बुधवार, ८ जानेवारी, २०२०

बाल भारतीतला भैरू.

पहाट झाली. मी उठलो. ब्रश करून चहा घेतला. मोबल्या काढून वर काय ,बघू लागलो. (व्हाट्सप च मराठी भाषांतर:-वर काय
)
अरेच्या रात्री मस्त मैफल जमली होती तर? मग पोस्टवून प्रभात फेरीस निघालो.


भैरू आठवला का बाल भारतीतला बालक विहाऱ्यांनो? तो भैरू आता रिटायर्ड होऊन कैक वर्ष झाली असतील. कदाचित, त्याच्या मुलांची लग्न झाली असतील. मग दोन सुनांमध्ये,भला उसके पास मुझसे अच्छी साडी क्यो?असा प्रश्न उभा राहिला असेल. मग भैरू च्या मुलांची गोची झाली असेल.त्यांनी भैरू कडे वाटणी मागितली.भैरूने नाईलाजाने जमिनीची वाटणी करून घर तीन हिश्यात वाटून एक घराची तीन वेगळी घर केली असतील.तुम्हाला वाटणी दिली पण मी माझा नांगर मात्र माझ्याकडे ठेवणार कारण तो माझा ट्रेड मार्क आहे.त्या मूळच आजचा प्रौढ वर्ग मला ओळखतो.
मुलं म्हणली असतील ठेवा बाबा. तुमच्या मनासारखं होऊ दे. नाहीतरी जमीन राहिलीय कुठं. आम्ही ती विकून बंगले बांधले, गाडी घेतलीय. या घरातील हिश्यात आलेल्या रूम भाड्यावर दिल्यात.
किंवा
 भैरू आता शेतावर ट्रॅक्टर घेऊन जातो. इस्रायली पद्धतीने हायड्रो फार्मिंग शिकून एक मुलगा आलाय त्यानं शेती आधुनिक पद्धतीनं करणं सुरू केलंय. भरघोस उत्पादन.  ऑरगॅनिक प्रकल्प असल्याने त्यांच्या पिकांना जबरा मागणी आहे. धाकटा मुलगा रत्नांग्री च्या पशु वैद्यकीय कालेजातून डिग्री घेऊन गोधन वाढवतोय. त्याच्या गायीच्या दुधास न तुपास चढा भाव मिळतो. तुपाला तर 2 हजार भाव असून देखील वेटिंग असत. जोड धंदा म्हणून गांडूळ खत, गोमूत्र, शेणी पासून मच्छर मारक औषध अशी प्रोडक्टस ही जोरात विक्री होत्ये. एक सून पशु वैद्यक असल्याने घरचा Dr गुरांना मिळतो आणि आजूबाजूस असलेल्या सर्व गावातील जनावरे तिच्याच अंडर ट्रिटमेंट घेऊन मस्त असतात. दुसरी सून स्वखुशीने घर सांभाळते. तिच्या हाताखालील टीम घर आणि शेत दोन्हीकडच्या भोजन आदी ची व्यवस्था बघतेच पण ती इतर खाद्य पदार्थ तयार करून विकते ज्याला चांगली डिमांड आहे. शेतातील आंबे,फणस,आवळा,जांभूळ, केळी वग्रे फळांची वेगवेगळी उत्पादने करून ती उत्तम नफ्यात विकली जातायत. तिची आणखी एक टीम बाहेरची लग्न मुंजीची ची ऑर्डर घेऊन कॅटरिंग व्यवसाय जोरात सुरुय. नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात.
आणि भैरू आणि त्याची बायको अत्यंत समाधानाने हा सगळा व्यवहार भरल्या हृदयी पहात शेतातल्या स्वतः च्या विठुरायाच्या मंदिरात हात जोडत असतात. तिथं नेमाने किर्तन प्रवचन सुरू असतं आणि गाव दर्शनास येत असत.
आणखीन तिथं गेलात ,तर विस्तीर्ण गेट वर पाटी दिसते. भैरू फार्म हाऊस!!! पुढं आलात की गोल आयलंड मध्ये सुबक गार्डन फुललेली असून मध्यभागी तोच जो तुम्हाला आठवतो तो भैरूचा प्रसिद्ध आणि तुमच बालमन व्यापून राहिलेला नांगर त्यांच्या फार्म चा ट्रेड मार्क म्हणून तिथं कायमचा दिमाखात विराजमान झालेला दिसेल. दोन पैकी तुम्हाला आवडेल तो भैरू तुम्ही आपला मानून घ्या. मी निघतो प्रभात फेरीस। दिवस आनंदी जावो। 

सलील जोशी।

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

*अभ्रक!*
याला मायका म्हणतात.इस्त्री बिघडली कि कुणी बघितलं असेल कॉईल बदलताना तर मायका दिसला असेल.दोन मायका च्या लेअर मधून कॉईल गेलेली असते.ती कॉईल हिट होते ज्याने इस्त्री गरम होते.इथं मायका इन्सुलेटर म्हणून काम करतो.
या गोष्टीची माझी ओळख झाली ती बाबांच्या गणपती च्या कारखान्यात. तिथं मूर्तीस चकाकी देण्या करता याचा उपयोग करतात.हा मायका खनिज पदार्थ आहे.याचे तुकडे भूगर्भात मिळतात.पारदर्शक असतात.ते आम्ही धुवून भिजत ठेवत असू.मग मऊ झाले कि भाताच्या तुसात एका फडक्यात घालून पाणी लावत घासत बसलं कि पाण्यात या मायकाची वस्त्र गाळ पावडर उतरते.हे द्रावण मग थोडं गम घालून तयार मूर्तीवर स्प्रे केलं कि मूर्तीला नैसर्गिक चमक येते.पण अति कौशल्याने आणि योग्य प्रमाणात झालं पाह्यजे. गणपती जरा घाम आल्या सारखाही वाटतो मग.आणि चमक अतिशय सुंदर दिसते.तयार पूड मध्ये हे साधत नाही.
आज मुद्दाम हा विषय लिहायच कारण एक माहितीपट.जो एका विदेशी महिलेने तयार केला होता.तिला मायका सौंदर्य प्रसाधनात सर्रास वापरला जातो हे कळलं.ज्या मूळ चकाकी येते जिथं लावला जातो त्या भागावर.सोबत हे हि कळलं कि याची आयत मुख्यत्वेकरून भारतातून होते.आणि या कामात लहान मुलांना कामगार म्हणून वापरलं जातं.मग ती इकडं आली. बिहार झारखंडमध्ये याच्या खाणी आहेत हे कळलं.मग थेट तिथं गेली.चित्रफीत बघितली मी.
तिथं गरीबी खूप आहे.त्या मूळ या खाणीत काम करतात त्या 4/5 ते 14/15वर्ष्याच्या मुली आणि काही मुलं हि. गावाबाहेर किंवा कुणाच्या घर वा गोठ्या खाली खूप घुशी ची बीळ होतात तेंव्हा आदिवासी लोक बोलावून त्यांना त्या घुशीना हुसकवण्याचं काम दिलं जात.ते धूर करून घुशी बाहेर काढून मारतात आणि खायला नेतात.तर ती बीळ असतात तश्या त्या खाणी वाटल्या.त्या चिमुकल्या मुली जमीन खणत खड्डा करत जातात भूगर्भात.आत मायका मिळेल तस खणत भुयार तयार होत. आतली माती घमेल्यात भरून बाहेर आणतात.तिथं ती चाळणी वर टाकून मायका वेगळा केला जातो.आत कुठंही आधार केला जात नाही माती ढसू नये म्हणून.अपघात होत असतात.मुली मातीत गाडल्या जातात.खाणी पासून जवळ विट भट्टी आहे तिथं त्यांचे आई बाप काम करत असतात.तेच येऊन मग अश्या वेळी त्यांना आतून काढतात.एकिला विचारलं हे नको वाटत का?यावर ती छोटी म्हणली,मग खाऊ कसं?
आता तिथं त्यांच्यातली एक छोटी मुलगी त्यांना अक्षर शिकवते.एक स्वयंसेवी संस्था काम करतेय तिथं.पण त्या पोरींचे बालपण अश्या धोकादायक मजुरीतच सुरू होतय. आणि हा असा मिळवलेला मायका मग मोठं मोठ्या सौंदर्य पसाधन तयार करणाऱ्या कंपन्या विकत घेतात.आता विदेशात या बाबत जागरूकता तयार होत्येय.काही कंपनीच्या धोरणात बदल होऊन त्या कंपनी आता या नैसर्गिक मायका ऐवजी सिंथेटिक मायका वापरू लागल्यात या बाल मजुरी मूळ.
सहज कळलं पण बघून मन उदास झालं.मागे ब्लड डायमंड बघून असच वाटलं.कुणी महागडा हिरा फुकट दिला तरी नको वाटलं तिथं हिऱ्या च्या खाणीतले अत्याचार बघून.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

पितरास एक पत्र.

माननीय पितर गण,
विनंती न लिहिण्यास कारण कि,

पत्रिकेत पितृदोष आहे.शांती करून घ्या.
अस वारंवार ऐकतो.आपले म्हणे मृत पूर्वज आपल्याला त्रास देत असतात.अकाली निधन,अविवाहित असता निधन,कुणी कर्ज न फेडता गेला, कुणी चोरी केली,कुणी कुणास मारहाण केली,फसवणूक केली असेल,कुणी कसली इच्छा पूर्ण न होता गेला,कुणाचा आपल्यावर राग असतो पण बोलून दाखवली नसत आपल्या पूर्वजांनी तर तो दोष म्हणे आपल्यास लागतो.
एक तर आमचे तुम्ही पारंपरिक घरातले लोक. मग आपल्याच खानदानात जन्माला आलेल्या जातकास कसला त्रास देता?तुम्हाला काही आपुलकीची वग्रे भावना दाटून येत कशी नाही.तुमच्या जीवनात काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत किंवा तुम्हास करता आल्या नाहीत यात आम्हा नवजात लोक्स चा काय दोष? मी तर म्हणतो हे अस अपेक्षा भंग तुम्ही अनुभवलेत मग उलटपक्षी आम्हाला आमच्या अपेक्षा पूर्ण करायला मदत करा न.हे कसं बॉ चिवित्र वागणं तुमच.आमचं भल नाही न झालं म खानदानात कुणाच भल होऊ देणार नाही हि आपल्याच लोकांशी कसली दुष्मनी करता राव? त्या पेक्ष्या आपल्या खानदानाचे कुणी दुष्मन असतील त्यांना जाऊन छळा न!किंवा तुम्हाला ज्याने त्रास दिला त्यालाच पकडून धडा शिकवा.बरं आम्ही आमच्या परीने तुम्ही गेल्यावर श्राद्ध कर्म केलं न परवडत नसलं तरी?म आमची चूक कसली आली?आम्हाला का उगा छळतायत.त्या पेक्ष्या कुणी निर्धन असेल त्याला संपत्ती मिळवून द्या.निपुत्रिक असेल त्याला पुत्र किंवा कन्या रत्न प्रदान करा.कुणी अविवाहित असेल त्याच्या करता ग्यारेंटेड योग्य स्थळ जमवून द्या.मग बघा तुमची पुढली पिढी कशी सुखात नांदते आणि तुम्हास पूजितें का नाही ते.बाबांनो इहलोकी सर्व भोग बघूनही तुम्हास या लोकीची ओढ का अजून? बक अप भिडू.पुढच्या प्रवासास लागा. त्या करता आम्ही काही करावं याची वाट का बघता?मग तुम्हास या जन्मी जिवंत असताना काही करणं जमलं नाही तेच त्या जन्मात किंवा अवस्थेत टिकून आहे.म तुमचा नाकर्तेपणा कि आमचा?आमच्या जीवनात काही भली भर घालू शकत नसाल तर चैला अडचणी तरी निर्माण करू नका.या तुमच्या वागण्यान मला आता एक प्रश्न उगा कारण नसताना पडून राह्यलाय.तो असा,
तुमची भडास काढायला आम्ही तुम्हाला आयते सापडलो.पण तुम्ही आमची गोची करून ठेवलीय याची कल्पना आहे का तुम्हाला?
कशी? आता ते हि ईस्कटून सांगतो. मी पण मनात म्हटलं कि, आम्हास जरा पितृ दोष लागलाय तसा मी पण कुणाला लावून देईन.पण चैला आहे कोण ? कोणाला देऊ हा तुमचा वसा?उतत नाही मातत नाही पण तुम्ही दिला वसा घ्यायला कुणी उरलाच नाही!!!!
तेंव्हा एक रिक्वेस्ट तुम्हास.मी काय म्हटलं ते विचारात घ्या आणि शहाण्या सारखे वागा बघू.
मग पितृपक्षात तुम्हाला सजवलेली थाळी प्रेमान ठेवता बघा.
समस्त पितृ देवो भ्यो नमः🙏🏻🌹

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

आठवणीतली गाणी.

या शांत वेळेस सांजवत असताना अचानक काही आठवणीतली गाणी मनात वाजू लागतात.त्यातलं अमर प्रेम मधलं रैना बीती जाये, आठवलं.
मलमली तारुण्य आठवलं.
लगेच सलामे इश्क मेरी जां आठवलं.
साला म्हटलं अस का झालं?तर प्रसंग आणि तो जिथं घडतोय ती जागा आणि पात्रांची मनोवस्था एकच आहे.त्याचा परिणाम देखील एकच आहे.हे लक्षात आलं कधी तुमच्या ?
प्रत्येक गाण्यात स्वतः ची खासियत आणि ओळख आहे.
रैना बीती जाये मध्ये राजेश खन्ना बायको असून नसल्या सारखा आहे.मलमली तारुण्य मध्ये अरुण सरनाईक तश्याच अवस्थेत.आणि सिकंदर देखील त्याच पठडीत मोडतोय.
हे नायक एकटेपणा बोचत असलेले आहेत.अश्या वेळी त्यांना कुणी टांगेवाला,ओम प्रकाश आणि प्यारेलाल गम गलत करने कोठीवर गाणं ऐकायला घेऊन आलाय.नायकच दुःख विसरून जावं म्हणून.
त्यात राजेश खन्ना नुसते सूर ऐकून वर खेचून आणल्या सारखा आलाय.आप रुक क्यो गयी गाइये न म्हणत गाणं रसिकतेने ऐकतो.नशेत असला तरी जाताना गायिकेच नाव विचारतोय.तिनं पुष्पा नाव आहे म्हटल्यावर त्याच्या तोंडून पटकन जात,मीरा होना चाहीये.इथं त्याचा वैचारिक दर्जा समजतो.अय्याशी करायला आलेला सामान्य ग्राहक नसून हि काही और चीज आहे हे त्या नायिकेला जाणवत.प्यारेलाल आणि सिकंदर जायला निघतात न जोहरा प्यारेलाल ला थांबवून विचारते,कोन है ये साहब?
हमारे दोस्त है नाम सिकंदर है.यावर जोहराची अफलातून कमेन्ट,यहा लोग चोट खा कर आते है.ये पेहले शख्स है जो चोट दे कर जा रहे है.अब इस कोठे के दरवाजे खुलेंगे तो सिर्फ इनके लिये.प्यारेलाल चाट पडतो.सिकंदर ला म्हणतो,अमा हम तो तुम्हे समुंदर मे डुबाने लाये थे तुम तो समुंदर पी कर निकले.
सिकंदर म्हणतो,वो ऐसा है.हम अपने गम मे इतने डूबे है के हम पर हमदर्दी कि नजर डालनेवाला खुद हमारे गम मे डूब जाता है.
आणि एक गाणं ज्यात संगीत विषय आहे.
प्रेम नगर च गाणं. हेमा मालिनी श्रीमंती महालात आहे.तिथं सर्वत्र श्रीमंती तर झळकते आहेच पण संगीत शोभेच्या वस्तू म्हणून मांडून ठेवलेल्या आहेत अस तिला जाणवतंय.मग,
ये कैसा सूर मंदिर है
जीसमे संगीत नही
गीत लिखे दिवारो पे
गाने कि रीत नही
अशी तिखट टीका श्रीमंती हुच्चभ्रु महालात करतेय.आम्ही उच्च अभिरुची राखून आहोत याच फक्त प्रदर्शन पण समज कसलीच नाही राहणार्यांना.
हाच धागा त्या वरच्या गाण्यात आहे.तिथं हि गाणं बजावणेच चालत पण रसिक मात्र भाग्यानेच एखादा येतो आणि जिंकून जातो गाणाऱ्याचे मन.
थोर लोक होती ज्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि आपल्या पर्यंत पोहोचवलं.
कितीही वर्ष ऐकल तरी मन तृप्त होत नाही आणि तरीही ती गाणी ऐकली कि तृप्ती जाणवते.

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

दिवाळी

आज संध्याकाळी एक स्टुडंन्ट चा फोन आला,सर मी येतोय सहकुटुंब भेटायला.मग दूध आणायला खाली उतरलो.पोर खेळत होती.सर्वांनी दारात रांगोळ्या काढलेल्या ,रोषणाई केलेली बघून मस्त वाटलं.समोरून मुलं सुसाट सायकली फिरवत येत होती त्यांना चुकवत पुढं जाऊ लागलो.अचानक मागून हाक आली, ए काका तू हे चॉकलेट घे हं!चैला कोण हाक मारतय म्हणून बघितलं वळून.एक सायकल थांबवून उभी राहिलेली मुलगी हातात चॉकलेट घेऊन उभी होती.
कुणाला म्हणलीस?
अरे तुला तुलाच.
अग नको मला तूच खा ते.विचारल्स त्या बद्दल थांक्यू.
नाही  नाही तू घे हे.
बाळा खरच नकोय मला तू खा.उलट तुला कुठलं चॉकलेट हवंय सांग मी घेऊन येतो.
नाही हे तू घे आणि खाऊन टाक. ये न.
चैला मी त्या पोरीला ओळ्खतही नाही.ब्लॉक 60/65आहेत त्यात प्रत्येकाशी ओळख नाहीये आणि काही भाडेकरू हि येत जात असतात.मग ती अनोळखी मुलगी कोण होती आणि नेमकं मलाच हाक मारून चॉकलेट का दिलन? कळलं नाही.
पण मग खूप छान वाटलं.सरळ तिचं म्हणणं शहाण्या मुलासारखं ऐकल आणि चॉकलेट घेतलं.
दिवाळीची सर्वात बेस्ट भेट मिळाली नशिबाने.लहान लेकरांना स्वार्थाचं वग्रे वार शिवलेलं हि नसत.त्या मूळ एक जुनी आठवण जागी झाली.
फारा वर्ष्या पूर्वी मी मुंबईत जात होतो ट्रेन न.समोर एक कुटुंब बसल होत.आई,बाबा आणि एक छोटं बाळ.शेवटच्या सीट वर एक दाढीधारी साधू बसला होता.मी पुस्तक वाचत होतो.अचानक त्या मुलाने पुस्तकाला हात लावला.मी बघितलं आणि तो गालात खुदकन हसला.मग त्याने तस आणि दोन चार वेळा केलन.त्याची आई म्हणली,अगो बाई कसा हसतोय बघा जस ओळखच कुणी आहे.त्यावर तो साधू म्हणला,बेटा तू खूष हो ले आज.ये मासुम बच्चा 'तेरी तरफ देख के जो हसा वो सबके नसीब मे नही होता.समझले भगवान ने हस दिया हो 'तेरी तरफ देख के.
आज तो साधू परत आठवला.
हॅप्पी दिवाळी झाली आमची.दुसरं गिफ्ट तो स्टुडंन्ट सह परिवार आला भेटायला आठवणीने.
दिवाळी साजरी व्हायला अजून काय हवं?

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

अलीकड गाण्याच सादरीकरण

वा👌🏻जुन रेकॉर्डिंग, रंजना पेठे यानी गायलेलं मी मज हरपून बसले ग,व्हाट्सप वर आलं ते बघितलं.
मस्त वाटलं.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.किती सुंदर कार्यक्रम कृष्ण धवल दूरचित्रवाणी वर सादर होत.
मग ती रंगीत झाली.मग zee वग्रे आलं आणि ते शो झाले.
हे सादरीकरण कसं आहे नीट बघा.त्या गाण्यापेक्षा, संगीत कार, कवी,वादक याहून मी किती हुच्च गाते याचा तोरा नाही.हावभाव गाण्यातील शब्दाचे भाव आकलन होऊन होत असत.त्यात कृत्रिम रित्या घातलेला उथळ भडकपणा नसे.आजही दिदी गायला उभ्या राहिल्या तर मनोभावे आरतीला च उभ्या आहेत अस वाटत.आशा ताई अवखळपणा करतील पण तो हि सुसंस्कृतपणा न सोडता.साडी कॅरी करणं या लोकांकडून शिकाव हल्ली च्या गायिकांनी.गाणं सर्वार्थाने नीट समजलं तर ती गान पूजा असते.ती सादर करताना सारख नाचाव लागत नाही.मूळ गायक गायिके पेक्षा अलीकडं नवे गायक
ते गाणं कित्ती अवघड आहे न मी कसं ते पेलतोय बघा,असलं प्रदर्शन करतायत अस वाटत.त्याही पुढं जाऊन काही जण किंवा जणी असे अविर्भाव करत असतात कि म्हणायला लाज वाटते पण ते विचित्र म्हणजे कसं सांगू?इतकंच म्हणीन कि,सेक्सी वाटतात.
एव्हढं होऊन वर वेगवेगळ्या अँगल मध्ये शूट,भडक कपडे,मागे सेट तसाच झगमगीत. बाकी सर्व तांत्रिक गोष्टी तर अति आधुनिक असतात.तरीही ते समाधान मिळत नाही.मग परत दिदी च किंवा किशोर दा च मूळ गाणं ऐकावं लागत तेंव्हा बरं वाटत.दिदीच्या साड्या भारी असतील.कानात घातलेली हिऱ्याची कुडी स्वतः तिचं गाणं ऐकून चमकत असतात अस वाटत.आणि डोक्यावरून घेतलेला पदर अशी ती उभी असते.पण ए मेरे वतन के लोगो ते गझल,प्रेमगीत त्यातील भावनेसह मनात उतरवते. रंजना पेठे नी गायलेलं हे गाणं हि तसच सादर केलंय.
अलीकडं खूप स्वकेंद्रित असत.
आता अकारण दिदीला ट्रोल केलं जातंय त्या कुणा नवीन गायिके वरून.दीदी म्हणली ते खरं नाही का?
आवाज सुंदर असला तरी कुणाची नक्कल करू नका.ती जास्त टिकत नाही हे सत्य आहे.यात त्या गैर काय म्हणाल्या?त्यांनी सर्वांनी जे करून ठेवलंय त्याला आजही तोड नाही.शंकर महादेवन, हरिहरन,कविता कृष्ण मूर्ती,अलका ते श्रेया घोषाल आपला ठसा जसा उमटवून आहेत तस काम करा कि. आम्ही कवतुक नक्कीच करू.
पण या मोठ्या लोकांना वादात ओढून स्वतः ची सवंग प्रसिद्धी करून उखळ पांढरे करणारे जास्त झालेत.बाय हुक ऑर क्रूक मी हिट होणारच.
व्हा बापडे.आमच आम्ही ठरवूच कुणाला ऐकायचं ते.
संगीत आपल्याला शिकावे लागत ते आपल्याला शिकत नाही.ते पर्वत शिखर मान खाली घालूनच चढाव लागत अन्यथा कोसळून पडायची शक्यता जास्त.
त्या पोस्ट मूळ इतकं मनात आलं.
सर्व गुणी कलाकारांस 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

शेतातल भूत

*एक मजेशीर आठवण*
हेच गणपतीचे दिवस होते. बाबा पोयनाडला आले होते.घरचा उत्सव होताच.पण आज त्यांच्या शाळेच्या एका गुरुजींकडे गणपती निमित्त भजन होत.बाळ तू तबला वाजवायला हवासच हो,असा आग्रही निरोप भगवान मास्तरांचा आला होता.जेवण लवकर उरकून बाबांनी आमच्या धोंडू ला हाक मारली.
धोंड्या छकडी जोड.निघायचाय.खाऊन घेतलंस न?
हा जी .पन कूट निघताय बाळ भाऊ रातीच?
अरे भगवान मास्तर नी बोलावलंय.भजन आहे त्यांच्याकडे.आणि त्यांचा हुकूम मी टाळू शकेन का?
ते हायच. म अस करू,भजन सपल का जरा गप्पा टाकत बसा किंवा निवांत डुलकी काढा म तांबडं फुटल कि निगु.
ते आणि का?उद्या अण्णा शेतावर काही जायचे नाहीत अन तुलाही धाडायचे नाहीत.गणपती नाहीये का घरात.
पन तरी लगोलग निघायचं नाही.यिऊ कि 8वाजेपर्यंत आरतीला घरी.
तुला झालंय काय धोंड्या?का हुज्जत घालतोय?अस कधी वागत नाहीस तू.तब्येत नाही का बरी?तस असेल तर फक्त छकडी जोडून ठेव मी नेईन स्वतः.तू कर आराम.
ह्या,अस कुठं झालं का कदी?
आवरा तुमी मी जोडतो गाडी.तुमचा गालिचा द्या जरा. खाली अजून पेंढा टाकून त्या वर घालतो.
अरे बाबा बैलगाडी नाही न नेत आपण,छकडीत कशाला हवा गालिचा न पेंढा.आताच तर सजवून घेतलीत न?
हा पन,,, बरं चला म.
अस करत दोघे निघाले.
बाळ तू ती मुमै हून आणलेली बॅटरी घेतलीस न.कंदील हाय पण तिचा उजेड लख्ख पडतोय.कूट किडुक मिडुक असलं त दिसत.
हा पाणीही घेतलंय सूट तू आता.घोड्याला वैरण घेऊ नको मास्तरांकडे असेलच.
हा ते ठाव हाय.
शेवट छकडा मार्गी लागला.तिनविरा धरण आलं.लख्ख चांदण्यात त्यातलं पाणी मस्त चमकत होत. गार वारा हि सुटला होता.पावसाची अजिबात चिन्ह नव्हती.तरी धोंड्या अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं.न राहवून बाबांनी त्याला विचारलंच,
धोंड्या,गप्प का रे?
भक्कन विडीचा धूर सोडतच तो म्हणला,तस काई नाही.
अरे मला सांगतोस का हे?आज ओळखतो का तुला?
बाळ भाऊ मंग सांगतो तुमाला.
नको आत्ताच बोल.का हुक्की आलीय घसा ओला करायची.धोंड्या शपथ आहे तुला हं,उत्सव सुरुय अजून तो वर घ्यायची नाही म्हणला होतास लक्ष्यात आहे न?
त.अस पाप हुईल का हातन.
अरे म बोल कि?
आता काय सांगू?हल्ली हिकडं पोर बी यायला घाबरतात.अचानक कुठल्या शेतात म्हण मोठी आकृती हुबी रहाते.ह्ये धा फूट हाय म्हण.म्हून म्हणत हुतो तांबडं फुटल का निगु.
धोंड्या तू घाबरावस या भाकड कथेला?
मी नाय ओ पण आज तुमी हायत संगती म्हून काळजी वाटते.
काही खरं नसत ते.रहा बिनघोर.त्यात गणपती आहेत म्हटल्यावर काय भितो तू.
हं ss म्हणत धोंड्याने एक मोठा झुरका घेऊन विडीचा धूर छाताडभर भरून घेतला.
बघता बघता मास्तरांचं घर आलं.गर्दी दिसत होती आणि वाद्य जुळवा जुळवी चे परिचित आवाज कानी पडले.छकडी चा आवाज ऐकून मास्तर धोतराचा सोगा हाती घेऊन वेस्कटित उभे राह्यले.
वा बाळ आलास का?ओळख ठेऊन आहेस बरं वाटत हो.म्हटलं मुंबईकर येतायत का नाही?
मास्तर तुम्ही हाक द्यावी न मी येऊ नये अस होईल का कधी.
बाबा मास्तरांच्या तिथंच अंगणात पाया पडले.पाठीवर प्रेमान हात मारत मास्तर पुटपुटले,शतायुषी भव.
ये हात पाय धुवून घे.तिथं खुंटीवत पंचा ठेवलाय तो घे हात पुसायला.झोपाळ्यावर पानाचे तबक हि आहे.तिथं विसाव जरा .मी आत जाऊन चहा सांगतो.कि आधी फराळाच काही आणू?
नको मास्तर फक्त चहा.
बार बार,आणि ए, ह्या आपल्या धोंड्या न तू?गाडी तिकडं आंब्या खाली सोड.चाकाला च घोड बांध.माग बेड्यात वैरण वग्रे लागली तर आहे.आड बाजूस घोड नको बांधू जनजनावर निघत.
जी म्हणून धोंड्या गेला.
बाबांनी हातपाय धुवून झोपाळ्यावर बैठक जमविली. चहा घेऊन विडा हि झाला जमवून मनासारखा.आत मंडळी वाट बघतच होती.
या या बाळ भाऊ.आता झक्क गवळण तर हुन द्याच पण चार नाट्य संगीत देखील ऐकवा बा. मग तबला हि बघा कसा पुडा झालाय.जमलाय का नाही सांगा.खास तुमच्याकर्ता सजवून घेतलीय जोडी.पेण हून आजच आणलीय.पेटी सुद्धा ट्यूनिंग करून आणून ठेवलीय लालबाग वरून.
झालं मग आधी बाबांनी पेटी हाती घेतली.मग तबला.शेवट बाळ भाऊ गवळण न नाट्यगीत हवंच तुमच्याकडून अशी फर्माईश आली. मग जवळची हत्यार सोडून बाबा गायला बसले.
आतून आवाज आला बाईंचा,
अरे त्याला किती दमवाल ,आधी चहा घे रे बाळ तू मग बसा गायला.सर्वांनी मध्यंतर घ्या हो जरा.
असा तो कार्यक्रम रंगत गेला.उत्तर रात्री सगळे निघाले.मास्तर म्हणू लागले,बाळ आज राहिनास हितच.दुपारी जेव न मग जरा आराम ,चहा घेऊन निघ.
थांबलो असतो मास्तर पण घरी गणपती आहे न.जाऊन जरा झोप काढीन. उद्या आमच्याकडे भजन आहे न.
हो हो ते हि आहे म्हणा.पण सावकाश जा रे.ए धोंड्या नीट हणायची छकडी उगा पळवू नको.
नाय जी.हाय मी तुमी बिनघोर र्हावा.
मग परत मास्तरांना नमस्कार करून बाबा छकडीत बसले.धोंड्या च्या इशर्तीवर कृष्णा दौडू लागली.
चांदण्यात डवरलेली शेत झुलत होती.मघाच्या भजनातले टाळाचे, पायपेटीचे सूर कानात अजून घुमत असताना त्यात रात किडे आपला सूर मिसळत होते आणि कृष्णा च्या टापा ताल धरून होत्या.
बाळ भाऊ चला हो मी लागतो हिकडं घरच्या वाटेला तुम्ही सांभाळून जावा
म्हणत भजनातला एकजण त्याच्या गावात शिरला सायकल घेऊन.आता रस्त्यावर फक्त आमची छकडी होती.
हा बोल रे आता काय सांगणार होतास?
राहू दे आता घरी जाऊ न झोपू.
अरे सांगतो का आता?
मग धोंड्या सांगू लागला.
मघा म्हणलो ते या परिसरातच दिसत.
हं बघू आपल्याला भेटायला येत का?
लांबवर तिनविरा दिसत होतं.
इतक्यात एका शेतात काही पांढुरक दिसू लागलं.धोंड्याच्या हातातील रेन खेचली गेली.घोडी हि न खिंकाळता जागी उभी राहिली.
हळूहळू काढ रे थांबू नको.
बाळ शेट पन,,
तू चल म्हणलो न
म्हणत बाबांनी धोंड्याला गाडी हाकायला लावली.ते शेत जवळ येऊ लागलं तशी ती आकृती उंच होऊ लागली.जवळ आल्यावर बाबा अचानक म्हणले,धोंड्या थांबव गाडी.
धोंड्याने आज्ञा पाळली.
गाडी थांबली तशी ती आकृती स्पष्ट दिसू लागली.एखादया कडक्या माणसाने पांढरा सदरा घातलाय न तो उभा आहे अस वाटलं.आणि बघता बघता त्या आकृती च डोकं वर वर जाऊ लागलं.त्यावर मुंडास होत ते आता दिसू लागलं. ते मुंडास चांगलं दहा फूट वर जाऊन थांबल.
बघा म्हंटल नव्हतं
धोंड्या म्हणला.
बाबांनी जवळ ठेवलेली बॅटरी काढून तिचा झोत त्या आकृतीवर टाकला.तशी मुंडाश्यात काठी दिसू लागली. ती दिसताच बाबांनी खाली उडी मारली आणि शेताकडे धावले.
कोण आहे रे तो?ये पुढं हिंमत असेल तर.म्हणत बांधावर पोचले सुद्धा.इकडं धोंड्या हि त्याची काठी घेऊन धावत आला रेन काठाला बांधून.
बॅटरीच्या झोतात एकजण न्हाऊन निघत होता.कोण रे तू?
ओ मी हाय बाळ भाऊ वळखल का?
पुढं ये.
तशी तो माणूस पुढं आला.तो भाल्या धनगर होता.देशावरून कोकणात यायचा दर साली.
काय रे हे?अस भिवतोस होय आमच्या लोकांना?
सांगतो शेट समद तुमाला.या कि हिकडं बसा घोंगडी वर.
आयल्या भाल्या तू?
आता धोंड्या हि आला.
बोल आता.
अहो मी दरसाली येतो का नाय मेंढर घेऊन तसा या साली बी अलतो.मेंढर बसवून राखतो रातीची.या साली जरा थांबलो घरला जायच तब्येत बिघडली म्हणून.म माझी गाय चरायला घेऊन रातीच हिंडत असतो.पण गावातली टारगट कुठं कुठं भेटतात पियाला बसलेली न मला तरास देतात.म हि शक्कल लढवली.तेंव्हा पासून कुणी फिरकत न्हाईत उशिराच.
बाबा जोरात हसू लागले.
पण करतोस काय अस?इतकं उंच जातंय तुझं मुंडास ते?
काय इशेस नाय बगा.हे खाली बुजगावन हाय का?त्याला पांढरा शर्ट अडकीवला.त्या शर्टाच्या मानेतून काठी काढली. त्या काठीव मुंडास ठिवल.कुणी येत आस वाटलं त आधी बुजगावन हलवतो.तरी त्यो पुढं येत राह्यला त काठी खाली बसून उच करतो.म जातंय मुंडास वर न माणसं घाबरून पळत्यात.
पर उपकार करा देवा ह्ये कुणाला सांगू नका.
बरा आहेस कि रे भामटा.चल निघतो आम्ही.
हा पर तुमी न्हाई घाबरलासा म्हणून तुमाला कळलं.पर बोलू नका कुणाला.
बाबा हसत शेतातून बाहेर आले,धोंड्या हि गालात हसत होता आणि त्याच्या छातीतून कफ वाजत होता.