गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

काही अनाकलनीय अनुभव 2

खूप वर्ष्या पूर्वी रायगडला सायकली घेऊन जायचं ठरलं. माझा रवि म्हणून मित्र आहे. त्याने माझी सायकल अशी काही तयार केली कि नंतर कुठल्याही सायकलवाल्याला जमल नाही. मड गार्ड काढली होती. टायर, ट्यूब,आणि डायनामा सगळ नव खरेदी करून लावल होत. आम्ही दोघ आणि दोन जण तयार झाले. राजा आणि संजय . पोयनाड ते रायगड. डायनामा माझ्या आणि संजूच्या सायकल ला होता. तो पुढे आणि मी मागे राहायचं अस ठरल. कारण पहाटे निघून उन चढायच्या आत प्रवास करायचा बेत होता. महाडला रव्याची मावशी राहत होती तिथे पोचलो दहा वाजता. जेवण करून जरा आराम केला आणि उन उतरल्यावर मजेत पाचाडला पोचलो. काळोख पडला होता. कुणी जाणारे येणारे हि नव्हते. सायकली खाली हॉटेल जवळ ठेऊन चढायला सुरुवात केली. दमल्याने चाल अगदी सावकाश होती . च्यैला असे उजडेल पोचे पर्यंत काही जवळची वाट असती तर बर झाल असत अस मी म्हणालो. तेव्हड्यात कुणी तरी धोतर वाला येताना दिसला. त्याला थांबवल आणि वाट आहे का दुसरी विचारल. तो म्हणाला यामागून मी वरच चाललोय दुध घेऊन. आणि आम्ही चालू पडलो त्याच्या मागे. अगदि वीस मिनिटात गडावर आलो. चला बर का तुम्ही मी जातो म्हणून तो गेला. मग रूम घेऊन राहिलो गड पाहिला आणि येताना पायर्या उतरू लागलो. सहज मी म्हटल ,कुंच्या लक्ष्यात येतंय कारे काल कुठून चढलो त्या माणसा बरोबर? कुणालाच काही कळेना. म्हटल थकव्या मुळ जाणवल नसेल काही. संध्याकाळ झाली होती पाचाड हून सायकली घेतल्या आणि रात्री प्रवास करून सकाळी पोयनाड गाठायचं ठरल होत. सायकली ,डायनाम्या सकट मस्त सुरु होत्या. महाडला नदी काठाने रस्ता आहे तिथे पोचलो. उतारावरसंजयचा डायनामा बंद झाला. माझाही बंद. माझा तर नवा मग काय झाल?तरी सायकली दामटत होतो. मग मस्त धुपाचा वास भरपूर आला. रव्या इथे दर्गा आहे कारे ?मी विचारल. तो म्हणे काय माहित नाही. मग मोगरा ,पारिजात असे सुवास बदलत राहिले. मग मात्र सगळे जरा घाबरलो. पण संजा ओरडला कुणी थांबायचं नाही प्याडल मारत राहा. तो हे बोलतोय तो त्याची चेन पडली. कशीबशी बसवली आणि सुसाट निघालो. पुढे एक टेम्पो उभा होता तिथे जाऊन थांबलो. सगळे धापा टाकत होते. तो टेम्पो पेपरचा होता. त्याने विचारल ,कायरे काय झाल ?कुठे निघालात. मग झाला प्रकार सांगितला. तो म्हणाला जाऊदे आता घाबरू नका. नदीजवळ झाल न? तिथे असे सुवास येतात अलीकडे. नाटकवाल्यांची बस नदीत पडली तेंव्हापासून. कधी मधी मी हि अनुभव घेतलाय. ते ऐकून पोटात गार वाटल. मग टपरी उघडली तिथे चहा घेतला आणि निघालो. आता पाहिलं तर दोघांचे डायनामे व्यवस्थित सुरु होते. घरी पोहोचलो सकाळी दहा साडे दहाला तो पर्यंत कुणाचीच चीन पडली नाही. आता बाईकवर रात्री जाऊन आलो गडावर पण तो अनुभव काही परत आला नाही. तो भेटलेला माणूस,त्याने कुठून नेल अनिते सुवास आणि डायनामा बंद पडण ,चेन पडण हे कधीच विसरणार नाही. वेगळा अनुभव होता हे नक्की.

काही अनाकलनीय अनुभव

आमच्या घरी माजघरात एक बाळंतीणीची म्हणून एक अंधारी खोली होती. तिथे कुणीतरी हात धरल्याचा भास झालाय दोन वेळा. आमच्या विहिरीत फुल आणि आंबे वेचायला आलेली एक लहान मुलगी पहाटे पडली. कुणी जाग नसल्याने ते उशिरा समजल. पण तो पर्यंत ती गेली होती. पण त्या विहिरीत कधीतरी धप्पकन काही पडल्याचा आवाज होई. अश्यावेळी पाणी हि गढूळ होत असे.
 पोयनाड ला माझ्या मित्राकडून दुध आणायला मी सहा वाजता जात असे. सात वाजता दुध घेऊन येई, तासभर गप्पा होत. त्याने मागच्या अंगणातून मला जायला वई तून वाट केली होती. ती रोजची वाट. मध्ये एक तगर भरपूर मोठी आणि फुललेली अशी होती. ती डाव्या अंगाला टाकून वई कडे जाऊन झापाचा दरवाजा उघडून बाहेर पडायचं. अगदी अंधारात सुद्धा न चुकता जाईन एव्हडा सराव झालेला. एक दिवस मस्त चांदण पडल होत मी दुध घेऊन निघालो. बाकी काही आठवत नाही पण अचानक धोंड्या आमचा गडी खांद्यावर थाप देत विचारतोय '' काय रे बाला किती वेळ आई वाट बघून थकली. जेवाची तरी आठवण ठेव. चहाला दुध येतय म्हणून आई वाट पाहतेय ते आता जेवायची वेळ झाली. म्हटल का?किती वाजले ?दुध काढल्या वर लगेच निघालोय. अरे साडे नऊ झाले नारे. काही कळेच ना. मग धोंड्या म्हणाला तुला 'चकवा' लागला पौर्णिमेला .
अस झाल खर. नंतर काय अजूनही त्या घरी जातो पण तो प्रकार परत झाला नाही.
           घरी माझ्या आजोबांची एक खोली होती. तिथे कुणी झोपल कि थोबाडीत बसे. माझ्या मावस भावाला बसली होती. माझ्या बाजूला झोपला होता. गाल लाल झाला होता. मग ती खोली माझी झाली. मी तिथे खाट टाकली. रात्री माझ्या स्वप्नात आले. तू झोप तुला काही करणार नाही पण हि जागा सोडून झोप. दरदरून घाम सुटला होता. मग खाट दुसरी बाजूला ठेवली आणि काही त्रास झाला नाही कधी मला.
           शेतावर जाताना दोन न डोंगऱ्या लागत. तिथे निवडुंग भरगच्च होता. एकदा संध्याकाळी परत येताना जाम कळ आली म्हणून सुनील नावाचा मित्र बरोबर होता त्याला म्हणालो गाडी थांबव. त्याने का विचारल. मी करंगळी दाखवली. तो म्हणाला इथे नको घर जवळ आलय थांब थोडा. मग म्हटल आयला पाच तर वाजतायत कुठ भूत दिसतंय तुला. तरी त्याच नको नको चालूच. पण हट्टाने उठलो. कार्यभाग होतो न होतो तोच त्या निवडूंगात कसलस झाड होत त्या वरून मशीन गन ची फैर झडावी
तसे छोटे दगड रप्पकन  धुरळा उडवत पडले. मग धूम ठोकली. सुन्याच चाललं होतच ,तरी मी सांगत होतो .
            आणि उन्हाळ्यात आम्ही अंगणात झोपत असू. सगळे एका रांगेत. रोज रात्री काठीला घुंगुर लाऊन ती आपटत कुणी तरी अख्या घराला फेरी मारीत असे. कुणी दिसल कधीच नाही. आधी घाबर्य्चो. मग आजी म्हणाली तो राख्या आहे त्याचा काही त्रास नाही.
            असे काही अनाकलनीय अनुभव आहेत.

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

- पसारा -

                                                                                            - पसारा -

पसारा म्हटली कि जो अर्थ माहित होता त्या पेक्ष्या वेगळा अर्थ आज्जी मुळे माहित झाला. हा पसारा कुणी आवरायचा ? असे आई नेहेमीच म्हणत असे. पण गावी एकदा गडी ढोर घेऊन तळ्यावर निघाला तेंव्हा मीही त्याच्या बरोबर निघालो. आज्जी म्हणाली ढोर घेऊन काय आजोबा सारखा पसार्याला का निघालायस ? म्हटल म्हणजे ? मग हा पसारा काय ते तीन सांगितलन. आमचे आजोबा पीक तयार होऊन डौलात उभी राह्यली कि पहाटे आमच्या धोंड्या आणि बिल्ल्या या गड्यांना घेऊन आमचे बैल घेऊन निघत. उत्तम तयार असलेल्या पिकात सोडत. बैलांची पोट तट्ट फुगली कि तोवर उजाडायला लागत असे. लख्ख उजाडायच्या आत हे सर्व बैल घेऊन घरी येत. मग ज्याच्या शेतात पसारा केला म्हणजे गुर चरायला सोडली तो येई संध्याकाळी . त्याला कळल नसे कुणी केला पसारा. तर तो बिचारा ,अण्णा काल कुणी तरी पसारा केला माझ्या शेतात अस सांगू लागे. मग अण्णा म्हणत अस्स? काय तरी माणसे. पण जाऊ दे आता . कुणाला कळत असे कि अण्णांनीच केला पसारा . मग तो येउन म्हणे काय अण्णा माझच शेत मिळाल का ? अण्णा म्हणत नाही रे मी कस करेन . बर आलायस तर ताज्या दुधाचा चहा पिउन जा. आणि काही लागल तर ने मज जवळून. कधी आमच्या हि शेतात कुणी पसारा करी.
मी आजीला म्हटल ,कुणी रागवत नसत? आजी म्हणाली अरे रोज नाही कधीतरी गम्मत करीत  एकमेकांची . मस्त काळ होता . आता अस कोण करू धजेल.

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३

_ श्रीकृष्ण थिएटर _

                                                                            _ श्रीकृष्ण  थिएटर _





          आज बाबा जुन्या गोष्टी सांगत असताना आठवण निघाली. अलिबाग जवळ पोयनाड हे आमचे गाव. माझे आजोबा विष्णुपंत जोशी. धडाडीचा माणूस. धोतर , पांढरा सदरा,गांधी टोपी असा वेश. किरकोळ शरीर यष्टी. त्याकाळात काँग्रेस पक्ष
हा मोठा पक्ष . तसा शेकाप हि होता पण कॉंग्रेस प्रमुख पक्ष. आजोबा अण्णा या नावाने प्रसिद्ध.  काँग्रेस चे पुरस्कर्ते. त्यामुळे ओळखी खूप. घराच्या वरील बाजूस पोलिस लाईन होती. येईल तो फौजदार अण्णाकडे बैठीकीला असे. म्हणून तिथेही यांची वट असे. कुणी पान्थस्त यात्रेला निघालोय आज मुक्काम करून निघेन म्हणत चार दिवस राहून जात असे. शेती होती ,आंब्याची बाग होती,आणि भटची दलाली होती. अण्णांना धंद्याची आवड जास्त . त्या काळात धरमतर ते पोयनाड टांगे आणि मग मोटारी उतारूंची ने आण करायला असे धंदे हि केली. एक दिवस चौल भागातील कुणी जोशी काका म्हणून गृहस्थ भेटी करता आले.
आमचे घर टेकडीच्या उतारावर होते. जवळपास एक एकर वर वसलेले. निसर्गतः काही भाग उंच सखल होता. चारी बाजूला अंगण , विहीर ,आंबा,पापी,आवळा ,प्रचंड मोठी बकुल,अशी झाडे होती. मागच्या बाजूचा पारस पाहून जोशीकाका अण्णांना म्हणाले,'' विष्णुपंत तुम्ही थिएटर का नाही सुरु करत ?'' अण्णा म्हणले ,काही माहित नाही त्यातली . तर जोशीकाका म्हणाले ,मी देतो सगळी माहिती. माझ्या मुंबईत नाटक कंपन्यात ओळखी आहेत. झाप,पोफळी माझ्याकडून घेताच जमून जाईल सर्व . मग थांबतील ते अण्णा कसले. मग सुरु झाले  - श्रीकृष्ण  थिएटर -
                 स्टेज वेगळे बांधावे लागलेच नाही. मागच्या खाचरात दोन खंडी भात होई तिथे अर्धा भाग उंच आणि बाकी खाली होता . झाप पोफळींच्या भिंती , विंग तयार झाल्या. पुढे खुर्च्या मग बाक आणि शेवटी सरावलेला ओटा. खुर्च्याची पहिली रांग घरचांसाठी राखीव असे . त्यामुळे घरात आजीला सुद्धा सर्व नाटके पाठ झाली होती . स्टेजवर आठ बत्त्या टांगलेल्या असत. विंगेत सातआठ असत. प्रयोगाआधी त्या पेटवणे आणि नाटक संपे पर्यंत नीट चालतायत न ह्या साठी दोन माणसे असत. आधी आणि नंतर झाडपूस करायला गाडी असत. घरच्या बैलगाडीने गावात जाहिरात वाटली जाई . बाबांचा हात चांगला म्हणून तेच पोस्टर रंगवून देत. मधन्तरात विकायला चिवडा वगैरे केला जाई . गाडी विकित असत. तिकीट बारीवर एक माणूस लागे. मास्टर नरेश,मास्ट दामले,नानासाहेब फाटक,दत्ताराम असे दिग्गज नट आमच्याकडे मुक्कामाला असत. या मुळेच बबन तबल्याचा छंद लागला. त्या वेळचे काही किस्सेही बाबा सांगतात. मज येते ऐकायला.
              हळूहळू नाटके चालेनाशी झाली. रोज तोटा होऊ लागला. मग एक तमाशा फड आला. आमचा तमाशा लावा अण्णा बघा लोक येतायत कि नाही पण तुमचे पैसे खेळ झालाकी देऊ. आण्णा बर म्हणाले. तर आजच खेळ लावू बसून काय करू ?
अण्णा म्हणाले,''अरे जाहिरात नाही केली ,लोकांना समजेल कसे?'' तर ते लोक म्हणाले ,काळजी करू नका आम्हाला नाही लागत जाहिरात. आमच कड आणि ढोलकी कडकडायाला लागली कि आपसूक येतील बघा. आणि तसच झाले. खेळ हौस फुल .
काही दिवस बरे गेले. खूप कचरा होई पण गाडी खुश असत. झाडून काढताना लोकांनी उडवलेल्या चवल्या पावल्या बक्खळ मिळत. ती त्यांना देत अण्णा. मग हा बहर हि संपला. कारण चित्रपट आले.
              मग नाहीतरी थेटर आहेच उभ, प्रोजेक्टर आणा अस कुणी म्हटल . मग अण्णांनी मुंबईहून तो मागवला. पण तो पहिल्यादिवशी छान चालला आणि मग जो बंद पडू लागला तो एव्हडा कि तो नाद सोडावा लागला. आणि आमच थेटर बंद झाल . लहानपणी त्याचे अवशेष पाहून विचारलं तेंव्हा इथे आपले थेटर होत अस आजी सांगे . त्यावेळच्या थेटरात मी छोटी शंकू सारखा खोलगट भाग असलेली जमीन पाहून हे काय विचारल तर आजी म्हणली ते मोराच घर आहे. म्हटल यात मोर कसा राहतो?तर आजीने एक काडी घेऊन त्या बिल वजा खळग्यात फिरवायला सुरु केली. अचानक त्यातून नखा पेक्षा बारीक कीटक वर आला. आजी म्हणली हा बघ जमिनीतला मोर. मग ज्या रंग मंचावर कसलेल्या नटांचे पिसारा फुलवलेल्या मोरा सारखे अभिनय फुलले असतील तिथे मी हे मोर उकरून काढत असे. आता हे सर्व नाही. ते घरही केंव्हाच विकल. आताच्या मालकांनी त्याचे तुकडे करून विकायला काढलेत. तिथे राहायला येणार्यांना हे कळणार नाही कि इथे किती मोठे कलाकार आपली कला सादर करून गेलेत. दुसरे आजोबा जे दशग्रंथी होते त्यांनी किती आणि कुठल्या ग्रंथांची पारायणे केलीत. त्या घरावर छोटे पुस्तक लिहावं अश्या घटना घडल्यात. त्त्या स्टेजवर कॉंग्रेसचे त्या वेळचे सर्व पुढारी येउन गेलेत. आता फक्त आठवणी त्याही फक्त आमच्या पुरत्या. 




सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

अनेक शब्द प्रभूंची लेखणी नेमकी आपल्या मनातल्या भावनेला , व्यथेला नेमकी शब्दात साकारते . हे शब्द रोजच्या बोली भाषेतील असतात . पण तबल्याची जी भाषा आहे ती ही इतकीच समृद्ध आहे . आणि तरबेज कलाकार चामड्यावर ती जिवंत करतात . काही रचना दीर्घ काव्यासारख्या असतात . काही नाजूक कवितेसारख्या ,काही संभाषणा सारख्या . हे  भाषा वैभव हि विस्मयकारक आहे . यात  नाद,लय आणि स्वभाव किंवा भावना आहेत . गणित हि आहे .
जस ;-
धागेना धा s   तिरकीडतकतेs त   धात्रक धेटेत   कतग दिगन   
तकतीनतक   तकतीनतीन   धात्रक धेटेत   कतग दिगन   
ताकेना ता  s   तिरकीडतकतेs त  तात्रक तेटेत   कतग तीकन   
तकतीनतक   तकतीनतीन   धात्रक धेटेत   कतग दिगन  
 हि तिश्र जातीची म्हणजे एका मात्रेत तीन,सहा असे बोल असलेली रचना . हीच रचना चारच्या पटीत बोल घेऊन येणारी चतुरत्र जातीत कसलेला तबलजी जाती बदलून अशी वाजवेल -
धागेना धा s त धा s    तिरकीडतक तेततेत   धात्रक धेटेत कत   कतकतगदिगन
तकतकतीनतीन    तकतीनतकतीन  धात्रकधेटेतकत   कतकतगदिगन
ताकेनातताs ताs    तिरकीडतक तेततेत     तात्रकतेटेतकत   कतकतकतीकन 
तकतकतीनतीन    तकतीनतकतीन  धात्रकधेटेतकत   कतकतगदिगन
  अस शब्दांच गणित रामरक्षेत हि आढळेल -
    ध्यायेदाजानुबाहू   धृतशरधनुशं   बद्धपद्मासन्स्थम…. - एका वाक्यात सात शब्द
हे सगळ झपाटून टाकणारे आहे . या सुंदर रचना शिकल्या कि माणूस कधी एकटा पडत नाही . नुसत्या मोजत म्हणत बसल कि वेळ किती आणि कसा गेला कळत नाही. आणि याचा कैफही असा कि इतर कशाचीच गरज वाटत नाही . ह्या अगणित रचना करणाऱ्या कलाकारांच्या बुद्धिमत्तेला शि . सा . न . 

रविवार, २१ जुलै, २०१३

                                          -  तबल्याचे नामकरण आणि विकास -

                तबल्याच्या खूप आधी पुराण काळी महादेवाच्या हातात डमरू दिसत. ते आद्य ताल वाद्य असावं. पण तबला हे नाव कस पडल याची कथा प्रसिद्ध आहे.तबल्याच्या आधी पखवाज हे वाद्य होत.  कुणा राजाच्या दरबारातील पखवाज वादकाला कुणी दुसर्या कलाकाराने आव्हान दिले. शर्त होती जो हरेल त्याने परत पखवाज वाजवायचा नाही. हि पैज राजाचा कलाकार हरला. त्याने कबुल केल्या प्रमाणे वादन सोडले. पण खूप दुख्खी झाला. ज्या वाद्यावर आयुष्यभर प्रेम केल,मेहेनत केली त्याला हात लावायचा नाही?
मग समोर असलेला पखवाज उचलून जोरात हापटला. त्याचे दोन तुकडे झाले. काय केले हे कळताच रडत रडत ते तुकडे त्याने प्रेमाने सरळ करून ठेवले. त्यांच्या कडे पाहत असता हे लक्ष्यात आल कि हे नव वाद्य होऊ शकत. आणि त्याने तबला तयार केला.
पखवाजचे बोल काढायची पद्धत बदलून वादन केले. मग राजाकडे जाऊन म्हणाला '' महाराज पखवाज तर नाही पण दुसरे वाद्य वाजवू शकतो कि नाही''. राजा म्हणाला जरूर वाजवून दाखवा. मग त्याने त्याचे नवे वाद्य वाजवले. सर्वाना हे वाद्य खूप आवडले.
राजाने विचारले ,पंडितजी ये साज आपने कैसे बनाया ? हा म्हणाला ,बीच मे  काटा पखवाज को . राजा म्हणाला ,काटा तब भी बोला? हा उत्तरला हो . मग हि गोष्ट मागे उभ्या असलेल्या प्रधान ,सरदार यांच्यात काटा तब भी बोला अशी पुढे पुढे सांगत येताना तब भी बोला च तबला झाल .
             भगवान शंकर अरण्यातून जात असता एका राक्षसाशी त्याचं युद्ध झाल . त्यांनी त्या राक्षसाला मारून उंच भिरकावल आणि निघून गेले . काही वर्षांनी ते परत  त्याच ठिकाणाहून जात असता त्यांना घूघू  असा आवाज ऐकू आला . कुठून येतो याचा शोध घेतला तर आपण भिरकावलेल्या राक्षससाचे शरीर झाडावर अडकून पडले आहे. त्याचा फक्त सांगाडा  उरला आहे . त्या हाडांच्या पिंजर्यावरील चामडी टिकून आहे. आणि त्यातून वाहणाऱ्या वाऱ्याने हा ध्वनी तयार होत आहे हे शंकरांच्या लक्ष्यात आल आणि त्यांनी त्या चामड्या  पासून वाद्य तयार केले . अशीहि एक गोष्ट सांगितली जाते .  पण या  दंतकथा आहेत . याला पुरावा नाही.

त्या काळी धृपद धमार गायकी प्रचलित होती . तिला पखवाजाची साथ असे . नंतर ख्याल गायकी आल्यावर पखवाजाचा घनगंभीर आवाज त्या गायकीला योग्य नव्हता . म्हणून , अमीर खुश्रो नावाचा विद्वान माणूस होऊन गेला. त्याला अनेक विद्या अवगत होत्या.  त्याने तबला तयार केला असे जाणकारांचे म्हणणे आहे. याचा उल्लेख सापडतो असे म्हणतात.
आणखी दुसरे असे कि,तबला सदृश एक रण  वाद्य लढाईच्या वेळी सैनिकात जोश येण्याकरता उंटाच्या पाठीवर ठेऊन वाजवले जात असे काठीने.  त्याला 'तबल्जंग '  किंवा दुग्गी म्हणत. याचाच विकास होऊन तबला झाला असे हि मत आहे.
               पूर्वी चामड्याच्या वाद्यांच्या ऐवजी  दोरी वापरत. डग्गा- माती,लाकूड,काच ,किंवा लोखंड ,तांब असा धातूचा. हल्ली धातूचे बाये प्रचलित आहेत. त्यात पंजाबी बाया उभट आकाराचा असतो. त्याला शाई ऐवजी पखवाजा प्रमाणे कणकेचा गोळा लेपून वाजवतात . कळशी घाटाचे बाये हि प्रसिद्ध आहेत.
           मागे काही वर्षान पूर्वी ड्रम च्या प्रमाणे प्लास्टिक तबल्याच्या पुडी करता वापरून पाहण्याचे प्रयोग केले पण जमले नाहीत. चामड्याच्या वाद्यान ऐवजी ढोलकी प्रमाणे नट बोल्ट लावून पहिले गेले पण  कुणाला पसंत पडले नाही. धातू ऐवजी फायबर बायां करता वापरल गेल ते हि चालले नाही.
        
              . एकल वादनात तबलजी काय काय सादर करतो हे पुढच्या वेळी लिहीन म्हणतो.

शनिवार, २० जुलै, २०१३

                                                  - तबला आणि त्याचे ठेके -
                
                     
                             तबला म्हटले कि दोन वाद्यांची जोडी डोळ्यासमोर येते. पण जो आकाराने मोठा आणि डावीकडे असतो तो डग्गा किंवा बाया. हा धातू -जसे तांबे , किंवा लाकूड ,काच , मातीचा असतो. सध्या इतर प्रकार वापरात नाहीत . तांब्याच्या बायाचा नाद चांगला असतो. आणि तबला जो उजवीकडे असतो आणि आकाराने बाया पेक्षा लहान असतो तो तबला किंवा उजव्या हाताने वाजवला जातो म्हणून दाया . हा खैर,साग,हळद ई. झाडांच्या खोडापासून तयार केलेला असतो. बाया पुरुषी आवाज आणि दाया /तबला बायकी आवाजाचे प्रतिक आहेत.
                        तबला हे ताल वाद्य आहे. संगीतात याचे काम ताल सांभाळायचे आहे. तसेच याचे एकल वादनही केले जाते. आज
याच्या ठेक्यांच्या बाबतीत थोडे जाणून घेऊया. कुठल्याही गाण्यात बजावण्यात ताल वाजत असतो. काय असत या तालात ?
१ ]   सम =  कुठल्याही ठेक्याची पहिली मात्रा जी वाजवणारा जरा जोरकस वाजवत असतो.
२]    मात्रा = संगीतातील काल मापनाचे साधन .                                                                                                                     ३]    टाळी = ठेका हाताने मोजून दाखवताना होणारी स:शब्द क्रिया म्हणजे हाताने क्रिया हि होते आणि टाळीचा  आवाज हि होतो
४]   खाली = ठेका हाताने मोजून दाखवताना होणारी नि:शब्द क्रिया यात हात बाजूला करून दाखवला जातो आवाज होत नाही
५ ]   विभाग = ठेक्याचे ताली प्रमाणे पाडलेले समान भाग म्हणजे विभाग किंवा खंड
६ ]  आवर्तन = ठेका सम ते सम एकदा वाजला कि एक आवर्तन झाले. आवर्तन म्हणजे एक चक्र किंवा फेरा
७ ] बॊल = तबल्याच्या अक्षरांना बोल म्हणतात
                                 आता एक ठेका पाहू. जो गणपतीच्या सुखकर्ता आरतीला वाजवतात -

                                                       दादरा - मात्रा ६ ,टाळी १ आणि खाली ४ थ्या मात्रेवर . विभाग - ३,३चे दोन
                                                   *१  धा २ धिन ३ ना
                                                   ० ४ धा  ५ तीन ६ ना      
आता हा ठेका एका लयीत दिलेल्या बोलांनी म्हणून पहा . आणि म्हणताना पहिल्या मात्रेवारच्या धा ला ताली वाजवा . मग दोन बोटे मोजा आणि ४थ्या मात्रेवारच्या धा ला ताली न वाजवता फक्त हात पालथा करून दर्शवा आणि मग परत दोन बोटे मोजा
झाला दादरा मोजून . आणि दादर्याचे बोल सुखकर्ता च्या चालीवर म्हणून पहाम्हणजे तबलजी तबल्यावर या आरतीच्या वेळेस काय वाजवतो ते कळेल. एकल वादना विषयी परत कधीतरी लिहीन जर हे आवडले तर.
                                                                                धन्यवद………. -^-