल
या परत,आमची हद्द संपली आपला प्रवास सुखाचा होवो
🙏🏻🌹