मंगळवार, २ एप्रिल, २०१९

बोलो जिंदाबाद पावधर शिखरो कि उंचाईपर
हिम्मत करके कब्जा करलो सागर कि गेहराई पर
अपनी आखोमे झाको तुम
नमी नही चिंगारी है
चिंगारी पर राख नही
लपटो कि तैय्यारी है
चलो हवा दो इस चिंगारी को 
शोलो मे ढाल दो
जहा चुनोती का बादल है
 शोला एक उछाल दो
देख रही है दुनिया तुममे
उजियाले विश्वास को
एक एक दिन दिव्य बनाकर
तोफा दो इतिहास को
नई रोशनी कि तेहरीरे
लिख डालो आकाश मे
उठो बांधलो सारा सूरज
अपने बाहु पाश मे
जोशीला अंदाज तुम्हारा
रग रग मे तुफान है
थाम तिरंगा करो घोषणा
हिंदुस्थान गतिमान है
जन गण मन सन्मान हमारा
वंदे मातरम जान है
थाम तिरंगा करो घोषणा
हिंदुस्थान गतिमान है
👍🏻🙏🏻
आज देशाची मनःस्थिती आंदोलीत असताना देशाच्या प्रगतीच द्योतक ठरणारी वंदे भारत ट्रेन सुरू झाली.माननीय पंतप्रधानानी तिला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं.
एकीकडे कालचा दुःखद प्रसंग ज्याने दुःख,चीड,आक्रोश अशी संमिश्र भावना असताना या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानानी अतिशय समयोचित भाषण केलंच,पण ट्रेन सुरू होऊन निघाली तेंव्हा ज्या कुणी सुसंवादक बाई अत्यंत सुंदर, स्पष्ट आवाज आणि शब्दोच्चार करत माहिती देत होत्या त्यांनी हि अत्यंत समर्पक अशी कविता हि वाचली.ती ऐकताना इतकी आवडली कि शेअर करावीशी वाटली.जे शाहिद झाले त्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आणि दुसरीकडे देशाच्या प्रगतीच एक आणि पाऊल पुढं पडलं त्याचा अभिमान म्हणून.
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

सांजवात

हं,भुत्या आठवला.कंदील आठवले. त्या वेळी सांजवात हा शब्द खरोखर जगावा लागे.
कंदील,भुत्ये आणि कुणी मुंबईकराने आणलेला लाफ हि असे.तो जरा ऐटीत उभा असायचा.मग ओगले चीच काच उत्तम असा सूर असे.कंदील प्रभात चा. कंदिलाची ती आडवी वात आमचे तात्या नेमकी सुबक कापून घेत.कारण ती नीट कापली गेली नाही तर काजळी धरे काचेवर. परसात जाताना पावसाळी किंवा हिवाळी गवतावर काच लागली तर पाण्याने कच्च कन फुटे.भुत्या बिचारा साधा माणूस.कुठल्या तरी 100ml च्या बाटली च्या बुचाला भोक पाहून मिळाली तर नाडी नाहीतर कपड्याची चिंधी वळून वात केली जायची.मात्र तो राकेल जास्त पिणारा गडी.कंदीला ची वात हवी तशी सरती करून उजेड कमी जास्त करता येई.
काही बॉक्स मधले दिवे ही रुबाबात असत.नाजूक पितळी सांगाडा आणि मेणबत्ती लावायला जागा असे.
या सर्व दिपकांची संध्याकाळी सेवा नीट करावी लागे म्हणजे ते काळोख पडल्यावर नीट काम देत.ते हाताळणारा माणूसही अनुभवी लागे. नाहीतर स्वतः भोवती काजळी करून रुसून बसत.
काही लोकांकडे मग ऍडव्हान्स गॅजेट म्हणून पेट्रोमॅक्स असत.ती विदेशी ललना.तिची और च तर्हा. वात नसे तिला. मेंटल यायच.ते नवं बसवण्यात वाकबगार व्हावं लागे नाहीतर इतकं नाजूक कि लागलीच तुटायच.थंडीत तिचा हिटर म्हणून फायदा होई.पण मे महिन्यात ती नको वाटे.आणि रुपगर्विता असल्याने तिचा आवाज ही सुरू असे सारखा.
आमच्या नाटकाच्या थेटरात तब्बल पाच सहा पेट्रोमॅक्स वर नाटक होई.तिला हवा भरायला नाटक सुरू असताना माणूस स्टेज वर जाऊन पंप करीत असे. बाबांनी जर्मनीच्या पेट्रोमॅक्स आणल्या होत्या.त्यांची टाकी वर होती.ते बघायला लोक।मुद्दाम येत.
मात्र तरीही माजघरातल्या देव्हाऱ्यात जी समयी मंद प्रकाशीत असे तिला तोड नाही आजही.त्या तिच्या शुभ्र कळ्या अंधारात धीर देत.आणि देव्हाऱ्यातले देव त्या प्रकाशात सौम्यपणे उजळलेले दिसत.
चैला सुरेश भट ही मस्त रोमँटिक लिहून गेलेत न!
सहज कधी तू घरात
लावशील सांजवात
माझे ही मन तिथेच
ज्योती सह थरथरेल,,,,,
आता चकपक जमाना.led कि रोशनी.
ती सांजवात ज्यांनी अनुभवलीय ते भाग्यवान च🙏🏻सांजवात

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

हायजीन .टॉयलेट मधील.

एक वेगळा विषय. म्हणजे माझ्या मनात असतो.कदाचित तुमच्याही मनात आलं असेल पण जाहीर वाच्यता करणं, संकोच वाटतो. लोक काय म्हणतील? लै च शानपन झाडतोय!ई ss, असे रिस्पॉन्स येतील म्हणून.
गोष्ट नित्य वापरातील साबणाची.
साबणाची वडी नीट वापरली गेली तर जास्त टिकते आणि वापरण्यास हि सोयीची रहाते शेवट पर्यंत.पण होत काय ,
वापरून झाला कि साबण नीट त्याच्या पेटीत ठेवला जात नाही. बाहेर पाण्यात असला कि आजूबाजूची जागा निसरडी करतो आणि वडी ची एक परत मऊ होते.अशी वडी हातात घ्यायला घाण वाटते मग.
यावर उपाय,
एकतर साबणाला एकीकडून लावायला काटेरी प्लास्टिक चा तुकडा मिळतो जो एकीकडून काटेरी असतो दुसरीकडून गुळगुळीत.काटेरी बाजू साबणात रोवून तो तुकडा बसवला कि साबण खाली ठेवताना त्या तुकड्याच्या बाजूवर ठेवायचा म्हणजे तो ओला रहात नाही आणि त्या मूळ मऊ पडत नाही.
वापरून झाला कि वडी हातात घेऊन पाणी टाकत फिरवली कि आतला घट्ट लेअर वर येतो. मग साबण, पेटीत ठेवावा म्हणजे मऊ पडणार नाही. एक वर टांगायला उपकरण येत असे त्याला चेन असे.चेन ला चुंबक तुकडा असे शेवटी.साबणा च्या वडीवर लावायला एक लोखंडी तुकडा देत तो वडी वर लावायचा.चेन च्या चुंबकाला मग वडी त्या लोखंडी तुकड्याने चिकटवून ठेवली जाई आणि साबण कोरडा राही.
दुसरीकडे गेल्यावर इन्फेक्शन ची भीती वाटली तर सरळ आंघोळीचे गरम पाणी वडी वर अभिषेक करत ओतत राहून वडी हातात फिरवत रहायची म्हणजे तिचा एक लेअर निघून जाईल.आपल्याला इन्फेक्शन ची भीती कमी होईल.निदान मानसिक समाधान तरी होईल.
निसर्गाच्या मोठ्या हाकेला ओ देऊन आल्यावर वापरायचा साबण वेगळा असला तरी हैजिनिक वाटत नाही तो वापरणे. मग तिथं लिक्विड सोप च असावा.बाहेर तो नसायची शक्यता अधिक.मग आपण पेपर सोपं च पाकीट जवळ बाळगाव.खेडेगाव असेल तर चक्क जुनी पद्धत वापरावी.म्हणजे अंगणात जाऊन मातीवर हात घासून धुवावा.माती सगळी घाण शोषून घेते.
कमोड ला जेट स्प्रे असावाच.पाण्याचं प्रेशर कमी असेल तर हल्ली पंप लावून मिळतात जे फक्त स्प्रे करतो तेंव्हा च काम करतात.
कमोड च्या बाबतीत ही लोकांना हैजिन कळत नाही अस दिसून येत.
कमोड वर एक झाकण असत.अगदी वरच फुल कव्हर नाही तर,कमोड च्या कडेवर तू कड झाकली जाईल अस.त्याच प्रयोजन अस असत कि,
2 नंबर करताना कुणी खाली न बसता सुलभ मधली खडे खडे पद्धत अवलंबतात. त्या मूळ कडेवर थेंब पडतात.त्याची घाण वाटते.म्हणून 2 नंबर करायच झालं तर ते आतील झाकण वर करून मागे सारून बसायचं. फ्लश टॅंक ला आता दोन बटन येतात.एक छोट्या कामाला जे पाणी कमी सोडत.दुसर मोठ्या कामाला ज्या मूळ कम्प्लिट टाकी खाली होऊन फ्लश होत. लोक हे विचारात न घेता कुठलं तरी म्हणजे नेमकं 1 नंबरच बटन दाबून बाहेर पडतात.त्या मूळ कमोड पूर्ण फ्लश होत नाही.मग येणाऱ्याला मात्र घाण वाटते.
कमोड रोज साफ ठेवला तर अगदी चकचकीत राहून तिथं खाद्यपदार्थ खायला ही घाण वाटणार नाही इतकं स्वच्छ राहू शकत.गृहिणींना जसा स्वयंपाक घरात एक्झॉर्स्ट फॅन हवा तसा कमोड च्या ठिकाणी ही मागे खिडकीत बसवला तर व्हेंटिलेशन लगेच होऊन हवा दुर्गंधीत होऊन रहाणार नाही.फॅन च बटन पटकन दिसेल अस असावं म्हणजे वापरणे सोयीचे जाईल.
खरतर न,प्रत्येकाला स्वतंत्र बाथरूम असावं असं मला वाटत.म्हणजे तिथं फक्त साबण ते कमोड आपलं आपण वापरू.पण ते शक्य नाही.मग ही काळजी तरी घ्यावी.
मुळात सरकारला संडास बांधा हे सांगावं लागत.अक्षय कुमार ला त्या वर सिनेमा काढावा वाटतो हे समाजाच्या या बाबतीत अज्ञानाची पावती आहे.
एक जण ओळखीत आहे जो इंडियन टॉयलेट मध्ये उलट बसत असे.काही कारणाने मला हे लक्ष्यात आलं.मी त्याला विचारलं कसा बसतो रे आत?तर,त्यात काय गेलो कि खाली बसतो!म्हटलं अरे,फिरून दरवाज्याकडे तोंड करून बसत जा.
हो !तू मोठा शहाणा बन.तसच असत कशावरून?
नीट बघ बर. पाऊले असणारी विट कशी बसवली आहे?तिचे पाय आहेत न त्या वर तुझे पाय जुळवून बस.आहे न रचना तशीच?
चैला हो रे!हे लक्ष्यातच आलं नव्हतं.मी आपला गेलो कि खाली बसत असे.आता सुधारणा करीन हो नक्की.त्रिच मला दरवाजा लावताना त्रास वाटायचा.
मग हा माणूस कमोड चा जेट ही मागून वापरायचा.ते ही मला सांगावं लागलं.
तर असा हा वेगळा दुर्लक्षित विषय.सहज मनांत आलं म्हणून लिहिलं.नाऊ यू गाईज कॅन से,
ई sssss काहीहीही लिहितो.
असेल तस पण काम कि बात है😆😜

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

मधुराणी

*मधुराणी*
येस,तिच्या सारखी तीच असते.इंग्लड ची राणी ही अस भाग्य अनुभवत नसेल.
     मध माशी च्या राणी बद्दल बोलतोय.
अख्ख्या पोळ्यात किंवा कॉलनी त ती एकटीच राज्य करते.तिच्याकडून आणि तिच्या सेवकांकडून एकत्र रहाणे,सतत कार्यरत असणे आणि कडक शिस्त पालन शिकावे. आणि इदं न मम् म्हणून जे आहे सोडून जायला जराही न कचरणे हा ही विशेष गुण आहे तिचा.
म्हणलो तस ती एकटीच राणी असते.रोज दिड ते दोन हजार अंडी घालते.आधी शरीराचा मागील भाग त्या अष्टकोनी छिद्रात टाकून ते योग्य आहे न याची खात्री करूनच अंडी घालते त्यात.एकही अंड फरटाईल न होणार नसत.तरीही त्यात अनफरटाईल न फरटाईल अशी नाव असतात.एकात माद्या एकात नर.पण माद्या अंड देऊ शकत नाहीत म्हणून अन फरटाईल.बाकी सर्व सेवक.त्यातही वर्गवारी असते.नुकतेच जन्मलेले सेवक पोळ्यातच काम करतात.बाकी बाहेरून मध आणून पोळ्यात जमा करतात.मग ते भोक भरलं कि वरून मेणाचे सील केलं जातं.पोळ्या बाहेरील छिद्रातून ये जा होते तिथं कामकरी माश्या पहारा देत असतात.कुणी अस्वच्छ किंवा शुद्ध मधा शिवाय काही घेऊन आलेली माशी किंवा आगंतुक माशी त्या दरवाज्यावर च मारली जाते.
राणी योग्य वेळ येताच एक गन्ध शरीरातून बाहेर सोडते.त्या मूळ पोळ्यातील आणि बाहेरचे नर आकर्षित होऊन धुंद होतात आणि पोळ्यात येऊ बघतात.त्यांची आपसात लढाई होते.त्यात जो जिंकेल अस बलाढ्य नर च मादी जवळ जाऊ शकतो.त्याच्याशी समागम झाला कि राणी त्याला मारून टाकले.मग आयुष्यभर त्याचे स्पम उदरात बाळगून अंडी घालत असते.पण त्यात ही एक विशेष स्पम ठेऊन देते स्वतः जवळ.
राणी पोळ्याच्या लोकं संख्येवर नजर ठेवून असते.लोक संख्या वाढलीय अस जाणवत तेंव्हा ती
तो जपून ठेवलेला जूस/स्पम न एका छिद्रात अंड घालते.त्यातून नक्की नवी राणी माशी तयार होणार असते.राणी माशी ही सर्व मध माश्या त मोठी असते लांबीला. तर नवी राणी योग्य वयात येऊन कार्यरत होईल अशी झाली रे झाली कि ही आपली जुनी राणी पोळ्यातील अर्ध्या माश्याना घेऊन नवीन कॉलनी किंवा पोळ करायला बाहेर निघून जाते.मग त्या पोळ्यात नव्या राणी माशीच नवं राज्य नवे सेवक आपलं नाव राज्य सुरू करतात.
हा मधुमक्षिका पालन उत्तम जोड धंदा होऊ शकतो.हे शास्त्र इतकं प्रगत झालंय कि जर तुमची राणीमाशी अंडी देईनाशी झाली किंवा मेली तर नवी राणी माशी छोट्या लाकडी किंवा प्लास्टिक च्या डबीत विकत मिळते.त्या पेटीवर झाकण म्हणून साखरेची गोळी चिकटवलेली असते.ही डबी पोळ्यात ठेवली कि इतर माश्या या नवीन राणी ची पारख करू लागतात.पसंत पडली तर ती साखरेची गोळी खाऊन तिला बाहेर काढतात.जर पसंत नसेल तर पारदर्शक भागात तिला बघत तिला चावून मारायला गर्दी करतात.त्यांनी अस केलं तर त्या माशीला काढलं जात न नवीन आणली जाते.या तयार राणी माश्या नैसर्गिक असतात.किंवा इन्स्टंट केलेल्या असतात.पोळ्यात जस छिद्र असत तस आर्टिफिशल तयार करून त्यात राणी माशीला अंड घालायला देतात.हे छिद्र राणी जस निवडते तसच असल्याने ती नेमकी राणी माशी होणार अंडे देते.
सभोवती जी फुल असतील तसा मध तयार होत असतो पोळ्यात.
म्हणून जांभूळ,राई, सूर्यफूल,सावर अशा फुलापासून तयार होणारा मध त्या फुलांच्या नावाने उपलब्द असतो.मधात पाणी,ग्लुकोज,साखर आणि थोडी मिनरल असतात.यातील पाणी काढून स्वतःच्या शरीरातील एक द्रव्य सोडून माश्या निखळ मध पोळ्यात साठवून ठेवतात.त्यानी तयार केलेलं मेण मधाहून जास्त किमतीत विकत जात.त्याचा उपयोग लीप बाम,लिपस्टिक ,हेअर रिमूव्हवर सारख्या सौंदर्य प्रसाधन तयार करायला,फर्निचर वग्रे करता पॉलीश तयार करायला वापरला जातो.तीसेक हजार फुलातून पौड भर मध तयार होतो.
ऑगस्ट आणि एप्रिलच्या आसपास मधाचा सिझन असतो.
मध पेट्या विकत मिळतात.मधमाशी पालन कसं करावं याचे प्रशिक्षण हि मिळत.
महाबळेश्वर मधाच्या बाबतीत नंबर एकवर आहे.कारण आजूबाजूच्या जंगलात विविध फुल आहेत.बाकी रायगड,सातारा इथेही हा जोड धंदा शेतकरी करतात.
तर अशी ही
 *राणी नव्हे मधुराणी*

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

House on the hill



आम्ही गावी राहायला गेलो मुंबई सोडून त्यावेळी.लग्नाचा सिझन सुरू झाला होता.एका मित्राच्या नात्यातील एक लग्न होत कुठंतरी चौल रेवदंडा भागात. नक्की कुठं आठवत नाही.त्या लोकांनी गाड्या ठरवून पाहुणे मंडळी नेली होती तिथे. सल्या तू चल हं,अस मला म्हणला.म्हटलं मी बोअर होईन रे तिथं.तरी त्यानं आग्रहाने नेलन.मग गेलो.अर्थात बोअर झालो आणि बाहेर एकटा एक रिकामी बैल गाडी खाली जू करून होती तिच्यात घोंगडीवर आडवा पडलो होतो.चाहूल लागली कुणी आल्याची म्हणून बघितलं तर एक मुलगी येत होती.स्मार्ट वाटली.हाय,मला होत ते.मी चाट पडलो.बघत राह्यलो.अरे तुला काहीतरी म्हणले न मी म्हणत हसली परत.हा,हल्लो.मग सरळ जवळ येऊन शेक हॅन्ड केलन.नाईस टू मीट यू सलील.चैला भारी तेज नजर आणि बिनधास्त निघाली.तेंव्हा a to z अक्षर असलेलं स्टिकर्स च पान मिळू लागल होत.त्यातली अक्षर काढून माझं नाव मी शर्ट च्या खिशावर लावली होती ते ध्यानात आलं.
सारखा हरवतोस आणि नाव विसरतोस का रे तू? परत खळखळून हसली.गेली न विकेट बावा.अरे लाजू नको रे गंम्मत केली.लाजत नाही पण याचा अर्थ असाही निघू शकतो हे लक्ष्यात आणून दिलेस .
ये बात. जमतील आपल्या गप्पा.
नाव काय तुझं?कुठली तू?म्हणजे पोयनाडला कधी बघितलस वाटत नाही.
ए ss फ्लर्ट नको सुरू करू हं मी एंगेज आहे.
अरे,मी एक बावळट सारख शर्टवर नाव चिकटवून फिरतोय म्हणून तुला आयत माझं नाव समजलं पण तुझं नाव कळलं नाही मग विचारलं तर काय हरकतय?
असू दे डोक्याला त्रास तसाच तुझ्या.नाव समजून काय करणारेस?मी लगेच संध्याकाळी गुल होणारे.आपण पुन्हा भेटणार हि नाही मग फायदा काय?
जशी तुझी मर्जी.
मग आता काय बैलगाडी तच बसून गप्पा टाकणारेस का?
म कुठं जातेस लग्न सोडून?
चैला बोअर झालेय मी आणि कसलं उकडतय मंडपात. चल कुठंतरी जाऊन भटकून येऊ.
कुठं?
अरे तू इथला आहेस तू बोल.तुझ्या घरी जाऊन येऊ चल.
अरे मी पोयनाडला रहातो ते दूर आहे इथून.
किती वेळ लागेल?
अर्धा तास st मिळाल्यावर लागेल आणि इथून st स्टॅण्ड ला जायला वेळ लागेल तो माहीत नाही किती लागेल.
त्याच नको टेन्शन घेऊ गाडी घेऊन आलोत आम्ही.चला निघा परत यायला उशीर होईल.वाटेत गप्पा मारू.
अरे पण इथं कुणाला तरी सांगून येतो नाहीतर शोधत बसतील सल्या कुठं गेला.
सगळे बिझी असतात रे अश्यावेळी तू चल जाऊ आपण.
चैला ओळख न पाळख पण निघालो तिच्या गाडीतून.तीच ड्राईव्ह करत होती.नशीब आई न भाऊ पेणच्या आत्याकडे जाणार होते ते घरी नव्हते फक्त आजी होती न नोकर लोक.
घरी आलो.तिला आवाड दाखवलं.मस्त ठिकाणी रहातोस रे.किती मोकळी जागा आहे.मागे टेकडी दिसतेय.
हो जांभळी ची टेकडी म्हणतात तिला, तिच्या मागही दोन अजून आहेत.
मग चला बघूया जाऊन.
मग गेलो.तिन्ही टेकड्या बघितल्या.इतर गावातील जी माहिती होती ती दिली.आजूबाजूला कोणती गाव आहेत.तुला गर्लफ्रेंड आहे का?इकडं घेऊन येत असशील यावर नकारात्मक उत्तर गेल्यावर,हौ ट्रॅजिक म्हणत फिदी फिदी हसली.
मग इकडं येऊन एकटा काय करतोस?
त्या टेकडीवर उगाच बसतो या टेकडीवर लोक लोटा परेड ला येतात.
ई ss न तू मला इकडं आणलस?
नको काळजी निसर्ग साफ करतो सगळं.
शी घाणेरडा कुठला.
आता आहे ते आहे न.
मग परत घरी आलो.तुझ्या घरी कुणीच नाही?
आहेत संध्याकाळी येतील बाहेर गेलेत.
हं,चल निघू परत.वाटेत काही पोटापाण्याचा स्टॉप येईल का?
चल पोटाचा नाही पाण्याचा म्हणजे सोड्याचा येईल.आणि तो मस्त आहे.
चला तर मग.
जाताना पळी ला थांबलो. सोडा प्यायला.तुझं आवडत ड्रिंक च घेऊ म्हणली म्हणून आईस्क्रीम सोडा घेतला.ती बाटली,बूच पोटात ठेवते याच कोण कौतुक वाटलं तिला.ती भडभड बोलत होती.कॉलेज झालं होतं न लगेच कुठंतरी नोकरी ही करत होती म्हणली.सॉरी हं पण एकाने आधीच गटवलय मला.लवकर लग्न ही होईल.घरून कुरबुर आहेच म्हण कारण जाती चा नाहीये तो.पण मला आवडलाय मग प्रश्न संपला.
म चांगलं आहे.आणि मला सॉरी म्हणायची गरज नाही .
ए हो ss.खरं सांग कुठंतरी बरं वाटलं असेल न मुलगी आपणहून बोलतेय म्हणल्यावर.
हं,खोट बोलता येत नाही मला.बर वाटल म्हणण्या पेक्ष्या विकेट काढलीस माझी.अस कुणी येऊन बोलेल स्वप्नात ही वाटलं नव्हतं.
का नाही होऊ शकत?पुढं ही होईल.आणि तस तुझा ही विचार केला असता बर मी.पण मी तुझ्याहून वयाने मोठी आहे जरा ते चाललं असत का तुला?
हो ते चाललं असत पण तुझं शिक्षण हि जास्तच आहे माझ्याहून.
हट रे,त्यानं काही होत नाही.
मंडप दिसू लागला.गाडी वळणावर थांबून पर्स मधून पॅड काढत म्हणली,पत्ता सांग रे तुझा.
कशाला?घर तर बघून आलीस न?
चमू पत्र लिहायच झालं तर लागतो हं पत्ता.मुकाट दे.
पत्रिका वग्रे टाकायची तसदी घेऊ नकात मला बोअर होतात लग्न गे बघतेच आहेस.
जळल्या चा वास आला का रे?
अजिबात नाही हो.
म दे पत्ता .फक्त एक पत्र तुझी आठवण तीव्रतेने येईल तेंव्हा टाकेन.
तुझं नाव गाव सांगत का नाहीस मग?मला भेटावं किंवा लिहावे वाटलं तर?
नको.का म्हणून विचारू नकोस. पण ओळख नसताना आपल्या ला जुना परिचय असल्या सारख वाटलं न? हेच नात मस्त वाटलं मला.ओळख वाढली कि अपेक्ष्या वाढतात मग सगळं गुंता च होतो.
हे बरंय आमच्याकडे पत्ता घ्या आणि,,
बोलायच काम नाही.वयाने जरातरी मोठी आहे मी तुझ्याहून मोठ्यांचा मान ठेवावा.
घ्या आपलंच खर करून.घे लिहून,,,,
मग पत्ता दिला.लिहून घेतला न गाडी पार्क झाली.चल बाय.परत हात मिळवत म्हणली,फिर नही मिलेंगे पण एक पत्र नक्की तुला.कधी माहीत नाही पण नक्की लिहीन.
आम्ही दोघे गायब झालो होतो हे वऱ्हाडी लोकांना कळलंच नाही.आजही कुणाला माहीत नाही अगदी त्या मित्राला हि ज्याने मला तिथं नेलं होत.
मग एक दिवस एक लिफाफा आला माझ्या नावावर.उत्सुकतेने उघडला.आत एक इंग्रजी कविता होती.


The House on the Hill
BY EDWIN ARLINGTON ROBINSON
They are all gone away,
The House is shut and still,
There is nothing more to say.

Through broken walls and gray
The winds blow bleak and shrill:
They are all gone away.

Nor is there one to-day
To speak them good or ill:
There is nothing more to say.

Why is it then we stray
Around the sunken sill?
They are all gone away,

And our poor fancy-play
For them is wasted skill:
There is nothing more to say.

There is ruin and decay
In the House on the Hill:
They are all gone away,
There is nothing more to say

पाकिटाच्या मागे कुणी पाठवलं त्याचा पत्ता असतो
तिथं बघितलं तर त्या जागीही पत्त्या ऐवजी कविता च होती

        Fly fly letter fly
        Bring back a good reply
         No poem to say to poet to be
           Just two words of love
             And remember me,,,,,

Yes I still remember you विसरणं शक्य आहे का?
पण शोधू कुठं तुला !!!

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

निर्लेप तवा

*निर्लेप तवा*
आज ट्युशन करत असताना भावाचा फोन आला.अरे काही खाऊन येऊ नकोस मी डोसे करतोय.म्हटलं ठिकय.
पण जाताना नेहमीच्या गाडीवर हदडून गेलो.
घरी आलो तर बंधू आत डोसे घालायची सुरुवात करत होते.हात पाय धुवून जरा टेकलो नाही ,तर बंधू हातात कालथा घेऊन आले.
अरे तो तवा जुना झालाय मला वाटत.डोसे सुटतच नाहीयेत.बघ जरा.
जाऊन बघितलं तर निर्लेप तव्याला डोश्याचा लेप घट्ट बसलेला.म्हटलं,तू जरा बाजूला हो मी प्रयत्न करून बघतो.
मग तवा लख्ख धुवून घेतला.डोसे घातले.सगळे व्यवस्थित सुटले.आठ ते दहा घालत होतो डोसे.मग भांडी घासली.कट्टा आवरला.बाहेर आलो तर निजा नीज झालेली.
सांगायचा मुद्दा असा,
       स्वयंपाक हि एक उच्च दर्जाची कला आहे.तीच तंत्र नीट आत्मसात करावं लागतं.घरातील आई,बहीण अश्या कुणी तरी नात्यातील बायका आणि बाहेर हादडताना ते लोक गाडीवर जे करतात त्यांना गुरू करावं.आई वग्रे प्रत्यक्ष शिकवतील.गाडीवाले हि विचारलं तर सांगतील.किंवा नुसतं निरीक्षण करावं बारकाईने.फुकाचा गर्व बाजूस ठेऊन लीन होऊन कुठलीही कला शिकावी लागते.उसमे क्या है? मी ही करेन!अस म्हणता येईल पण त्या करता हि साधना आवश्यक आहे.उगाच तो करतो किंवा ती करते न? म मला न जमायला काय झालं?तर जमेल कि ,पण मान तुकवून आधी मर्म तरी जाणा.
आता बंधूंच काय चुकलं?
तर निर्लेप तवा आहे म्हणजे त्यावर पदार्थ न चिकटता व्यवस्थित सुटतोच,हि एका अर्थी चुकीची समजूत आणि जे करतोय त्यात अहंकार बाजूस ठेऊन शिकण्याची वृत्ती आणि मग सरावाचा अभाव.
कसं? तर निर्लेप तवा कसा वापराल? त्याची निगा कशी ठेवावी हे त्याच्या खोक्यात लिहून दिलेलं असत.निदान ते तरी वाचून ते तंत्र सांभाळावे .
निर्लेप झाला म्हणून तो जास्त गरम करून डोसा फक्त जळणार च.बर वापरून झाला कि त्यावर गरम पाणी आणि साबण घालून हलक्या हाताने धुवून ठेवायचा असतो.त्याला जर तारेचा ब्रश लागला तर चरे पडतात.तिथं खाच तयार होऊन तो निकामी होतो.हे आमचे बंधू जाणत नाहीत.पोळ्या वग्रे करायला ही वापरतील आणि जिथं पदार्थ जळून चिकटला तो भाग नीट साफ करत नाहीत.नेमका तिथं डोसा चिकटून बसतो जळू सारखा.दुसरं गॅस मध्यम आचेवर ठेवावा लागतो.3/4माणस खाणारी असली तर नक्की 2 ते अडीच तास लागतात डोश्याना.
एकीकडे खाली टॉवर फॅन जोरात सुरू.गॅस मोठा ठेऊन डोसे होणारच नाहीत हे सांगून पटत नाही.कृती करून हि पटत अस नव्हे.तिचं गोष्ट पापड तळताना तेल चांगलं ताव आलेलं असलं तर पापड मस्त हसतो आणि फुलतो.कमी ताव ठेवला तर तेलकट होतो,कचवट लागतो.तिथं गॅस जरा जास्त आणि डोश्याना मध्यम ठेवायची गरज आहे.टॉवर फॅन मूळ गॅस ची फ्लेम सतत हलती राहून नीट सारखा ताव मिळत रहात नाही.
 तर जे पुरुष किंवा स्वयंपाक नव्याने करणारे असतील त्यांनी हि कला नम्रतेने शिकावी.आणि वाढताना ही अहंकार बाजूस ठेऊन प्रेमानं वाढावे म्हणजे त्या त्या पदार्थाची गोडी किंवा चव न्यारी च होते.यज्ञ कर्म असत महाराजा मग त्याच होम कुंड आणि यज्ञ सामग्री,हवन नियम नीट पाळावेच लागतात नाहीतर फल श्रुती निष्फळ च होईल.

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

घरातील कारखाना

गणपती जवळ आल्याची चाहूल सर्वत्र उघडलेल्या कारखान्यांना बघून जाणवलं.आमचा ,म्हणजे बाबांचा कारखाना आठवतो या दिवसात. आज विशेष लक्ष्यात आली एक गोष्ट ती शेअर करावीशी वाटली.
गणपतीचा कारखाना म्हटलं तर जागा असेल तितकी कमी च वाटते.आमचं पोयनाड च घर जवळपास एक एकर वर वसलेलं होत.तिथं आमच्या तात्यांनी म्हणचे बाबांच्या काकांनी कारखाना सुरू केला.500 गणपती त्या काळी करीत असत. दोन्ही अंगणी होती वापरायला,आणखी ही मुबलक जागा होती.काही वर्षांनी बाबा 9वर्षाचे होते तेंव्हा तात्यांच्या हाताला चोळ झाली आणि बोट कामातून गेल्या सारख झालं.तेच गणपती करत ,मग आता कसं करायचं?या विचारात सगळे होते.एक रात्री बाबांच्या स्वप्नात गणपती आला आणि म्हणला,तू का करत नाहीस?
हे बाबांनी तात्यांना सांगितलं.तात्या हसून म्हणले,बरं, पडलंय स्वप्न म्हणतोस तर बघ करून. आणि बाबांनी माती हातात घेतली ती वयाच्या 80 व्या वर्षा पर्यंत अव्याहत कारखाना सुरू होता जिथं गेलो तिथं.आज विशेष आठवण झाली ती एक गोष्ट म्हणजे जागा!
पोयनाडला मुबलक जागा होती.मग दादरला आलो तर वरचे दोन्ही मजले बाबा शिकवत त्या कॉलेज चे होते.बाबांनी नोकरी स्वीकारताना रहायला आणि कारखान्याला जागा हवी अशी अट घातली ती संस्थेने मान्य केली.कारण बाबा चित्रकला,हस्तकला,लेथ वर्क,फ्रेट वर्क,पपेट, संपूर्ण नाट्य शास्त्र आणि मातीकाम असे विषय एकटे शिकवत.त्या मुळे ते पूरक होत अभ्यासक्रमास.प्रश्न तिथं नाही आला.आला तो आम्ही नाला सोपऱ्यात आलो तेंव्हा.
बाबांचे हात मे महिना आला कि चुळबुळ करू लागत.बेचैन असत जर गणपती केले नाहीत तर.हे बघून आमच्या बिल्डिंग चे मालक म्हणले,जोशी तुम्ही इतकी वर्षे केलात कारखाना तर खंड पाडू नका.इथं तुमच्या घरातच सुरू करा.आजूबाजू ची काही माणसे नक्की घेतील मूर्ती मग काही नवी ही येतील.वाढली तर पुढे मोठी जागा घ्या भाड्याने.बाबांनी ते मान्य केलं आणि आमचा कारखाना इथं ही सुरू झाला.
आता ती रूम आठवते.दोन खोल्या दहा बाय दहा च्या.बाहेर एक छोटा व्हरांडा किंवा गॅलरी म्हणा.त्या ठिकाणी बाबांनी प्लायवूड बसवून तक्ता राम केला एरवी वापरायला .आणि गणपती च्या वेळी खाली साचे वर मूर्ती रहात.म्हणजे ती जागा बाहेरच व्यापली गेली होती.तिथं वर भिंतीवर ही फळ्या मारून गणपती असत त्या वर.आतली पहिली खोली.त्यात एक खाट, तिला लागून एक रॅक ज्यात माझी पुस्तक वग्रे आणि वर छोटा tv. पुढं दुसर रॅक ज्यावर आरसा आणि तेल,पावडर आणि इतर सामान. या खोलीच्या चारही भिंतीवर फळ्यांच्या 3 लाईन.नाही एक भिंत जी स्वयंपाक घरात पर्यंत लांब होती तिला बाहेर 3 आणि आत दोन अश्या फळ्यांचा भार ज्यावर मग गणपती बसत येऊन.मग आतल्या खोलीत ओटा,भांड्याचे कपात,डायनिंग टेबल आणि एक फळी गणपतीची अस होत. त्याच खोलीत संडास बाथरूम ही होत आणि खाली जी जागा मोकळी होती त्यात पाण्याच्या हंड्या कळश्या भरलेल्या असत.
गणपती सुरू झाले कि बाहेर मातीच्या पोत्यांची रास लागे तक्ता राम वर.हळूहळू सर्व फळ्या गणपतींनी भरून जात.लोक आले म्हणायचे,हे रंगलेले गणपती असे फळ्यावर रांगेत बघून अस वाटत गणपतींची पंगत बसलीय जेवायला.
या इतक्या अडचणीत आम्ही रोजचे व्यवहार करून गणपती ची माती मळण्या पासून ते लोक येऊन गणपती नेत तिथं पर्यंत करायचो.तयार होत आले कि बघायला येत लोक आपला गणपती कसा होतोय ते.घर असल्याने मग त्यांना चहा पाणी वग्रे करी आई.सर्वात जास्त कौतुक आईच वाटत.जमिनीवर ते भिंतीवर सर्वत्र मूर्ती असून एकदाही एकही मूर्ती खराब होणं वा तुटणे घडलं नाही तिच्या हातून.फोडणी वग्रे ही सावधान राहून करावी लागे कारण त्या वाफेने रंगलेले गणपती खराब व्हायची शक्यता होती.या पसार्यातून ती बाहेर आमचा बिल्डिंगचा च पण सार्वजनिक नळ होता तिथून पाणी भरत असे दुपारी 1 ते चार रांगेत नंबर येईल तसा. हो,बाहेर मोठं पिंप ही होत पाण्याच.
आम्ही चालताना ही घरात हात जास्त न हलवता चालायचे .रात्री झोपताना सगळे सावधान पोझिशन मध्ये च हात अंगा जवळ ठेऊन झोपायचो.हातरुण घालणं काढणं ही काळजीने करावं लागे. रंगाच्या वेळी रंगाची भांडी,फिरकीवर गणपती,ब्रश,फडकी आणि कॉम्प्रेसर अशी जंत्री असायची त्याच जागेत.गणपती घेऊन लोक गेले कि, करकचून बांधलेला देह कुणीतरी दोऱ्या कापून मोकळा केल्या सारख वाटे.मग रात्री मुद्दाम तंगड्या पसरून ,अहा काय मजा आहे न?किती जागा होतेय आता,अस म्हणायचो.
एकदा याच जागेत बाबांचे 20 विद्यार्थी विद्यार्थिनी काही कार्यक्रमानिमित्त गावात आल्या ते सर्वजण सरांकडे रात्री मुक्काम करून पहिली गाडी पकडून जाऊ म्हणून हक्काने आले.मग याच दोन खोल्यात आईन सर्वांना वाढलं.त्यातील मुलींनी मदत केली आईला. आणि रात्री 20 जण त्या खोल्यात आणि बाहेरच्या तक्ता राम वर झोपलो ही होतो.पोर आणि पोरी आईच्या पाया पडताना म्हणल्याही,बाई तुम्हाला खूप त्रास दिला न आम्ही ?पण जोशी सरांकडे राहून गप्पा मारून जाऊ ही इच्छा होती.आई म्हणली,आपलेपणा न आलात न? मग त्रास कसला.आमची जागा छोटी आहे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलेत म्हणून जमलं कि ग,माझं काय त्यात.आता परत या पुन्हा केंव्हाही.
मग याच जागेत पाणी भरलं कंबरभर 26 जुलै ला.तेंव्हा कारखाना नव्हता घरात.भाड्याने जागा घेतली होती तिथं होता.आम्ही रंगवत बसलो होतो नी पाणी चढू लागलं.गावातले लोक घरची बाकडी पाण्यातून ढकलत घेऊन आले आपणहून गणपती बुडतील जोश्यांचे म्हणून.तिकडं घरी मात्र संडास बाथरूम मधून जे पाणी चढलं ते काही मिनिटात कमरेला टेकल.शेजारच्या पोर पोरीच्या साथीने आईने फ्रीज उंच जागी बाहेर नेऊन ठेवला पण पावसाने तो निकामी केलाच.मग पुढील आठवडा आम्ही तळ मजल्यावरचे लोक पहिल्या मजल्यावर राहिलो.सर्वांनी एकत्र जेवण केलं.बिल्डिंग एक कुटुंब झाली.
आज आठवलं तर हे सर्व प्रत्यक्ष  अनुभवून हि विश्वास बसत नाही कि त्या 220 चौ फु जागेत इतकं करत होतो आम्ही आणि ते ही आनंदाने.
गणपती बाप्पा मोरया🙏🏻