रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

*पर्वचा*

*पर्वचा*
तिन्ही सांजे च्या सुमारास बाहेरून खेळून दमून आलो कि हातपाय धुवून आधी पर्वचा म्हणायला बसायचाय. ज्याची पाठ नसेल त्याला पापड वाढणार नाही.अशी काकू ची तंबी कानावर यायची.मग निमूट हातपाय धुवून झोपाळ्यावर कडी च्या बाजूची जागा पकडायची धावत जाऊन.मग जे जे सुट्टीत आलेले असत ते सगळे ही बसायचे येऊन.एक रांग पुढं एक माग. ताई कधी आमच्या सोबत झोपाळ्यावर किंवा गर्दी जास्त असेल तर बाजूला सतरंजी वर बसायची.मग एकेक स्तोत्र सुरू व्हायची ज्यात भीमरूपी, रामरक्षा,अथर्वशीर्ष ते सदा सर्वदा अशी यादी असे.स्वयंपाक घरातून खमंग सुवास अस्वस्थ करत असतानाच आतून दम दिला जाई,सलील चा आवाज ऐकू येत नाही.मघा घसा फोडत होता आता बसला का काय? ज्योत्स्ना बारीक लक्ष ठेऊन अस.जो कुणी म्हणत नसेल त्याच नाव मला सांग,आणि कुणाला मदत केलीस तर तुझी ही खैर नाही.तू ही त्याच्या सोबत उपाशी झोप.
ही धमकी त्या वेळी खरी वाटत असे.
मुंबईत हे रोज नसे पण खाली व्यायाम शाळेत शनिवारी कुस्ती न मल्ल खांब खेळत असू.शनिवारी आखाडा उकरून त्यात दही,तूप. लोणी वग्रे घालून सर्व माती फावड्याने एकजीव करायला उतरत असू आम्ही.वस्ताद आणि बाकी पैलवान वर बसून काम करून घेत.मग बाळ मास्तर(आपल्या निशा चे वडील)येत हातात तबक घेऊन.त्यात निरांजन, नारळ आणि प्रसाद म्हणून खडी साखर वग्रे असे.मग तो नारळ फोडून त्याचे तुकडे करायचे.मग आरती ला उभं रहायच.सत्राणे उड्डाणे ते सदा सर्वदा होई.मग तो प्रसाद खायला खूप आवडायचं.
पुढं मोठं झाल्यावर म्हणजे वयाने,हे सर्व माग पडलं.ती ती ठिकाण ही सुटली.मग राम रक्षे चा डावीकडचा अर्थ वाचून अस वाटू लागलं कि, हे रामा माझ्या डोक्या पासून पाया पर्यंत सर्वांच तू रक्षण कर याला काय अर्थ आहे? मग मी काय करायचं? अहंकार नव्हे पण सर्व भार त्याच्यावर का टाकावा आपण ? असे प्रश्न पडू लागले.
आता मात्र वय वाढल्याने किंवा त्या सोबत परिस्थिती चे फटके अनुभवल्याने वेगळं वाटू लागलाय.
कधी तरी अस जाणवत कि, आपलं काम,प्रयत्न सुरूच ठेवायचे पण त्याला मिळणार फळ या वर मात्र हक्क ठेवायचा नाही.जे कृष्ण ही म्हणतो कि, ते माझ्यावर सोड.काहीतरी शक्ती वेगळी आहे जीच आपल्याला आकलन होत नाहीये.आणि त्याच्या वर सर्व भार टाकणे अस नसून माझ्या हातून काही घडलंच चांगलं तर मी फक्त माध्यम आहे कर्ता करविता तोच आहे.त्याची इच्छा म्हणून मला शक्य झालं.हे वाटायच कारण, साधी लचक भरली तर कूस बदलणंच नव्हे तर पाय ही उचलवत नाही.मी मी म्हणणारा माणूस अर्धांग वाताचा झटका आला तर बोट ही हलवू शकत नाही.
आता जाणवत जे म्हणतो त्याचा अर्थ समजला नव्हता तरी तेंव्हा ही आणि आता खूप समजत अस नव्हे पण वय वाढल्यावर ही काहीतरी शांत शांत वाटत.रामरक्षे ची बदलत जाणारी चाल,त्वं अग्नीत्वं वायूसत्वं या ओळी म्हणताना काही तरी वेगळी मजा येते.
ते माजघर,ती माणसं, ते वातावरण याचा पुनः प्रत्यय आतून खूप सुखावून शांत करतो.फक्त आता पर्वचा म्हणायला झोपाळा नसतो,सोबत कुणी नसत,हा sss कोण रे तो तोंडातल्या तोंडात बोलतोय कळू दे मला अशी स्वयंपाक घरातून येणारी हाक नाही.
आमचे तात्या रात्री अंगणात शतपावली करताना तासभर काही तरी म्हणत असत.पुटपुटल्या सारख.हे काय आणि का म्हणत असतात याच कुतूहल होत.एकदा धाडस करून त्यांना विचारलं,तात्या काय हो म्हणता इतकं ?
त्यांनी दीर्घ श्वास घेतला.सौम्य आणि त्यांच्या कडून दुर्लभ स्मित हास्य करत माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणले,अरे आजवर काय काय शिकलोय.ते ते आठवत असतो.घर्षण हवं न,नाहीतर विस्मरण होईल.
तरी त्यांच ते पुटपुटण डोक्यात राह्यलं च होत.पुढं ग्रेस ची ओळ कानी पडली आणि तात्या आठवले.
स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुःख कुणाचे
मग माझा मी अर्थ लावला.कदाचित मोठं झालं कि जबाबदारी मूळ माणूस कुठं कुणापाशी मोकळा होत नाही.कारण तितकं समर्थ कुणी असावं लागतं. मग ग्रेस म्हणला ते खरं असावं.
एवंच परत एकदा पर्वचा म्हणली तर खूप शांत शांत मात्र नक्की वाटत.

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

उस्ताद मेहदी हसन खां

*उस्ताद मेहदी हसन साहब*

गझल ऐकू लागलो ते tv वर मॉडेला वूल स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम मूळ.तलत अझीझ,पंकज उधास ते अनुप जलोटा सारखे आर्टिस्ट त्यात गायचे.भाषेची नजाकत आवडली.मग वहीत शेकड्यानी गझल जमवल्या होत्या ,पण नंतर ती गहाळ झाली.कालांतराने परिस्थिचे थपडे पडल्याने वास्तव समजू लागलं. त्या मूळ असेल कदाचित पण गझल मध्ये लाचारी जाणवू लागली.सारख तो ,तिला विनवतोय.मला वाटत चाचा गालिब च म्हणून गेलेत कि, आग दोनो तरफ हो तो ईश्क मजा देता है.मग भाऊ साहेब पाटणकर वपुंच्या पुस्तकातून परिचयाचे झाले.उर्दूवर प्रचंड प्रभुत्व असलेला माणूस.मुशायऱ्या त जाऊन आपला ठसा उमटवला होता त्यांनी.त्यांना ही ,हि लाचारी पसंत नव्हती.त्यांना ऐकल म्हणजे कळेल मला काय म्हणायचंय.
अस असलं तरी सुरेश भटांची मलमली तारुण्य माझे ते तरुण आहे रात्र अजुनी अश्या गझला मनावर राज्य करत होत्या.मग तबल्यामुळं गुलाम अली यांची चुपके चुपके कैकदा ऐकली .त्यांची लय प्रधान गायकी आणि उस्ताद तारी खान यांच्या तबल्या करता.काय माहोल तयार होतो ,जवाब नही.
त्यातच काही जाणकार मेहदी हसन नाही ऐकला तर गझल काय ऐकली म्हणले.तारी खान त्यांचे तबला वादक असले तरी गाण्यात त्यांचे शिष्य होते अस ऐकल.अलीकडं तू नळी मूळ तारी खा साहेबाना रंजीश ही सही गझल पूर्ण तयारीनिशी आणि स्वतः तबला वाजवत गाताना ऐकल आणि अक्षरशः हात जोडले. कारण नुसता ठेका नाही तर उठाण लग्गी तिहाई ,मध्ये भरणा अस सर्व व्यवस्थित वाजत होत आणि गात ही होते.मग मेहदी हसन साहेबांची रेकॉर्डिंग ऐकली.खर्जा चा घोगरा तरी नजाकत भरा आवाज ऐकून लोक म्हणतात ते पटलं.ती गझल गावी तर त्यांनीच किंवा ऐकावी ती त्यांचीच.सोबत तारी खां असले तर सोने पे सुहागा.
तर मेहदी हसन खां मूळचे भारतातले.राजस्थान राजवाड्याचे दरबारी गायक त्यांचे वडील होते.
आता खान आणि खां साहेब यातला फरक त्यांनीच सांगितलाय एके ठिकाणी.
पठाण लोकांना खान म्हणतात.
पण ज्याच्या किमान तीन पिढ्यात उत्तम आणि लोकमान्य गवई किंवा वादक होऊन गेलेत त्यांच्या पुढील पिढीत जर कुणी कलाकार असेल तर त्याला खां हा बहुमान मिळत असे.यांचं घराणे तर कैक पिढ्या राज गायकांच्या होत्या अस होत.वडील जयपूर दरबारी होते.कसली तदात नव्हती.मेहदी हसन 12 का 13 व्या वर्षी बडोद्याच्या महाराजां समोर हजेरी लावते झाले.40 मिनिट गाणं झालं.महाराजांनी त्यांना सोन्याचं कड आणि पोषाख देऊन गौरवलंच पण आज पासून हा आमचा दरबारी गायक झाला म्हणून घोषित केले.
तोवर वातावरण बदलू लागलं होतं.वडील मग काही काळ नेपाळ वग्रे ठिकाणी ही दरबारी गायक म्हणून गेले.पण फाळणी झाली नी हे कुटुंब पाकिस्तानात गेले.सर्व शांत झाला कि येऊ परत म्हणून.पण वडील इकडं आल्यावर कळलं कि सर्व लुटल गेलंय. मग हाती लागल ते घेऊन परत गेले.
तिथं ही जे होत ते विकत राहून यांची गुजराण सुरू होती.तालीम तर जोरदार होतीच पण,गाणं करायचं तर तब्येत उत्तम हवी.छातीत दम हवा.या करता त्यांना वडील व्यायाम करायला लावत.बर तो ही साधा नव्हे.
पहाटे 3 वाजता उठायचं.आधी 500 मग 1200 वर गेलेल्या जोर आणि बैठका.3 मैल धावणे.गावात एक मैदान होत त्याला चक्कर धावत मारायची.पहिल्या ठिकाणी आल्यावर बैठका मारायच्या मग पुढं दुसरी फेरी.अश्या तीन फेऱ्या झाल्या कि शेवटची फेरी हळूहळू धावत मारायची.
हे करायला खुराक ही तसाच होता. सहा शेर दूध एक दमात प्यायचं.पाऊण शेर देशी तूप,1छटाक गोश्त आणि बदाम ,पिस्ते ,काजू असा आहार.संध्याकाळी 4,5 मल्लाना प्रत्येकी थकवायच यांनी तेही दहा मिनिटात.मग यांचे काका उतरत त्यांना थकवायच.
बाकी रियाज होताच.
करता करता एक दिवस वडील म्हटले,आता आपल्या जवळ विकायला काही नाही.तेंव्हा उदर निर्वाह करायला म्हणून मी धंदा करणारेय.त्या करता एकाला 10 हजार उरले होते ते दिलेत. तो उद्या लाकडं आणील.
म्हणजे तुम्ही काय धंदा करणार आहात?
लाकडाची वखार टाकतोय आपण.
पण मग तुम्हाला सगळे वखार वाले म्हणतील!
हो पण इलाज नाही.तुझी तालीम ,खुराक,कुटुंबाचा खर्च ही आहेच.
नाही हे नाही पटत मला.तुम्ही मला पैसे द्या मी काही धंदा करीन आणि कमवेन.
वडील हसले आणि दहा रु काढून दिले.
मग त्यांनी एक मातीच बांधलेलं दुकान त्यांना देण्यात आलं होतं ते चालवायचं ठरवलं.राजदरबारात बालपण गेल्याने राजाच्या मोटारी,पंप वग्रे रिपेअर करायला माणस होती.यांना त्या टेक्निकल गोष्टीं ची आवड असल्याने तिथं उभं राहून सर्व टिपलं होत. मग त्या दहा रुपयात दीड रुपयांचा पंप,जुने टायर,स्क्रू ड्रायव्हर अशी जुजबी खरेदी केली.5 दिवस रिकामे गेले.मग मात्र बाईक,सायकल,मोटारी रिपेअरिंग करता येऊ लागल्या.13 रु च्या आसपास रोज मिळकत होऊ लागली. वडिलांना रोज 5 रु दिले जात होते.ते ठीक आहे न म्हणून विचारलं तर वडील म्हणले,अरे यात सर्व होतय.
पण या धंद्यावर अवलंबून रहाणं ठीक नाही म्हणून भावाला तिथ बसवून हे लाहोर ला गेले.तिथं ट्रॅकटर कम्पनीत जाऊन आपली कहाणी सांगितली.त्या लोकांनी ही ठेऊन घेतलं.यांनी फिट केलेले 300 पंप होते त्या परिसरात.काम बघून फर्ग्युसन कम्पनी ने त्यांना उत्तम कारागीर म्हणून सर्टिफिकेट दिल.
मग एक माणूस म्हणला, हे काय करत राह्यलास माझ्याकडे ये.मला एक जमीन लीज वर मिळालीय.ती पडीक आहे. तिला उपजाऊ करायच आहे.हे ही गेले त्याच्या बरोबर.त्या गृहस्थाला इतर कंपनी नी सांगितलं होतं कि, या जमिनीस वसवायला तीन वर्षे हवीत आणि यंत्र सामुग्री हवी.
त्या माणसाकडे आता पैसे शिल्लक नव्हते.मेहदी हसन म्हणले मला फक्त एक ट्रॅक्टर आणून द्या.त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी ती जमीन एक वर्षात नांदती केली.पीक नीट एक ओळीत लावलेली. ती बघायला लोक लांबून येत.
तेंव्हाच त्यांना एक पत्र आलं.त्यांचं गाणं नुसतच साथीला काही नसताना एक लग्नात ऐकल होत एकाने.तो इतका खूष झाला कि म्हणला,मी जेव्हा सिनेमा काढीन त्यात तूच गाशील.हे हजार रुपये हवं तर टोकन म्हणून ठेव किंवा बिदागी म्हणून.
तर त्यानं सिनेमा काढायचं ठरवलं तर याना करारपत्र न पैसे पाठवले आणि ये म्हटलं.मग ज्याची जमीन होती त्याला हे सांगून तिथून निघाले.गायलेली गाणी गाजली.रेडिओत बोलावलं. त्यांची ऑडिशन 5 तास झाली.धृपद ते सिने संगीत यांनी ऐकवलं.बुखारी साहेब म्हणले याल ठेऊन घ्या.पगार किती तर 35 रु म्हणले.बस इतकंच?तर समजलं इतरांना 12रु च मिळत.मग आणि काय देणार तर A ग्रेड रेडिओ ची मिळाली.मग हळूहळू नाव झालं आणि पसिद्ध झाले.लहानपणी लग्न झाल्यानं लग्नात बायको 13 वर्ष्याची होती.तिचे आई वडील गेल्याने तिला तू आता घेऊन जा म्हणाले.मग तिला स्वयंपाक वग्रे ही यांनीच शिकवलं.मग आणखी ही एक लग्न झालं होतं.,
मध्ये हिंदुस्थान मध्ये राजस्थान ला बोलावलं.ते आले गायले. पण त्यांच्या जन्म गावी भेट द्यायची म्हटल्यावर व्यवस्था केली गेली.तिथं जाऊन आल्यावर अधिकाऱ्याने विचारलं,कसं वाटलं जाऊन?सुधारणा आहे का नाही?तर तिथं आता खूप सुधारणा आहे पण अजून रस्ता ,वीज,पाणी नाहीये.मग इतर व्यवस्था केली गेली पण रस्ते झाले नाहीत.तेंव्हा मेहदी साहेब म्हणले, मला काही करायचंय गावकऱता करू का ?मग त्यांच्या कार्यक्रम ठेवला गेला गावात.दीड दोन लाख लोक होते आलेले आजूबाजुहून.ते उत्पन्न त्यांनी रस्त्याकरता दिले आणि रस्ता झाला., झून झून नाव मला वाटत गावाचं.
इकडं लता दीदी पासून सर्व त्यांचे चाहते होते. आले घरी कि दीदी स्वतः त्यांना करून वाढत.
त्यांचे शेवटचं दर्शन जे पाकिस्तान tv वर झालं ते मात्र बघवले नाही.सुन्न व्हायला झालं.पहाडा सारखा माणूस ओळखू येईना असा गलितगात्र झालेला.त्यांच्या मुलाने सांगितलं,हमारी दोनो अम्मा जबसे गयी तबसे इन्हो ने हाय ले ली है.
कलाकार म्हणून मोठे होतेच पण वेळ आली तेंव्हा कला बाजूस ठेऊन कुटुंबा करता अर्थार्जन इतर मार्गाने इमानदारीत आणि समर्थ पण केलं हे विशेष.,
ते म्हणले,जे ठरवलं ते करायचंच.होतच.अल्ला से मांगो दिल से तो वो दे देता है बस मांगनेका तरिका आना चाहीये.या दुसरे मायनो मे विल पॉवर स्ट्रॉंग होनी चाहीये.
हे सर्व त्यांच्या मुलाखतीतून समजलं.आणि कलाकारा मागचा माणूस ही समजला आणि 🙏🏻

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

भटकंती,वडोदरा

भटकंती करताना काही ठिकाण खूप प्रेमात पाडतात. जी थोडीशी भटकंती केली ती गडांवर आणि काही शहरात .
गड भटकताना गडावर त्या ठिकाणीच पावित्र्य न जपणारे बेजबाबदार लोक सोडले तर बहुतांश ठिकाणी गड पायथ्याशी असणारे गावकरी सज्जन,प्रेमळ च भेटले. काही लोक गडावर येणाऱ्या लोकांच्या खाण्याची रहाण्याची सोय उदरनिर्वाहा करता करतात.पण व्यवहार जपून ही अधिकच अगत्य इतकं दाखवतात कि ऐतिहासिक वास्तू इतकच त्या लोकांकरिता  त्या ठिकाणी परत जावंसं वाटत रहात.
कोल्हापूर आणि बडोदा हि मला आवडलेली ठिकाण .तिथल्या इतर प्रसिद्ध गोष्टीं पेक्ष्या लोकांच्या वागणुकीमुळे. पैकी बडोद्यात तर जाऊन स्थायिक व्हावं अस मनात आहे.
का ? तर,
तिथले लोक वागताना अतिशय सौजन्याने वागले असा अनुभव.रोजच्या व्यवहारात कुठं राग ,चिडचिड नाही.आवो भाई म्हणून स्वागत करतील.कंडक्टर प्रवासी लोकांशी सौजन्य सप्ताह नसताना सौजन्याने वागतो. जुन्या फाटक्या नोटा प्लास्टिक च्या छोट्या पिशवीत घालून एका आजीने दिल्यानंतर त्या स्वीकारताना पाह्यला जुनागड गिरनार ला जाताना.शेजारी प्रेमानं वागताना पाह्यलं.परवाच बसने गेलो.उतरायचं ठिकाण मला माहित नव्हतं.भावाचा फोन आला ,कुठं उतरवतोय विचार ?त्याला फोन जोडून दिला ड्राईव्हर सोबत.ड्रायव्हर न सांगितलं चकली सर्कल.भाऊ म्हणला,जमत असेल तर गोत्री जवळ उतरवून दे मला आणायला जवळ पडेल.यावर ड्रायव्हर आपुलकीनं म्हणला,जो भाई मारी 3 सीट खाली छे. ए जो ना भराय न त्यारे भाई ने गोत्री उतारी देऊ छु.
जो न जमतु होय तो सारू .फोन करीन जणावसो मारे तो हूं त्या आवि जाऊ अने लेवा.
फिकर नही करता भाई आऊ छु चालो तमारा भाईन लैने गोत्री.एक लेफ्ट मारवी पडशे खरी मारे पण आऊ छु हं.
अस आऊट ऑफ द वे जाऊन मला घराजवळ उतरवलंन.परत उतरताना,जय श्रीकृष्ण हं भाई,अवजो हा फरी थी. म्हणून मला निरोप ही दिलन प्रेमानं.
आत्ता येताना ही गाडी बुकिंग वेळी ठरल्या वेळे आधी 2 तास आली. फोन आला,कुठं आहात साहेब गाडी येऊन राह्यलीय.म्हटलं बुकिंग केलं तर 12 च टाईम होत तुम्ही 2 तास आधी कस येता ?भावानं फोन घेतला न तेच पुन्हा शांतपणे सांगितलं.तो म्हणला, ऑफिस वाल्यांचा काहीतरी गोंधळ झाला बहुतेक पण गाडी तुमच्या करता थांबलीय. भाऊ म्हणला,जाऊ नका मी येतोय घेऊन भावाला.तर तो ही म्हणला ,या सर घाई करू नका थांबतो तुमच्या करता.
मी मुंबईकर, टाईम दिल न आधी गाडी कशी येते ? म्हणून डोकं फिरलं.पण भाऊ बडोदेकर.शांतपणे म्हणला,अरे होत असं कधी कधी.ऑफिसमध्ये घोळ असेल काहीतरी झालेला. किंवा काल आपण बुक केली सीट तेंव्हा फक्त तुझंच बुकिंग होत बाकी गाडी खाली होती.अमदाबाद वरून बुकिंग नसेल तर त्यांनी दुसऱ्या गाडीत सोय केली असेल.चल जाऊ आपण.त्यानं हायवे ला आणलं.गाडी आली.मी त्या माणसाला म्हणलो,तुम्ही टाईम 12 च दिल न 2 तास आधी आलात आमची धावपळ झाली.
तो शांत पण म्हणला, भाई कुछ गडबड हुई खरी.ऑफिसमध्ये लोकांनी चुकून दिली असेल वेळ
सॉरी हं.
मग शांतपणे विचार केला,ज्या करता बडोदा आवडलं त्याच उदाहरण भावानं शांतपणे वागून दिल कि! मग मी ही त्या अटेंडन्ट ला म्हणलो,जाने दो चलो.सोपारा फाटा उतारदो. तो ही मंद हसत म्हणला,हा भाई.
तर असा अनुभव.कुठं घाई गडबड, राग,चिडचिड नाही.
अर्थात तिकडं अस काही शंभर टक्के असेलच असे नाही,पण मला आलेले अनुभव चांगलेच होते.मामा कुणा कुणाकडे नेत होता. हा माझा भाचा आहे.तबला शिकवतो.त्याला इकडं आणायचा विचार आहे माझा.यावर ते लोक म्हणत,जरूर या.इकडं असे लोक हवेच आहेत आम्हाला.आमच्याकडुन होईल ते नक्की करू.काही ना काही होईलच जरूर या.
बाकी रस्ते उत्तम नी प्रशस्त.खाण्यापिण्याच्या मुबलक जागा.फूड कोर्ट कल्पना उत्तम राबवली जातेय.
एकूण बडोदा अनुभवायला हवं असं शहर.
कोल्हापूर विषयी पुन्हा लिहिन.
तो वर भटकत रहा.मजा येते.नवी ठिकाण आणि त्या ही पेक्षा माणसं अनुभवायला.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

किल्ले रोहिडा

रोहिडा बघायचा होता पण जमत नव्हतं.काल अचानक जावंस  वाटलं रात्री आठ च्या सुमारास निघालो परळ डेपोत दहा ला पोचल्यावर समजलं सव्वाअकरा न सव्वा बारा अश्या गाडया  आहेत. मग १तास वाट बघत सव्वा अकराची गाडीपकडली.पाचला भोरला उतरलो.दोन पेपर वाले पेपर लावताना दिसले स्टॅन्ड बाहेर. त्यांना विचारलं बाजारवाडी गाडी कधी आहे. एक म्हणला ,मी नवीन आहे इथं मला माहित नाही. दुसरा म्हणला आठ ला येईल गाडी. परत  स्टॅन्ड मध्ये गेलो .. मी आणि दोन म्हातारे गृहस्थ स्टॅन्ड मध्ये होतो .
भटकंती करताना अपरिचित लोकांची भेट होत होत असते . कधी चांगले कधी वाईट अनुभव मिळतात . पण मला जास्त चांगलेच लोक भेटलेत आजवर . सुरुवात या दोघांपासून झाली आजची . बाजारवाडी बस कधी विचारलं तर म्हणले सांगतो कि आली  कि .  गप्पा सुरु झाल्यावर तुम्ही कुठले वग्रे  झालं. तेंव्हा समजलं हे दोघेही बोरिवली च्या सरकारी ऍन गोदामात हमाली करतात. आधी १०० किलो ची गोण  असायची हो,आता आल्यात ४०न २५किलो च्या. मग तुम्हाला पाठदुखी लागली असेल.
तर काय हो ,हे गुढघे आता चालून देत नाहीत. इतक्यात एक गाडी लागली. चालक आणि महिला वाहक कुणी प्रवासी नाही म्हणून जाऊ लागले तर त्या काकांनी थांबवून मला हाक दिली,चला जा हि गाडी जाते बाजारवाडीहून . त्यांचे आभार मानून गाडीत बसलो. दहा मिनिटात बाजारवाडीत उतरलो. गाव शांत. अजून नीट उजाडलं हि नव्हतं . गड मात्र दिसत होता त्याच्या रोखाने पुढं निघालो. एक बाई शेणाची टोपली जमिनीवर रिकामी करत होत्या त्यांना विचारलं,
गडाची वाट हीच का ?
कुठून आला दादा ?
विरार .
मंजे आताच उतरला न ?
हो भोर वरून आलो ती गाडी गेली तिने.
मग चहा नाश्ता काही केलंच नसेल ?
नाही.
जरा थांब,या इतक्या लावतो मग माझ्या घरी ये चहा घे मग निघ गडावर.हे इतकं लावून झालं का निघू. हे काय हाय माहितीय का ?
हो,शेणी थापताय न.न.मग हसली न म्हणली, हा रे . हल्ली लोकांना माहित नसत म्हणून म्हणलो. तिच्या शेणी लावून झाल्यावर तिच्या सोबत निघालो. समोरच छोटं  घर होत. नवरा बाहेर अंघोळ करत बसला होता दारातच त्याला म्हणली,अवो बगा  गडावर निघालेत त्यांना घेऊन अली. चहा घेऊन निघा म्हणलो. तो हि पटकन म्हणला , या आत बसा जाऊन. जेमतेम बारा फुटी घर. दारा नंतर अगदी छोटी पडवी  तिच्यात म्हैस बांधलेली. पूढं  बाजेवर बस म्हणली तिथं बसलो. बाई चहा करायला लागल्या. काल  तर गडावर जत्राच होती माणसांची. शाळेच्या ट्रिपा , बाकी हि लोक. खालपासून वर पर्यंत रंग लागली होती .आम्ही हि देतो करून कुणी म्हणलं तर नाश्ता,जेवण . नवरा शर्ट चढवून आला. म्हैस आता ओरडू लागली न जागीच पुढं माग  होऊ लागली. तिचं खाण्याचं टाइम झालं का ?हा ,धार काढायची आहे तिची. तिला वर मंदिरा जवळ बांधली तर रहात नाही, आम्ही जवळ लागतो. इतक्यात चहा घेऊन बाई आल्या . स्टील चा ग्लास होता. तुम्हाला बशी लागलं का ? हो हे खूप गरम झालंय . मग त्यांनी बशी दिली. चहा पिऊन निघताना म्हटलं,पैसे किती द्यायचे?हट  , पैसे कसले? चहा  नाश्ता न करताच गडावर निघाला म्हणून बोलावलं ,पैसे नको. तरी मी ठेवले पैसे म्हटलं,अहो सकाळी सकाळी असच कसा घेऊ ?पुन्हा येईन तो कालवून येईन मग जाताना नाश्ता आणि जेवण तुमच्याकडे करीन . फोन नंबर देऊन ठेवा. त्यांनी दिला. मग बाई परत  मला वाट दाखवायला आल्या. या पाण्याच्या टाकी खालून जो रस्ता गेला न तो सोडायचा नाही. काही काळजीच कारण नाही वाट अगदी सरळ आहे. मग सुरुवात इतकी प्रेमळ माणसं  भेटून झाली म्हणल्यावर आनंदानं निघालो. गड दिसत होता पण वाट अजिबात नाही. जस जसा पुढं गेलो तशी वाट उलगडत गेली. एक गुराखी पोरगा भेटला त्याला म्हणलो, नीट चाललोय ना रे गडावर ? तो हि म्हणला , हि वाट सोडूच नका. पायवाट च आहे . बांधीव पायऱ्यांची ऐश नाही. चालायची सवय सुटल्याने दमछाक होत होती. पण ऊन चढलं नव्हतं न वातावरण हि गार  असल्यानं मस्त वाटत होत. मध्ये विश्रांतीला बाके हि ठेवलेली आढळली त्यांचा उपयोग केला . शेवटी दरवाजा दिसला पण तो हि आपल्याला सन्मुख नाही. राजांच्या गडाचं वैशिष्ट्य. दरवाजा दिसतच नाही समोरून. तीन दरवाजे पार करून गडावर पोचलो. बऱ्या पैकी विस्तीर्ण आहे गड . थोडाही तटबंदी आणि मला वाटत ७ बुरुज अजूनही उभे आहेत. पाण्याची टाकीही आहे मुबलक ज्यात पाणी आहे. एक तर पाहल्या दरवाजात आहे . रोहिडेश्वर मंदिर बंद होत. त्या समोर काही फुलझाडं लावलेली दिसली. जे कुणी हि बाग  फुलवतायत त्याचं कौतुक वाटलं . काही वाड्याचे अवशेष आहेत बाजूस त्या मध्ये गडावर सापडलेले जात्याचे,, मातीच्या मडक्याचे वगैरे तुकडे लोखण्डी टेबल वर  मांडून ठेवले आहेत. जे कुणी घेऊन न जाताट  तिथंच राहू दिलेत हे बघून बर  वाटलं. गवत गड भर वाढलं होत. आणि अख्ख्या गडावर मी एकटाच होतो. हँड पाहायला तासभर लागतो . बाकी गड  इथून दिसतात म्हण पण धुक्यामुळं दिसत नव्हतं. बाजी प्रभूंची आणि राजांची भेट इथंच झाली. मग खाली निघालो . गडाचा दरवाजा काम करतोय हे जाणवलं. उतरताना रस्त्यात तिघे वयस्क लोक गप्पा मारत  होते त्यांना रामराम केला. मग त्यानी चौकशी केली माझी.
कुठून आले दादा ?
विरार. तुम्ही इथलेच दिसता ?आज गडावर निघाले का ?
अहो रोज जातोय कि,फुलझाडं लावलीयत त्यांना पाणी घालायला.
बघितली तो उत्तम काम करताय . धन्यवाद तुम्हाला राजांचा गाद आज हि असा राखताय .
तुम्ही वस्तीला होता का /
नाही आज लवकर आलो न आलो गडावर जाऊन .
पण तुम्ही सर्व गड बघितला का नीट ?
हो तर . तुमची बाग बघितली,सर्व बुरुज आणि पाण्याची टाकी बघितलं .
हा , मग ठीकाय, पण अंघोळ केली का न्हाय ?
नाही हो.
बर बर . पुढल्या खेपी रहायला या. पाणी पाणी हाय अंघुळी ला ,राहायची बी सोय  हाय.
नक्की नक्की म्हणून त्यांचा निरोप घेऊन उतरू लागलो. एक वळणावर आलो त्या वाटेतून दुसरी वाट दिसली म्हटलं जावं बघून . पण ती बरीच निसरडी होती. बसूनच उतरावं लागलं सर्कस करत . हा माझा प्रयत्न एक माणूस खालून बघत होता. त्याच्या जवळ पोचल्या वर म्हणला ,
गेले त्या वाटंनंच उतरायचं हुत कि , तिकडन का आलात.
काही नाही उगा म्हटलं बघू जाऊन. मग त्यानं चौकशी केली कुठून आलात वगैरे. त्याचा निरोप घेऊन गाडी पकडायला चौकात आलो . भाड्याच्या गाड्या लागल्या होत्या त्यानी बघताच विचारलं,सर भोर ला जाणार का ? हो तुम्ही कधी निघणार ? हे काय माणसं  जमली का निघालो.मग जरावेळ वाट बघावी लागली. काही बाया न म्हातारे आले. आधी मी, एक आजोबा न ड्रायव्हर असे पुढं होतो. इतक्यात एक शाळेचा मुलगा हि येऊन बसला. तो उतरला थोडं पुढं गेल्यावर पण अजून एक आजोबा येऊन बसले . आता हा गाडी कशी चालविल?हा विचार आला मनात . बसलेले दोन्ही बाजूचे म्हातारे हि ऍडजेस्ट करत बसले, त्यांच्या पायाखाली हात घालून तो गियर बदलत होता . भोर येस्तोवर माझ्या उसण भरते तस  झालेलं. त्या ड्रायव्हरला म्हटलं कमल आहे बॉ तुंचीकाशी चालवू शकता गाडी तुम्ही इतक्या अडचणीत .
अहो सर सवय आहे आम्हाला आणि पासिंजर लोकांना हि. तुम्ही होते आज म्हणून एक सीट कमीच भरली मी. बापरे म्हणजे पुढं पाच लोक घेऊन जातात हे .
मग त्याला रायरी गड  किती लांब विचारलं.
तिकडं सर आज जाऊ नका तुम्ही जर परतायचं असेल लगेच आज तुम्हाला तर. कारण रस्त्याची काम सुरु आहेत म्हणून st  कमी आहेत. आमचे गाडीवाले हि तिकडं कमी असतात. तिथं जायला तास दीड तास ,वर  जाऊन यायला तीन तास परत उतरायला तासभर . म्हणजे खाली आल्यावर गाडी मिळालं नाय मिळेल . पुढं भोर ला हि गाडी पुण्याची नाही मिळाली तर मुक्काम करावा लागेल . त्या पेक्ष्या परत या जमलं तस. आपल्या कड तस  कुणी बाइकवाला  जात  असलं त्याला म्हणला  का मला सोड बाबा तर सोडतात हा लोक पण नाहीच मिळाला कुणी तर तुमची पंचाईत व्हायची.
मग राहूदे, तुमचे किती झाले .
दहा रुपये सर. मी वीस देऊ केले तर निग्रहाने घेतले नाहीत. पण म्हणला राजवाडा बघून जा तो जवळ आहे भोर स्टॅन्ड पासून . मग एक पासिंजर ला म्हणला सरांना  वाट दाखवून जा रे . त्या माणसाने दाखवलेल्या वाटेने जाऊन राजवाडा बघितला. आत कन्नड फिल्म च शूटिंग सुरु होत मग परत आलो. मिसळ ला तब्ब्ल पन्नास रुपये मोजावे लागले हाटेलात . पुणा  गाडी न पुण्याला उतरलो न बाजूला सोपारा गाडी लागलीच होती ती पकडली नि घरी सडे आठला  पोचलो . गड बघून झालाच पण इतकी चांगली माणसे भेटली याचा आनंद जास्त झाला .









शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

आबा

*आबा*
त्याच नाव अर्जुन जाधव होत.पावणे सहा फूट उंच.भक्कम शरीर.माझी त्याची ओळख त्याच्या म्हातारपणी झाली.75 चा तरी असावा.
आमच्या आजोबांचा तांदळाचा व्यापार होता.शेती ,नाटकाचे थिएटर होत.त्या कारणाने बरीच भ्रमंती वेळी अवेळी होत असे.हा अर्जुन जाधव तेंव्हा तरुण होता.दिवसभर कुठं तरी काम करायचा न संध्याकाळी दारू पिऊन असायचा. मारामाऱ्या ही  करायचा कुणी काही वावग म्हणल तर.आजोबांकडे काम मागायला आला.त्यांनी हट्टाकट्टा गडी म त्याला बॉडी गार्ड म्हणून त्यांनी ठेऊन घेतला.तेंव्हा पासून जवळपास तो मरे पर्यंत आमच्याकडे च होता.त्याला का कुणास ठाऊक पण सर्व धोंड्या म्हणून हाक मारत.दारू पिणे सोडलं तर बाकी सज्जन माणूस.कामाला वाघ आणि इमानी.त्याला शरीर रक्षक म्हणून ठेवला पण आमच्याकड आल्या पासून मार खाऊन येऊ लागला.अस का रे ? विचारलं आजोबांनी तर म्हणला,अण्णा तुमच्या कडे आलो न डाळ भात खाऊन न तुमच्या संगती न क काय कळना पण हात उचलत च नाही मारामारी करायला.आजोबांची सावली च होता.ते गेले तेंव्हा घरातल्या माणसाहून अधिक तोच धाय मोकलून रडला अस माझे बाबा म्हणत.मग शेती वग्रे उरली नाही तशी त्याला काम च उरलं नाही.
खूप वर्षांनी आम्ही तिथं रहायला गेलो तेंव्हा हा सत्तरीच्या आसपास असावा.अचानक येऊन ओटीवर बसला.बाबांना म्हणला,बाळ आता तू अलायस बायका पोर घेऊन हिथ तर आता मी तुझ्या कडच रहाणार.
अरे पण आता शेती नाही आपली मग काम काय करशील.
आवडात खपीन. पडेल करीन.बाईंना पोरांना सोबत होईल माझी.बाहेर शेती ची काम असतील तर तिकडं जाईन पण आता आपल्या पायरीवर च राहीन.
मग तो आमच्याकडे राह्यला.माझ्यावर खूप जीव होता.सकाळी आई ऊठ ऊठ म्हणून रागवायची तर तिला हा म्हणत असे,असू दे तुम्ही नका तरास देऊ त्याला.
अरे त्याची अंघोळ व्हायचीय पाणी आटून जातंय न बाहेर चुलीवर.
ते मी बघतो तुम्ही जावा तो उठेल जराश्यान.
मी ही त्याला धोंड्या म्हणून एकदा हाक मारली तर बाबा ओरडले.तू त्याला आबा च म्हणायचं आमची गोष्ट वेगळी आहे.तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे तो.
मग त्याची माझी गट्टी जमली.थोडी शेती होती तिकडं गाडी जोडून नेत असे.मे महिन्यात आमच्या सागर गडावर न्यायचा.जाळीतली करवंद,जांभळं,अळीव खाऊ घालायचा.आई कडून माझ्या करता गूळ पोहे बांधून घ्यायचा.
बाबांना एकदा म्हणला,बाळ मला देतोस ते पैसे तुझ्या कड जमा करून ठेव.फक्त 2रु तेव्हढे देत जा रात्री ग्लास करता.बाबांनी विचारलं,का साठवतायस पैसे.
तर,सलीन शेट न अण्णांची छकडी बघितली नाय.एकदा तरी त्याला घोड्या च्या छकडी त फ़िरवून आणीन मग हवं तर विकून टाकू.
असा प्रेम करणारा माझ्यावर आणि आमच्या घरावर.
बाबा शनिवारी यायचे.हा रात्री पिऊन मागच्या अंगणात झोपायचा.पण आम्ही tv लावला कि याची बडबड सुरू.
अरे ती काय काचेवर निर्जीव माणसं बघतोस.तुझ्या आज्याच थिएटर होत. खरी खुरी माणस काम करीत.मोठं मोठे लोक इकडं राहून न काम करून गेलेत.थिएटर ला मी तिकीट विक्री केलीय.नाटक झालं कि थेटर झाडताना आमची गडी माणसात भांडण होत कोण झाडणार या वरून.कारण चवली पावली पडलेली मिळायचीच.न तुम्ही हे त्या tv काय बघून राह्यलेत.
मग आई एकदाच दम द्यायची.आबा sss मी जागी आहे अजून.बडबड बंद कर पाहू झोपायचं मला.
मग हो हो बाई तुम्ही झोपा मी गप रहातो.म्हणून हा बकुळी खाली हांतरूण घेऊन जात असे.
शेवटी एकदा शेती च्या सिझन ला एका जवळच्या गावात कामाला गेला तो बरेच दिवस आलाच नाही.मला चैन पडना. चवकशी केली तर आबा आजारी आहे असं कळलं.मग त्या गावात प्रथमच गेलो सायकल घेऊन.आबा कुणाकडे कामाला आहे असं दिसेल त्याला विचारत गेलो.एक दोघे पटकन म्हणले,तू सलीन शेट काय ? सदू भडजींचा नातू! म्हटलं ,हो.
अरे तुझी आठवण काढत असतो म्हातारा सारखी.चल तिकडं त्या घरी आहे.ताप भरलाय त्याला.
त्या घरी गेलो त्यांनी ही कधी मला बघितलं नव्हतं पण आबा च्या बडबडी मूळ ओळखलं.म्हणले तापात पण तुझं नाव घेत असतो. सलीन शेट चला अंगुली धुवा.
हा माग गोठ्यात हांतरुणावर पहुडलेला.
आबा ,कसा आहेस रे ?
आवाज ऐकलन न म्हातारा उठून बसला.
या बया !बघ कस डुकली काढून बसलं ते.अरे बोलतच नव्हता काही.तू हाक दिलीस न बघ उठला.
ते माझं तस नकळत वय असलं तरी डोळ्यात पाणी आलं.
तुझीच वाट बघत होतो रे पोरा.
मला शोधत आलास, तुज्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक झालं.त्याच्या ही डोळ्यात पाणी होत.हात लावून बघितलं तर अंग ऊन ऊन होत पण जास्त ताप वाटला नाही.
तू नको काळजी करू.आता बर वाटतय मला.दोन चार रोजात ठीक झालो कि यिन घरी सांग बाईंना न आत्या बाईला. या लोकांची पण शेतीची काम करायची आहेत.तू निघ अंधारू लागलंय बाई काळजी करतील.
मी माझ्या खिशात दहा रु होते ते त्याच्या भक्कम मुठीत कोंबले न निघालो.मग आणखी काही दिवसांनी बातमी आली ती घरून,तुझा आबा गेला रे.
अजून एक जोडी आमच्याकडे आयुष्यभर होती.गणपत आणि त्याची बायको सरस्वती.
तिला काही वर्ष्या पूर्वी तिकडं गेलो तेंव्हा भेटलो जाऊन.तिची नात घरी होती.डॉक्टरकी शिकतेय म्हणली.आजी आता पटकन कुणाला ओळखत नाही पण तुमच्या घराची आठवण सारखी काढत असते तुम्हाला ओळखेल बघा.आत गेलो तर सरस्वती बसलेली कोचावर.डोळ्यात फक्त पाणी न पांढर फुल.ओळखलं स का गो
म्हणलो न तिच्या पुढ्यात खाली बसलो.चेहेऱ्यावर हात फिरवलन न म्हणली, बाळा तू आलास मला भेटायला .तुझ्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक केलंस रे.तुम्हाला भेटायची इच्छा राह्यली होती.आता दिसत नाही न चालवत नाही.
ही सुद्धा थेट आबा सारखच म्हणली.
तीही आता नसेल.
त्या काळची माणस वेगळी च होती.
न ती आम्हाला विसरली न आम्ही त्यांना.कुटुंबाचे च सदस्य होते.
अश्या लोकांना 🙏🏻🌹

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

रंगावलीकार श्री.शैलेश पाटील.

जूचंद्र गावाचे नाव आता रांगोळी या कले करता सर्व ज्ञात झालंय. जवळ राहून हि कधी तिथं जाण जमलं नव्हतं.आज मी आणि भाऊ दोघे गेलो होतो.तिथलं देवीचं मंदिर हि बघायचं होत.आधी तिथं गेलो.मग आम्हाला तिथल्या रांगोळीच्या प्रदर्शनाची उत्सुकता होती.दिवाळीत होत ते,पण जाण जमलं नाही.आज आलो आहोत तर बघू असेल तर अजून म्हणून गेलो तर बघायला मिळाले. शाळेत दोन खोल्या मध्ये काढलेल्या रांगोळ्या बघितल्या.कलाकारांना भेटावं अस वाटलं.विचारपूस केली तर लोकांनी अतिशय आत्मीयते

शैलेश पाटील यांच्या घराचा पत्ता सांगितला. मग सरळ त्यांच्या घरी काही ओळख नसताना जाऊन उभे राह्यलो.
खालच्या मजल्यावर गणपतीच्या मुर्त्या बघायला मिळाल्या. वर गेलो तर ते स्वतः भेटले.मग त्यांच्याशी त्यांच्या कले विषयी जाणून घ्यायचाय म्हणलो तर ते अतिशय मन मोकळे बोलले.स्वागत तर इतकं आपुलकीने केलं कि भारावून जायला झालं.त्यांच्या पत्नी ने सरबत आणून दिल. मग त्यांनी माहिती सांगितली.
सगळं गाव कलाकारांचं आहे.मोदी दुबईत गेले होते तेंव्हा काढलेली रांगोळी यांचीच होती.गावात रांगोळी सोबत नाटक,संगीत चित्रकला यात ही लोक प्राविण्य मिळवून आहेत.जास्त जाणवलं ते हे कि, सर्वांना एकमेकांविषयी आपुलकी,प्रेम आणि आदर आहे.शैलेशजी रांगोळी ,वारली पेंटिंग,मूर्ती कला अशा विविध कलांमध्ये पारंगत आहेत.त्यांच्या काही कलाकृतींचे फोटो त्यांनी दाखवले.माग भिंतीवर दिसतंय ते वारली पेंटिंग त्यांचंच आहे. घरातलं इंटिरिअर ही त्यांची ओळख सांगत .रांगोळी कशी काढली जाते, रंग कुठले वग्रे माहिती हि दिली.ते स्वतः रांगोळी काढायला शिकवत असतात.इतका मोठा कलाकार असून हि त्यांच्यातली नम्रता प्रकर्षाने जाणवते.बोलताना कुठं ही गर्वाचा स्पर्श ही जाणवला नाही.संभाजी महाराजांच रांगोळी चित्र वॉट्स अप ला फेमस झालं.ते ज्यांनी ती भूमिका साकारली त्या ,श्री अमोल कोल्हे यांच्या पर्यंत पोचल्यावर त्यांनी स्वतः एक व्हिडिओ मेसेज त्यांना पाठवला तो ही त्यांनी दाखवला.इतकी दाद मिळवून निगर्वी आहे माणूस.त्यांचं वागणं बघून माझं जे मत आहे कलाकाराच्या बाबतीत ते अजून पक्क झालं.
कलाकार आत जसा असतो तेच कलेच्या रुपात बाहेर येत असत.माणूस म्हणून तो आधी चांगला हवा.शैलेश पाटील अगदी तसेच आहेत.कधी गेलात तर मुद्दाम भेटा. त्यांच्या रांगोळ्या आपण प्रसार माध्यमातून बघत असतोच.त्याच कौतूक ही वाटत पण हे सर्व त्यांना भेटून सांगता आलं तर जे समाधान मिळत ते और च असत.
शैलेश पाटील ,तुमच्यावर ईश्वराची अशीच कृपा राहो आणि उत्कृष्ट कलाकृती तुमच्या हातून घडत राहो अशी सदिच्छा देऊन त्यांच्या घरातून तृप्त मनाने बाहेर पडलो.

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

गणपती कारखान्यातली एक गंम्मत.

एक किस्सा बाबानी सांगितला होता. आमचा पोयनाडला गणपती चा कारखाना होता. तेंव्हा चा.
साच्या चा गणपती आतून पोकळ असतो.बाबा आठवण सांगायचे,पोयनाडी एक दीड शाना माणूस होता.गणपती आमच्या च कारखान्यात ला हवा असे.पण दरवर्षी येऊन मूर्ती खालून वरून तासभर बघायचा.मग ,ही ठेव बाळ मला म्हणायचा.आणि बदलली तर मला समजेल हो.चक्क टिचक्या मारायचा मूर्ती ला.
बाबांना एक दिवस राग आला.पण त्याला विचारली, का हे करता अस?आमच्यावर विश्वास नाही का ? आम्ही कुणालाही भंगलेली मूर्ती देत नाही.
तुमचं काय सांगता येत का ? बेमालूम चिकटवून दिलीत तर मला काय समजणार!
म्हणताय ते खरंय. नाहीच समजायचं तुम्हाला,आणि गणपती हि न मोडता विसर्जन होईल .पण आम्ही कधीही अस करत नाही.
तरी तो टिचकी वाजवायचा थांबला नाही.
मग बाबांनी त्याची खोड मोडायची ठरवलं.कामगार हि म्हणले,भाऊ लय च झालं याच .आम्ही बघितलंय तो विटेवर नखाने खूण करतो माग म्हणून त्याला मूर्ती त्यानं निवडलेली समजते.मग सर्वांनी ठरवलं याला त्याच साच्या चा दुसरा गणपती द्यायचा.
गणपती शाडू माती चे असत.करताना थोडी चिर जाणे ते कुठं विट फाटणे हे होत च असत.मग तो तयार होताना ते दुरुस्त केलं जातं.मग धोका नसतो.मग या लोकांनी त्यानं केलेली खूण जी विटेवर होती मागच्या बाजूस ती पॉलिश कामात गुळगुळीत केली.एक मूर्ती जरा तडली होती ती व्यवस्थित दुरुस्त केली.तयार झाल्यावर तो न्यायला आला तेंव्हा सर्व मूर्ती न्याहाळू लागला.बाळा यातली माझी कुठली ?बाबा म्हणले तू ओळ्खतोस न नेमकी?मग घे तुझी कुठली आहे ती.त्याला काही जमलं नाही.मग म्हणला,बाळ मी हरलो. तूच दे कुठली ती.मग त्याला ठेवलेली मूर्ती दिली गेली.त्यानं टिचकी मारून बघितली च.टण आवाज करून बघितलंन.हं हा च रे.
पुढील वर्षी अशी खूण वग्रे न करता म्हणला, बाळ मी काय म्हणतो,माझी मूर्ती खालून बंद करून दे.
साच्या ची मूर्ती आतून पोकळ असते.हे त्याला माहित होतं.तरी उगाच आपलं काही चालवायला म्हणत होता.
मग बाबांनी सांगितलं त्याला.
अरे तुला विश्वासाने आम्ही मूर्ती देत आलोय.कधी तरी भंग पावली का? तरी येऊन तयार गणपती वर टिचक्या कसला मारून बघतोस दर वर्षी.आता तुला खर सांगतो ऐक. तुझ्या या अति शहाणपणा मूळ वैतागून तुला तू ठरवलेली मूर्ती न देता दुसरी च पण त्या च साच्याची दिली गुदस्ता. जी थोडी भंगली हि होती.असे गणपती आम्ही परत भिजवून माती त घालून टाकतो.पण तुला मुद्दाम ती दिली.असा रिपेअर केलेला गणपती जास्त च तणतण वाजला.तू खूष होऊन घेऊन गेलास.तुझी खूण आम्हाला समजली जी आम्ही पुसून टाकली होती. आता या वर्षी म्हणतोस कि खालून माती न बंद करा मूर्ती.देतो करून.पण मग काय होईल ते सांगतो.आत भरपूर एअर बबल राहील.विसर्जन करताना मूर्ती पाण्यात बुडवलीस तर तुझ्या आधी गणपती वर येईल.बोल, म्हणत असशील तर खालून बंद करतो.मग मात्र बाबांच्या अक्षरशः पाया पडून म्हणला,माझे डोळे उघडलेस बाबा.या पुढं फक्त मूर्ती ठेव मला.तू देशील ती आनंदाने घेऊन जाईन.